--------------------------------- ======================================

मोटला वाघ जुपनारा सर्कससिंह: परशुराम माळी

गर्दीतला आवाज……

मोटला वाघ जुपनारा सर्कससिंह: परशुराम माळी

विनायक कदम:९६६५६५६७२३

नुकताच गावागावातंनी सोसायट्यांच्या निवडणुकीचा उडल्याला धुरळा खाली बसलाय. निवडून आल्याल्या गड्यानी मग सोशल मिडियावर तर तरच फोटू, त्येज्याखाली यिचित्र वळी टाकून धुरळा पाडाय सुरवात किली. वाघ त्यो वाघच…, मैदान मारलंय वाघान…, वाघ एकला राजा.

सोशल मिडीयावरल्या या वाघासनी म्हायती नसलं पण तासगावच्या येका गड्यांन खरंखुरं वाघ हिरीवर मोटला जुपुन शिती किलती. नुसती सर्कशीत न्हवं तर खरीखुरी. सर्कस देशात आणि परदेशात घिऊन जाणारा ह्यो पट्ट्या मजी सर्कससिंह परशुराम माळी. गाव तासगाव बरं का तेंच…वाघासारखा माणूस.

तासगावात येका कार्यक्रमासाठी सर्कससिंह परशुराम माळी यांचा हॉल सांगलीच्या कुलदीप सरांसंग बगाय गिलू. आणि बऱ्याच काय गुष्टी कानाव आल्या, समजल्या आणि मी हादारलू. कायतर जरा लिव्या म्हणलं. सर्कससिंह परशुराम माळी यांचा पणतू धीरज माळीला पाटलाच्या विक्रांत आणि मी गाटला.

आणि वाघासारख्या पणजोबाच कर्तृत्व धीरज सांगाय लागला. यल्लपा माळ्याचा पोरगा मजी परशुराम. मूळ गाव कवठेमहांकाळ तालुक्यातलं कोकळ. दुष्काळानं पिचल्याला तालुका. रोजगाराच्या शोधात तेंनी तासगाव गाठलं. माळी गल्लीतल्या वाड्यात तेंनी वास्तव्य केलं. बा वकारीत लाकडं फोडायला जायाचा. आणि चौदा पंधरा वर्षांचा परशुराम जनावर हिंडवाय जायाचा.

गडी जनावरामाग काय गप बसतुय वी. जनावर त्येनं सांगिटलं की बसायची, उट म्हणलं की उटायची. त्यो पाटीवर बसून तेंच्याकडन ठरावीक गोलात फिरी मारून घ्याचा. माणसं ही बगून बावरायची. ही कायतर अदभुत रसायन दिसतंय म्हणायची. पण काय जणांनी तेज्यातली कला हिरली आणि सर्कस काढायचा सल्ला दिला.

आताच्या पोर ह्या वयात काय कराय लागली तर तुजी नाळ वाळल्या का रं? आस माणसं म्हणत्यात. पण भाऊनी सोळाव्या वर्षीच सर्कशीच मनाव घेटलं. घरातबी सांगितलं. पन सर्कस काढायची तर पैस कुठायत. काय जणांनी पैस दिल पण ती पुरणार न्हवत.

मग भाऊनी घराव कर्ज काढलं आणि सर्कशीची जुळवाजुळव चालू किली. वयाच्या सोळाव्या वर्षी. ही कुठलीतर काल्पनिक कथा वाचालुय आस वाचकासनी वाटलं पण याच पुराव उपलब्ध हायत. दोन म्हयन हिंडून भाऊनी आपल्याला पायजी तशी कसरती करणारी माणसं हिरली. तासगावात आणून तेंचा सराव तालमी चालू झाल्या. भाऊंच्या कष्टाला येत १६ वर्षाच्या पोरांन काढल्याल्या सर्कशीचा पहिला शो १८९० ला तासगावात लागला. २०० माणसांनी त्या सर्कशीत ल्या कसरती बगून तोंडात बोट घाटली.

तासगावच्या सर्कशीच कौतुक व्हाय लागलं. सुपारया यायला लागल्या. लोकांचं मनोरंजन करायचं तर सर्कशीत प्राणी बी पायजीती ही तेंच्या लक्षात आलं. मग भाऊंनी पैशाच गणित जमवलं आणि बिहार राज्यातन घोड, उंट, हत्ती, अस्वल पोपट आणलं. ही जनावर लहान आसल्याने ती शिकत हुती.

आणि हांटर घिऊन ह्यो मास्तर तेंच्याकडन कसरती करून घेत हुता. सर्कशीचा बोलबाला वाढाय लागला. पैसा, सुपाऱ्या बक्कळ याय लागल्या. सर्कस काढल्यानंतर विसाव्या वर्षी या पोरांन ५०० ते ६०० लोकासनी रोजगार देत तेंची घर उभी किली.

सर्कशिचा शो ब्रम्हदेशात हुता. परशुराम भाऊंना वाटलं आपल्या सर्कशीत वाघ आणि सिंह पायजीत., तेंनी परत बिहार गाठलं. आणि वाघ आणि सिंहांची खरेदी किली. ही प्राणी मजी साक्षात मृत्यूच की. माणसासंग या प्राण्यांचं कदी जमलं न्हाय. पण भाऊ मजी उत्तम मास्तर.

वाघ, सिंहाला तेंनी अरुंद फळीवर चालायला लावायचं. हात्तीच्या पाठीव बसलाय लावून रिंगान माराय लावायचं. वाघासनी हिरीवर मोटला जुपुन पाणी काढायच. वाघाच्या तोंडात हात घालायचा, सिंहाच्या तोंडात मुंडक दयायचं आसल धाडसी काम सुरू केलं.

जीवावर बेतणार ही काम भाऊ चेष्टवारी करून घ्याचं. बगताना प्रेक्षकांचं श्वास वरच्या वर आणि खालच्या खाली राह्याचा. दरम्यान भाऊंच लग्न झालं. घरातल्या मंडळींसंग बायकू बी सर्कशीत सामील झाली. सर्कशीची ही पलटण कूट घिऊन जायाचं मजी युद्धाला निगाल्यागत वाटायचं.

दांडगा पसारा. ट्रकन सामान न्हयायच. सर्कशीची लोकप्रियता ईवडी वाडलीवती की सरकारनं त्यांना रेल्वे व ट्रक वाहतूक आणि दळण वळणासाठी फुकट दिलती. तासगावातन कूट जायाचं मजी रेल्वेसाठी मिरज गाठाय लागायचं. ट्रकला बांधुन जनावरांच पिंजर वडत न्हयायच आणि रेल्वेच्या डब्यातन परमूलखात जायाचं.

येकादया ठिकाणची सुपारी घ्यायच्या आदी भाऊ त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून याच. तित लाईट, पाणी, जागा, चारा, मैदान अशा गोष्टी बगिटल्या की सुपारी फुटायची. तवा काय जाहिराती कराय. आताच्यागत सोशल मीडिया हुता वी. सर्कशीचा तंबू रवाय सुरवात झाली की लोकांच्यात सर्कशीची जाहिरात व्हायची.

तंबू रवाय आठ दिस लागायचं. मग त्या भागात म्हयनाबर सर्कस थांबायची.१९१७ ला सर्कशीचा मुक्काम मुंबईत पडलावता. तवाच नावाजल्याल पुढारी मजी लोकमान्य टिळक. सर्कशीच कौतुक आयकून ते सर्कस बगाय आलं. वाघ सिंह यासनी आज्ञा दिउन धाडसी खेळ करून घेणाऱ्या परशुराम भाऊंची सर्कस बगून ते एवढं प्रभावित झालं की की त्यांनी सुवर्णपदक आणि सर्कससिंह ही मानाची पदवी दिउन सन्मान केला.

भाऊ प्राण्यांवर विशेष प्रेम करत सखाराम नावाच्या देखभाल करणाऱ्या सहयोग्यासह त्यांनी प्राण्यांची निगा आहार यासाठी त्यांनी येगळी माणसं नेमलीवती. जनावरांच्या खाण्या पिण्यावर, व्यायाम व कसरती यावर ते स्वता लक्ष देत.

कुठलाबी छळ न करता ते प्राण्यांना शिक्षण देत कसरती करून घेत. सर्व प्राणी व पक्षी बाराच्या संख्येत असल्याचं धीरज सांगत हुता. परशुराम भाऊंच्या सर्कशीन तासगावसह जिल्ह्यातल्या लोकासनी चांगला रोजगार दिलावता. भाऊ उद्योजक म्हणून आता फुढ याला लागले. सर्कशीचा पैसा पोत्यानं याचा.

पण आल्याला पैसा आपल्यासाठीच न ठेवता साऱ्या जाती धर्माच्या लोकासनी भाऊ वाटत. गोरगरिबांना कपडे ,धान्य स्वरूपात ते मोठा दानधर्म करत. तासगावात तेंनी अन्नछत्र चालू केलंत. गौरी हत्तींनीला पिल्लू झाल्याव तेंनी बारसं घाटलं. साऱ्या तासगावला तेंनी लाडवाच जेवाण घाटलवत. तासगावात काही ठिकाणी भाऊनी जमिनी घेतल्या. भाऊंना शेती गुराढोरांची आवड हुती. वेळ मिळसल्याव ते शेतात काम करत.

तासगावची सर्कस आता महाराष्ट राज्यातच लोकप्रिय न्हवती तर ती भारतात लोकप्रिय होत जहाजांन सिंगापूर ,मलेशिया, युरोपात समुद्रामार्गे गिली. गोऱ्या माणसासनी तासगावच्या या वाघासारख्या माणसानं याड लावलं. भाऊंच्याच प्रेरणेतून त्याकाळी १९२० ला तासगावात २० हुन अधिक सर्कशी सुरू झाल्या.

सर्कस नुसती मनोरंजन करायला सर्कस न्हवती तर त्यात काम करणाऱ्या माणसांचा जीव तलवारीच्या टोकाव आसायचा. त्याकाळच्या नावाजलेल्या किर्लोस्कर मासिकात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी अनेक प्रसंगांना उजाळा दिलाय.

पश्चिम बंगालला मलपायगुडीत सर्कस चालू हुती. छबु नावाची महिला कलाकार नेहमीप्रमाण वाघाशी खेळत हुती. तिच्या अंगावरून उडी मारायचं काम हुतं. मात्र वाघ बिथरला. छबुवर तेंन हल्ला करत तिला तोंडात धरलं. मात्र भाऊ नी चाबकान फटकारे देत तिला साक्षात मृत्यूच्या दाढेतन भायर काढलं. त्यानंतर बरं व्हायला तिला दोन ते तीन म्हयन लागलं. म्हैसूर संस्थानात सर्कस चालू हुती. ३२ फूट पिंजऱ्यात भाऊ सिंहाकडून कसरती करून घेत हुते.

पण अचानक बिथरलेल्या पाच ते सहा सिंहाणी भाऊंवर हल्ला केला. सहाय्यक सखारामन पळ काढला. पळून जाता येत न्हवत समोर सिंह मात्र भाऊंनी न खचता हातातील चाबूक व दांडक्याच फटकार मारलं. सिंह मोठ्यान डरकाळ्या फोडत कुत्र्यागत गपगार बसल. पशुविदयेची देवता या माणसावर प्रसन्न हुती. सिंहांच्या हल्ल्याच्या प्रकारानंतर कर्नाटक राज्यातल्या काय कानडी पेपरनी सिंहाच्या हल्ल्यात परशुराम माळी यांचा मृत्यू आशा बातम्या छापल्या.

भाऊंच कर्तृत्व बगून साक्षात मृत्यू थांबावा अशी भयानक घटना एका रेल्वेप्रवासात घडली. सिलोनला सर्कस निघाली होती. रामेश्वर रेल्वे स्टेशनला सामान भरून सारी मंडळी बसली. रात्रीचा प्रवास आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. सारी मंडळी झोपली.

अचानक धाड धाड आवाज आला. गाडी थांबली पण का थांबली कळना. बाहेर अंधार आणि मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळं बाहेर जाऊन बघता येत न्हवत. मग त्याच अवस्थेत ते डब्यात झोपी गेले. दिवस उजाडल्यावर त्यांनी समोरच दृश्य बघून ते हादरून गेले. रात्रीच्या पावसान पूर येत पुलावर पाणी आलत. त्यात तो जुना पूल तुटला हुता. पण ड्रायव्हर न गाडी पाण्यात घाटली.

तुटलेल्या फुलातून धडा धड डब खाली पडलं. त्यांची मंडळी असणार दोन डब पुलाच्या एका काठाला आरामात उभं हुतं. सारी सर्कस मृत्यूच्या जबड्यातन वाचली हुती. तुटल्याल डब, मेलेली माणसं व समोरचा तो प्रकार बगून साऱ्यासनी आपण जिवंत हाय हेज्याव ईसवास बसणा.

सर्कशीच्या खेळादरम्यान भाऊंचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सारी सर्कस आणि देश व परदेशातल्या सर्कस प्रेमी लोकांवर शोककळा पसरली. मात्र त्यानंतर सर्कशीचा डोलारा १८ वर्षांचा मुलगा विश्वनाथन सांभाळला. लोकांनी गुढ्या उभारून त्येज्या नेतृत्वाच स्वागत केलं.

भाऊंच्या मृत्यूनंतर काही वर्षे सर्कस चांगली चालवली. मात्र सर्कशीत प्राण्यांवर बंदीची मागणी हळूहळू जोर धराय लागली आणि परशुराम लायन सर्कस १९५५ ला शेवटचा खेळ मिरजेत करून बंद झाली. सर्कशीतल्या काय कलाकारांनी स्वताच्या सर्कशी काढल्या. मात्र ज्या प्राण्यांच्या बळावर लौकिक मिळाला त्या प्राण्यांना विश्वनाथ माळी यांनी त्या प्राण्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळलं. प्राण्यांवर बंदी घाटल्यान व करमणुकीची साधन वाढल्यानं आता सर्कशी हाताच्या बोटाव मोजण्याइतपत राहिल्यात.

शेकडो लोकांना रोजगार देणारी, अनेकांच्या कलागुणांना वाव देणारी, मर्दांनगी व शौर्याच प्रतीक असणारी सर्कस संपली. परशुराम भाऊंच्या वारसांनी भाऊंच्या आठवणी व सर्कशीमधील काही सामान चौथ्या पिढीनं जपलय.

तासगावात सांगली विटा रोडला परशुराम भाऊंची भारदस्त समाधी हाय. वारसांनी भाऊंच्या नावं सर्कससिंह परशुराम माळी मंगल कार्यालय म्हणून नाव देत त्यांची आठवण जागी ठिवल्या. भाऊंनी सर्कशीन तासगावच नाव देश विदेशात न्हेल. पण तुमी आमी तासगावकरानी त्यांचा काय सन्मान केला.

त्यांच्या कर्तृत्वाची माहिती नव्या पिढीला माहिती देणार ना दालन उभारल, ना त्यांच्या नावान पुरस्कार सुरू केला, एखादया चौकाला, रस्त्याला नाव, तेंच स्मारकच काय तर २० एप्रिल या सर्कसदिनी पण भाऊंची आठवण आमाला तासगावकर म्हणून येत न्हाय. वाघासारखी पोर आमाला घडवायची आसतील तर वाघासारख्या माणसांचा इतिहास तेंच्या डोसक्यात टाकायला पायजी.

उद्योजक व्ह्यायचाय तर पोरांनी परशुराम भाऊंना अभ्यासायची गरज हाय. मोटला वाघ जुपणाऱ्या या सर्कससिंहाच्या स्मृती जपायची गरज हाय.

8 thoughts on “मोटला वाघ जुपनारा सर्कससिंह: परशुराम माळी

  • May 19, 2022 at 1:56 am
    Permalink

    खूप सुंदर लिहिलंय.
    तासगाव तालुक्यातील , सांगली जिल्ह्यातील प्रत्येकाला माहित असावी अशी माहिती आहे.
    अभिमानास्पद कामगिरी!

    Reply
  • May 19, 2022 at 2:33 am
    Permalink

    खूप अप्रतिम माहिती आहे,
    लेखाचा शेवट खूप छान पद्धतीने शब्दबद्ध केआ आहे.खूप छान….

    Reply
  • May 19, 2022 at 5:31 am
    Permalink

    विनायक जी आपला आम्हास सार्थ अभिमान वाटतो

    Reply
  • May 19, 2022 at 6:00 am
    Permalink

    विनायक सर खूप छान मांडणी, चित्र डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद आहे तुमच्या लिखाणात…. ग्रामीण भाषेचा उपयोग एक वेगळीच मजा आणते वाचताना…. खूप सुंदर…

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *