शंभर वर्ष मावल्याचा जागता पहारा:
शंभर वर्ष मावल्याचा जागता पहारा:
विनायक कदम:९६६५६५६७२३
पंधरा ते वीस फूट रुंद व खोलीचा अंदाज न येणारा काळाकुट्ट दगूड म्हजी मावल्या . दगडाच्या शेजारी वाहणार ओढ्याच पात्र व त्यात ४० फूट रुंद व १० फूट खोलीचा डोह गेली १०० वर्षांहून अधिक लोढ आनी सावरड्याच्या लोकांच्या परिचयाचा. या दगडाच व डोहाचं नाव मावल्या का पडलं कुणाला सांगता येत नाय. मात्र आमच्या शेताच्या शेजारीच ओढयाच पात्र व डोह असल्यानं या मावल्यावर जरा लिहावं वाटलं.
मावल्या म्हणजे काळाकुट्ट दगड. दगड म्हणजे गेली १०० वर्षे जणू ओढ्यालाच जागता पहारा देणारा गोरख्याच. २० वर्षांपूर्वी पाऊसपाणी वेळेवर यायचा मुसळधार पाऊस पडल्यानं ओढ्याच पात्र भरून व्हायच. यावेळी पात्र सोडून मावल्याच्या डोकीवर १० फूट पाणी यायचं. .रात्री पडलेला पाऊस व खडूळ पाण्याने भरून आलेला वडा पहाटेच्या दरम्यान शांत होऊन वाहायचा. या पाण्यानं अंगावरील माती धुवून गेल्याने मावल्या अधिकच काळा दिसायचा. शेवटी दगडच त्यो.
मग काय घरातल्या चादरी ,वाकळा घरा घरातन गावातन धुवायला महिला मावल्याड जायच्या. कारण काय तर मोठा दगड व ऐसपैस जागा व स्वच्छ पाणी. गडी माणस या अजस्त्र डोहात एका बाजूला जनावर धुयाची. तर पोहायला शिकायला व शिकलेल्या पोरांच्या डोहात उड्या पडायच्या. डोहाच्या कडेला निरगुडीचा मोठा तट होता. दगडाचा एखादा आडोसा घेत इरुळा डोहातील सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून असायचा. तो मधेच पाण्यात आल्यास पोराची धांदल उडायची. मावल्यावर सर्व कपडे दिवसभर वाळवले जायचे. ५ च्या दरम्यान घड्या घालून घेत माणस घराकडे परतायची .
पूर्वीच्या काळी वड्याला बरेच दिवस पाणी व्हायाच. कडक उन्हाळा सुरू होऊन उपसा सुरू झाला की पात्र आटायच वडा कोरडा पडायचा. मात्र मावल्याचा डोह पात्र कोरड पडल्यानंतर किमान महिना दीड महिना पाझरलेल्या पाण्यानं भरलेलं असायचा. यात बारीक माशांच्या चिंगळ्या ,खेकडं, पकडायला पोर मावल्यावर बसायची. चरायला येणारी गुर मावल्याच पाणी पिऊन तृप्त व्हायची. सावरडेच्या डोंगरातील जंगली जनावर रात्रीच्या वेळी पाणी प्यायला मावल्यात यायची. बैल घेऊन शेतात नांगराला गेलेला बाळू मामा बैल सोडायला नकोत म्हणून गाडीला जुंपलेल बैल तसच पाण्यात घालत. पाणी पिऊन डोहातून बैलगाडी निघाल्यावर डोह खडूळ व्हायच मात्र डोहात पाणी प्यायला दुसरं जनावर यायच्या आधी पाण निवळ प्रामाणिकपने पाणी स्वच्छ करत .
उन्हाळ्याची तीव्रता वाढली कि पाणी कमी व्हायचं आणि एका पायावर शिकारीसाठी बसलेले तपस्वी बगळे विद्युतवेगान चोचीत मासे पकडायचे. खेकडे मावल्याच्या शेजारी चिखलात बीळ करुण दिवस काढत. थोडे दिवस डोह कोरडा पडायचा ,मात्र पावसाळा सुरू झाला की पुन्हा पात्र वाहायच. गेली १०० वर्ष हे चक्र सुरू आहे .श्रद्धा म्हणून डोहाच्या विषयी शेतकरी कृतज्ञता व्यक्त करतात .
अलीकडं माणूस बदलला व निसर्गाची हानी केल्यानं निसर्गही बदलला. आता मावल्याच्या अंगावर माती साचलीय , डोह गाळाने भरलाय. त्यामुळं त्याची खोली ४ ते ५ फुटच झालीय .निर्गुड्याच ठाळ्यानी डोह झाकोळून गेलाय. आता उन्हाळ्यात काय पावसाळ्यातही ओढा वाहताना दिसत नाही .मात्र अजूनही मावल्या जागता पहारा देतोय……