--------------------------------- ======================================

मोटंला वाघ जुपल्याली ऐतिहासिक पायविहीर:

मोटला वाघ जुपल्याली ऐतिहासिक पायविहीर

विनायक कदम:९६६५६५६७२३

गावाकडं बोलताना आजून बी काय गडी म्हनत्यात आमुक गडी लय धाडशी. वागाला दावं लावत हुता. त्यो मानूस किती धाडशी हुता ही सांगाय ती उदारन हुतं. आता सोशल माध्यमात वाघासंग फोटो टाकून मिरवनाऱ्या राज्यातल्या वाघासनी म्हायती नसलं पन तासगावच्या येका वाघाचं काळीज आसनाऱ्या गड्यांन खरंखुरं वाघ मोटला जुपलवत. सर्कशीत न्हवं तर खरं खरं. तासगावात हीच ती २२५ वर्षांची ऐतिहासिक दिकनी हिर आजबी दिमाखात ऊबी हाय. आनी त्यो वाघासारखा पट्ट्या मजी तासगावचं जगप्रसिद्ध सर्कससिंह परशुराम माळी. तासगावात तासगाव सांगली रस्त्याला माळी मळ्यात ही पायविहीर हाय.

आताच्या पोरं ह्या वयात काय कराय लागली तर तुजी नाळ वाळल्या का रं.?आस मानसं म्हनत्यात. पन परशुराम भाऊनी सोळाव्या वर्षीच सर्कशीच मनाव घेटलं. घरातबी सांगिटलं. सर्कस काडायची तर पैस कुठायत. काय जनानी पैस दिल. पन ती पुरनार न्हवत. मग भाऊनी घराव कर्ज काढलं आनी सर्कशीची जुळवाजुळव चालू किली. वयाच्या सोळाव्या वर्षी. ही कुठलीतर काल्पनिक कथा वाचालुय आस वाचकासनी वाटलं.? पन याचं पुराव उपलब्ध हायत. दोन म्हयन हिंडून भाऊनी आपल्याला पायजी तशी कसरती करणारी मानसं हिरली. तासगावात आणून तेंचा सराव तालमी चालू झाल्या. भाऊंच्या कष्टाला यश येत १६ वर्षाच्या पोरांन काढल्याल्या सर्कशीचा पहिला शो १८९० ला तासगावात लागला. २०० मानसांनी त्या सर्कशीत काम केलं. त्या कसरती बगून मानसांनी तोंडात बोट घाटली.

तासगावच्या सर्कशीच कौतुक व्हाय लागलं. सुपारया यायला लागल्या. लोकांचं मनोरंजन करायचं तर सर्कशीत प्रानी बी पायजीती ही तेंच्या लक्षात आलं. मग भाऊंनी पैशाच गनित जमवलं आनी बिहार राज्यातन घोड, उंट, हत्ती, अस्वल पोपट आनलं. ही जनावर लहान आसल्यान ती शिकत हुती. आनी हांटर घिऊन ह्यो मास्तर तेंच्याकडन कसरती करून घेत हुता. सर्कशीचा बोलबाला वाडाय लागला. पैसा, सुपाऱ्या बक्कळ याय लागल्या. सर्कस काडल्यानंतर विसाव्या वर्षी या पोरांन ५०० ते ६०० लोकासनी रोजगार देत तेंची घर उभी किली. सर्कशिचा शो ब्रम्हदेशात हुता. परशुराम भाऊंना वाटलं आपल्या सर्कशीत वाघ आणि सिंह पायजीत. तेंनी परत बिहार गाटलं. आनी वाघ आनी सिंहांची खरेदी किली. ही प्रानी मजी साक्षात मृत्यूच की. मानसासंग या प्राण्यांचं कदी जमलं न्हाय. पन भाऊ मजी उत्तम मास्तर हुतं.

वाघ, सिंहाला ते अरुंद फळीवर चालाय लावायचं. हात्तीच्या पाटीव बसाय लाऊन रिंगान माराय लावायचं. वाघासनी मोटला जुपुन पानी काडायचं. वाघाच्या तोंडात हात घालायचा, सिंहाच्या तोंडात मुंडक दयायचं आसल धाडसी काम सुरू केलं. तासगावात परशुराम भाऊंनी २२५ वर्षे जुन्या असणाऱ्या देखन्या पाय विहरीला वाघ जूपुन पानी काडलवत. मोटला वाघ जुपायच मजी चेष्टा नाय. तीच ऐतिहासिक देखनी पायविहीर तासगावात आजूनबी दिमाखात ऊबी हाय.

(याबद्दल बारव अभ्यासक महेश मदने म्हनतात)

ही ऐतिहासिक पायविहीर तासगावचे नाव जगात प्रसिद्ध करणारे सर्कससिंह ही उपाधी मिळालेले परशुराम माळी यांच्या मळ्यामध्ये असून त्यांच्या आठवणींना उजाळा देत आजही खंबीरपणे उभी आहे. अंदाजे दोनशे सव्वा दोनशे वर्षाच्या इतिहासाची साक्ष देणारी पायविहीर नियमित वापरामुळे आजही सुस्थितीत व स्वच्छ आहे. अशीच एक याच स्वरूपाची भली मोठी बारव मिरज बेडग रस्त्यावरती असून तीही पटवर्धन सरकारांच्या काळातील असल्याची माहिती मिळते. आपल्या परिसरात असणारा पटवर्धनांचा इतिहास पाहता दोन्ही विहिरी समकालीन असाव्यात असा अंदाज बांधता येतो. अत्यंत मजबूत बांधकाम शैली उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना असून वैशिष्ट्यपूर्ण आहे. या विहिरी वरती तीन मोटा चालवण्याची व्यवस्था आहे. प्रशस्त प्रवेशद्वार डाव्या बाजूने आत मध्ये उतरण्यासाठी पायऱ्या १६ ते १७ पायऱ्यांचे तीन टप्पे पायऱ्यांच्या बाजूलाच दोन दिवळ्या एक मोठी व एक लहान उठ बस व साहित्य ठेवण्यासाठी वापर होत असावा.

