नंबराचा धोंडा:
नंबराचा धोंडा…..
विनायक कदम:९६६५६५६७२३
धोंड्याचा देव बी करत्यात आणि धोंड्यान येकादयाच डोसक बी फोडाय येतंय. धोंड्याचा आपुन कसा वापर करतूय हेज्याव बरंच काय आसतंय. त्यात नंबराचा धोंडा मजी नुसती आगबोंड. आख्या दुनयेतली भांडण त्या धोंड्यावरन हुत्यात.
धोंडा का हालवलास, धोंडा हित हुता, तू धोंडा उपडलास, हिकडला हिकडं रवलास, धोंड्याच्या जवळ नांगरून तू धोंडा पाडलास, काकरी आत भायर आली, हित रवल्याला धोंडा हेला मान्य न्हाय आसल वाद बोलता बोलता वाडत जुपी व्हायची.
जुपी झाली की चाबूक, काटया, दगाड, खुरपी, कोयत, कुराडी, गज, काय पायजी ती घिऊन गडी भिडलंच म्हणून समजा. येकमेकांसनी लाखांन शिव्या दयायच्या. मागला, फुडला,जातीचा, कुळीचा,खान दानाचा
पाक उद्धार व्हायचा. त्यातनं भांडण वाढतंय आणि शेवटाला मग खडाखडी. येकमेकांचं गचुट धरून थापडाय चालू. मग त्यो रक्ताचा हाय, नात्यातला हाय, शेजारचा हाय, गावातला हाय आसल काय बगत न्हायत. नुसतं धर की बडीव आसला सारा प्रकार. माणूस रक्तबंबाळ काय या धोंड्यावरन भल्याभल्यांचं मुडदबी जाग्याव पडलं.
मग पुलीस स्टेशनच्या वाऱ्या. येकमेकांच्या ईरोधात खोट्या तक्रारी, परत ज्येच्यात लय बळ त्येनं बळ दावायच. कोर्ट, कचेरी पुलीस, वकील यात जिंदगी काय पिढ्यांन पिढ्या खपल्या पण वैर काय मिटत न्हाय. एकरबर यिकाय लागूदी पण तेजी जिरवल्याशिवाय सोडत न्हाय.
तारीख पे तारीख पडत्या आणि वादातल्या त्या इतभर जागसाठी सगळ्या संसाराची राखरांगुळी माणसं करत्यात. बांध कुरून शिती करायचा ट्रेंड आपल्याकडं हाय. रान आत पडाक ठेवणार पण बांधात शिती लय करणार. माणसाचा समजूतदार पणा हरवला.
अहंकार, पैशाचा माज आणि समोरच्याची जिरवण्याच्या नादात पिढ्या खपल्या. माणूस शिकला, पण तेज्या ईचाराची उंची काय वाढली न्हाय. वाद आज्या कडून पोरकड ,आणि पोरकडन नातवाकड गेला. येका पिढीकडन दुसऱ्या पिढीला दिला.
किरकोळ ईषयावरन खून, मारामाऱ्या झाल्या पण वाद मिटल न्हायत. ठिकठिकाणच गावातील जेष्ठ माणसं, पंच, पुलीस पाटील, सरपंच, तलाठी, सर्कल, पोलीस, डीवायएसपी, तहसीलदार, एसपी काय कलेकटर बी वैतागल. पण माणसं माग घेत न्हायत. मी का सुडू, मी का माग घिऊ, आसली मी पणाची भावना.
उन्हाळी नांगरट आणि पेरण्या सुरू झाल्या की हाणामारीच आसल प्रकार लय हुत्यात. खाजगी, सरकारी मोजण्यासह सारी यंत्रणा वेठीस धरली जात्या. पण कोण बधत न्हाय. पृथ्वीवर शे पाचशे वर्षे जगायला आल्यागत माणूस करायला लागलाय. धोंड्यान तुमी येकमेकाची कितीबी डुसकी फोडा पण नंबराचा धोंडा पिढ्यान पिढ्या शेताला जागता पहारा दितूय.