मेंगाणवाडीच्या डोंगरातल्या घळया:
मेंगाणवाडीच्या डोंगरातल्या घळया:
विनायक कदम: ९६६५६५६७२३
‘घळ’ मजी ही कायतर नवीन भानगड हाय आस तुमाला वाटलं. आक्षय कुमारच्या राऊडी राठोड पिच्चरमदी घळी चांगल्या बगाय मिळाल्या. डोंगराच्या मदी पडल्याली खोलवर दरीसारखी पन्हाळ. तिला फुटल्याल्या ढीगभर वाटा मजी घळ. कुटली वाट कूट जात्या कळत नाय. नुसता भुलभुलैय्या ओ. आपल्याकडं तशा घळी दुर्मिळ हायत. पण ओंकार तोडकरचा घळीचा व्हिडीओ बघितला आनी उत्सुकता लागली.
तोपीक मास्तरला गाडीव घेटला. आरवड, हातनूर, करत पेडचा घाट सोडला तसा कुटल्यातर नव्या दुनियेत निगाल्यागत वाटाय लागलं. जमिनीपासन हाजारभर फूट उंचीव भार भार वार सुटलवत. वातावरण शांत ,उत्साहीच न्हवत तर येकादा आजारपणातला रोगाट माणूस त्या वातावरणात खडखडीत हुईल आस वाटलं. गाडीवर रमत गमत ,टंगळ मंगळ करत मेंगाणवाडी गाठली. ऊन मी म्हणत हुतं. कुटन कसं जायाचं म्हायती न्हवत. घळया कूट हायत येकाला गाठून ईचारल. तेला घळया म्हणल्याव त्यो म्हणला गया.
आता ईचारायच्या भानगडीत पडाय नगु म्हणून गाडी लावली आणि डोंगराच्या दिशेनं चालाय जुपी किली. डोंगराला बऱ्याच ठिकानी पनाळ पडल्याली दिसत हुती. तितली माती बगून कोकणात आलूय का काय वाटलं. लालभडक माती आपल्याकडं कमी बगाय मिळत्या. पण मेंगाणवाडीच्या घळीत लालभडक मातीचा थर बगत ऊब राह्यला पायजी आसा हाय. आपल्या हातात जशा रक्तवाहिन्या हायत तश्या रक्तवाहिन्या त्या मातीत दिसत हुत्या.
वनविभागाच्या हद्दीतल्या त्या डोंगरात घळीच्या दुनी बाजूला दोन ,तीन,चार परूस मातीचा थर. येक घळ आली की तिला दुसरी फुटल्याली, दुसरीला तिसरी,तिसरीला चौथी घळ नुसता भुलभुलैया. कुठली घळ कूट जात्या तिजा शेवट कूट हाय कळत नाय. काय घळी बारीक बारीक चालत जाताना आंग वाकवून जायाला लागतंय. मदीच घळ्यातनी घुहेगत मुठी भसकी. तेज्या भायर पडल्याली हाड. आत कोणतर जंगली खवण्या आसल्याची साक्ष देत हुता.
पाऊस न्हवता पण फेब्रुवारीच्या भर उन्हात त्या मातीत पाणी हुतं. तेजा पाजूर खाली तळ्याला जात हुता. पाऊस आसल्याव घळीत पाणी पडून पडून मनानं रांजनखळग तयार हुत्यात. त्यात साठल्याल पाणी निसर्गातल्या जीवांना उनाळच प्याला मिळतंय. पाणी पडून पडून निसर्गातून आपोआप तयार झालेल्या त्या घळीबद्दल कुणाला लय म्हायती नाय. निसर्गात किती ताकत हाय , त्यो कायपण करू शकतोय त्या घळी बगीटल्याव कळतंय.
पाऊस उगडलाय. पण घळीच्या मार्गातनी झाड झुडपं उगवल्यात. त्यामुळं काय ठिकाणी आत जाता येत नाय. पाखरांचा किलबिलाट सुडून त्या ठिकाणी कानाव काय येत नाय. प्रचंड निर्जन आणि शांत आसल्याल्या त्या ठिकाणी शिकारीला, आणि शेरड, म्हसर हिंडवाय काय गडी जात्यात. तेज्या खुणा दिसत्यात. मेंगाणंवाडीच्या या घळी मजी निसर्गाचा अनमोल ठेवा हाय. त्यो देखणा ठेवा जपन्याची गरज हाय. घळीतन येणाऱ्या पाण्याच्या मार्गात दोन पाण्याची तळी हायत. घळीतन पाण्याचा पाजूर फेब्रुवारी म्हयना लागला तरी आजून तळ्यात सुरुय. येका घळीच्या तोंडाला जुन्यातली दगडी बांधकामाची हिर हाय. पाणी भरून तोंडाला आल्या. निळझार पाणी बगणाऱ्याला हिरीत उड्या मारू का काय आस हुतय.
घळया निर्जन जाग्याला हायत म्हणून वाचल्यात. पण तेज्याव बी माणुसप्राण्याचा हस्तक्षेप वाढला तर त्या कायमच्या नष्ट हुत्याल. घळ्यात हिंडताना किती टाईम गेलं कळाल नाय. दिस मावळतीकड झुकत हुता. घळया डोळ्यात साठवून परतीचा मार्ग धरला. तासगावकड येताना रस्त्यात दिशी बोरान लकडल्याली झाड आमी खायाला यायचीच वाट बगत हुती का काय कुणास ठाव. ऊन खाली झालंत. काय जण रानात हारभर काढत हुती. काय घव कापत हुती. उनांन पाकाळल्याळी म्हसर सावलीला ईसावा घिऊन हिंडत हुती. म्हशीच्या आंगावरल्या माशा खायाला धटिंग कोतवाल ,आणि बगळ्यांनी मशीचा ताबा घेटलावता. पेड खानापूरच्या मातीत, निसर्गात सारी जैवविविधता हाय त्या माणसांनी जपल्या. उमाटाला वार भार भार सुटलवत. बोरं तोडायच्या नादात ढाळ हालुन तेज काट बोटात घुसत हुतं. पण बोराचा गोडवा त्या वेदना जाणवू देत न्हवता. लालभडक सूर्याचा गोळा दिस बुडल्याच सांगत हुता आणि घाटात वळण घेत घेत आमची गाडी तासगावच्या दिशेनं धावत हुती.