एकूण तीन टप्प्यात असणारी ही विहीर अंदाजे ८० ते ९० फूट खोल आहे उजव्या बाजूला मोठ्या दिवळीच्या आकाराचे इंजिन घर आहे. विहिरीमध्ये असणारे जिवंत उमाळे कायमस्वरूपी सुरक्षित राहण्यासाठी त्या उमाळांना पितळी बेंड बसवून पाणी बाहेर काढले आहे. असे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण जपणारी ही विहीर परिसरातील १० एकर पेक्षा जास्त शेतीला पाणी पुरवत आहे व पोहायला येणाऱ्या नागरिकांसाठी मुलांना पोहायला शिकण्यासाठी विहीर दिवसभर चालू असते.अशी माहिती माळी यांचे नातू दिलीप विश्वनाथ माळी, श्याम विश्वनाथ माळी व पनतू धिरज माळी यांनी दिली. अशी ही विहीर तासगावच्या इतिहासात नक्कीच मोलाची भर टाकते. सर्कस सिंह परशुराम माळी यांच्या बऱ्याच आठवणी अजूनही चर्चिल्या जातात त्यातीलच ही एक. सामान्यपणे माणूस मोट ओढण्यासाठी बैलांचा वापर करतो परंतु प्राण्यांवर प्रभुत्व मिळवलेल्या या माणसाने विहिरीवरील मोट ओढण्यासाठी खऱ्याखुऱ्या वाघ सिंहांना जुंपल्याची माहिती मिळते अशा या दैदित्यमान आठवणी जपणारी ही पायविहीर तासगावच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे. अशी माहिती महेश मदने यांनी दिली.

तसेच महेश मदने म्हणाले की महाराष्ट्र बारव मोहीम महाराष्ट्रातील ऐतिहासिक पुरातन बारवांचे ,विहीर पुनर्जीवन, संवर्धन जतन आणि जनजागृती हा उद्देश समोर ठेवून सुरुवात झालेली ही मोहीम आज यशस्वी होताना दिसत आहे. लोकसहभागामुळे ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात पोचली असून आज रोजी १७००पेक्षा जास्त विहीर, बारव, कुंड ,पुष्करणी ,बावडी ,घोडबाव यांचे मॅपिंग करून समाजासमोर आणले आहेत. या मोहिमेचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात विहीर, बारव या यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन, होळकर व पटवर्धन सरकार यांच्या काळात बांधलेले आहेत. सांगली परिसरातील विहीर या बहुतांशी पेशवेकालीन व पटवर्धन सरकार यांच्या काळातील असून तसे शिलालेख ही आढळतात.

नेवरी व कवठेएकंद येथील पुष्करणी मात्र फारच पुरातन आहेत. त्यांचा उल्लेख पुराणात आढळतो श्री केदार विजय या ग्रंथात कवठे एकंद येथील पुष्करणीचा उल्लेख आढळतो. तसेच तासगावची ढवळवेस येतील पिंडीच्या आकारातील बारव सांगली विजयनगर येथील कुंभार मळा येथे असणारी हुबेहूब किल्लीच्या आकाराची बारव, सांगलीकर मळा मिरज येथील गणपती मंदिरा शेजारील पटवर्धन सरकारांची बारव या आकर्षक व उल्लेखनीय आहेत सांगली परिसरामध्ये अनेक आकाराच्या विहीर बारव आढळतात. त्यामध्ये किल्लीच्या आकाराची पिंडीच्या आकाराची, चौकोनी,आयताकृती, लंबगोलाकार ,गोलाकार अशा स्वरूपात आहेत.

बारव या प्रामुख्याने चार प्रकारात आढळतात. नंदा बारव एका बाजूने प्रवेशद्वार असणारी ही बारव, भद्राबारव दोन्ही बाजूने प्रवेशद्वार असणारी ही बारव, जया बारव तीन बाजूने प्रवेशद्वार असणारी बारव, विजया बारव चार बाजूने प्रवेशद्वार असणारी बारव,सांगली परिसरामध्ये दुर्गवेद मित्रपरिवार व महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत ५० पेक्षा जास्त विहिरी मॅपिंग केल्या आहेत. यामध्ये मधुकर हक्के, हेमंत बेले, शिवानंद धुमाळ, सत्वशील कोळी, शैलेश मोरे, अशोक शिरोटे ,शफिक मत वल्ली, श्याम गोसराडे, अधिक कोष्टी यांचा नेहमीच सहभाग असतो.बारव संवर्धन जतन आणि जनजागृती हा उद्देश समोर ठेवून रोहन काळे यांनी सुरुवात केलेली ही मोहीम आज यशस्वी होताना दिसत आहे. या मोहिमे अंतर्गत सांगलीमध्ये लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या बारवांचे छायाचित्र प्रदर्शन होणार आहे. त्याद्वारे लोकांना याची माहिती मिळावी ऐतिहासिक जलसंस्कृतीचा ठेवा समाजासमोर यावा हा एक उद्देश असल्याचे बारव अभ्यासक महेश मदने यांनी सांगितले.

One thought on “मोटंला वाघ जुपल्याली ऐतिहासिक पायविहीर:

  • November 8, 2022 at 9:59 am
    Permalink

    नवीन विषय,नवीन महत्वपूर्ण माहिती घेऊन आलात….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *