नामा जोकता: गावाकडं नुसतं उनाडक्या करत बोंबलत फिराय लागलं की माणसं म्हणत्यात
गर्दीतला आवाज..
नामा जोकता:
विनायक कदम: ९६६५६५६७२३
गावाकडं नुसतं उनाडक्या करत बोंबलत फिराय लागलं की माणसं म्हणत्यात आर का जोकत्यावानी फिरतुयस. तवा काय कळायचं न्हाय पण जोकता मजी लैच कायतर येगळ लपड हाय वाटायचं. लय दिवस झालं हिजडा, जोकता हेंच्याव ल्याच हुतं पण सांगडतला कोण भेटत न्हवत. चिंचणीच प्रयोगशील शिक्षक पी डी पाटील सरांचा येगदा फोन आला. योक वळकीचा मित्र हाय गड्याला भेटूया का म्हणले. तासगाव तालुक्यातल्या एका गावांन त्या नामा जोक्त्याला जागा दिलती. पत्र्याची चार पानं मारून तेंन निवारा केलता.
४० वर्षाचा नामा तसा ईजापूरचा. ३ भणी,२ भाऊ. सवतर आयन गड्याला संभाळल्याला. शाळा न्हाय काय न्हाय. अज्ञानान १५ व्या वर्षी त्येज्या पेक्षा बारक्या पोरगीसंग काय कळायच्या आत लगीन झालं. वय वाढत हुतं आणि ७० एकर शिती असणारा नामाच येवस्थित चालू हुतं.
२१ व्या वर्षी नामाला कसतरीच व्हाय लागलं. बोलणं ,चालणं आवाजात बदल झाला. नटू, सजू वाटाय लागल. सुख लागणा. मग नामान ठरवलं मी सौंदतीच्या रेणुकाचा मोती बांधून घेणार. मजी देवासंग लगीन करायचं.
नामा आधी सांगलीत हुता. एक ठिकाणी काम करायचा.आता मोती बांधून घ्याचा मजी दीड लाखाचा हुबाला खर्च. लोकांच्याकडन तेंन कसतरी गोळा करून मोती बांधून घेतला. नामा आता जोकता झालावता. साडी निसून मागाय जायाचं हुतं. नामा बावरला पण आता पर्याय न्हवता. २५ वर्षांपूर्वी पयल्यांदा मागाय गेल्याव गड्याला घाम फुटला. भुजाय लागला. बंदुकीच्या नळकांड्या रोखाव्यात तशा तशा माणसांच्या रोखलेल्या नजरानी त्यो घायाळ झाला. ह्यो समाज आपणाला मिसळून घिल का..? ह्या जिंदगीच्या आयला…. म्हणत कसलं ही जगणं तेंन तेलाचं ईचारल.
मागून झालं की गडी कुटतर शेतात जाऊन साडी फेडत कापड बदलायचा. घरला जाताना प्यांट शर्ट घालायचा. तेजी चांगली गोष्ट मजी घरच्यांनी बी तेला हाय तसच स्वीकारल हुतं. नामाला आता हाळू हाळू सव झाली. माणसांच्या नजरांची तेला भीती वाटणा. मूती बांधताना तेंन सांगलीच्या एकाला गुरू करून घेटलावता. आता हेज्या हाताखाली १८ जण शिष्य हायत. तीन वरीस तेंन देव डोसक्याव घेटला. जत्रा आसल्या की जोक्त्याच कार्यक्रम आस्त्यात. ५ ती १० हजारापासन २० हजारांच्या सुपाऱ्या आस्त्यात. देवाची , पिच्चरची गाणी म्हणत बेभान हुन नाचायच.
नामान एक किस्सा सांगितला आणि अंगाव काटा आला. पलूसमधन कार्यक्रम करून त्यो निगाला हुता. येळ झालती सांगलीला जायाचं हुतं. ५ व्या मैलापर्यंत गाडी मिळाली. तीत गाडीची वाट बगत थांबला. बारा वाजत आलत. तवर येक ट्रक हात केल्याव थांबला. दारू पिऊन तंग झाल्याल ८ती १० तरणबांड गडी ट्रक मधी हुतं. सजल्या धजल्याला नामा येकादया बायला फिका पाडत हुता. ट्रक चालू झाला आणि गड्यानी तेला डीवचाय चालू केलं. एकटा गडी बावरून गेला. पण पर्याय न्हवता. झोंबाझोंबी वाढत आवाक्याच्या भायर चालली. ट्रक अडचणीच्या ठिकाणी थांबवून तेला खाली उतरवत सारयांनी घेरलं. आता पर्याय न्हवता नामा म्हणला तुमी सारीजण माझ्याशी संबंध करा पण मला एड्स हाय. तुमच्या जिंदगीची का वाट लावून घेताय. वासनेन मुसमुलेल्या गड्यांची नशा झटक्यात उतरली. तेज पाय धरलं.
नामा म्हणला हिजडा येगळा आणि जोकता येगळा हे मांनसासनी कळत न्हाय. तेंच जगणं ,राहणीमान यात फरक आस्तुय. हिजडा लगीन न्हाय करत. जोरजोरात टाळ्या वाजवणं, साडी वर करणं आस जोकता करत न्हाय. त्यो सभ्यतेन लोकांच्या कडन मागतो.
तासगाव पासन महाबळेश्वर पर्यंत नामा मागाय हिंडतोय. तेला बायकू २ पोर हायत. चांगली शाळा शिक्त्यात. त्यासनी नुकरी लावणार हाय आस नामा म्हणतुय. इतर जोकत दारू पित्यात, व्यसन करत्यात, पोरांच्यावर पैस उधळत्यात. पण नामा इज्जतींन राहतोय. त्येज्या गुरूला ७ हजाराचा हप्ता म्हयण्याला दयाय लागतुय. जोक्त्यांच्यात शिक्षण नसल्यानं अज्ञान हाय व घरची माणस, समाज त्यासनी जवळ घेत नसल्याच्या टेंशनन व्यसनांच प्रमाण अधिक हाय. भयानक जगणं आणि जिंदगी हाय. नामाला आता ईजापूरला जाऊन घर बांधायचं ध्यान लागलंय. घर दार, बायका पोरांनी तेला जवळ केल्याने माझं बराय पण इतरांचं काय..? जोक्त्यांच्यात गुरूची शिक्षा व दंड हुबाला आस्तुय.
नामान २५ वर्षात मागितलेल्या पैशातन दोन जागा घेटल्यात. काय तोळ सोन तेज्याकड हाय. पण नामाकड दानत बी तेवडी हाय. गरिबांच्या पोरींची लग्न कराय तेंन लाखान पैस दिल. गरिबासनी बाजार भरून देण्यापासन त्यो कित्येकांच संसार आर्थिक मदत करून तेंन उभं केल्यात.
ते बी नुसतं इसवासाव लाखो रुपयांची मदत तेंन लोकासनी किली. कुणाला दिलेलं पैस तेंन कवा परत मागितलं न्हायत. मदतीची पेपरला बातमी यावी म्हणून जाहिरात कधी दिली न्हाय. आपल्या आयुष्यात गरिबी आणि परिस्थितीच आलेलं भोग बाकीच्यांच्या वाट्याला नगुत याला म्हणून त्यो मागून आल्याल पैस लोकासनी मदत करून वाटतुय..त्यो पडद्यामागचा प्रामाणिक समाजसेवकच न्हाय तर देवाशी लगीन झाल्याला नामा तेंन मदत केलेल्या अनेक गोरगरिबांचा त्यो खराखुरा देव हाय.
टीप:
जोक्त्यांच्यात नियम अटी असल्यानं १० हजार पासन५० हजारांचा दंड गुरू कडून करत तेला शिक्षा किली जाती म्हणून नामाची मूळ ओळख करून दिली नाही.
खतरनाक 💯💯💯💯🙏
धन्यवाद
मनापासून धन्यवाद🌿🙏