मारका कोंबडा:
मारका कोंबडा……
विनायक कदम:९६६५६५६७२३
कोंबड्या, कुत्री, शेरडं, म्हसरं, गया, बैलं ही जनावरं म्हणजे ग्रामीण भागाचं वैभवच..! जुन्या काळात या जनावरांच्या जिवावरच गावगाड्यातलं आर्थकारण चालायचं. त्यामुळं पय पावन आल्यावर घरातनी खायाची हयगय नसायची. कोंबड्यावर तर त्याकाळी ग्रामीण भागाचा उदरनिर्वाह चालायचा. कोंबड्यामुळं हुनाऱ्या घाणीला, टेज्या वासाला नावं ठेवणारी तथाकथित प्रतिष्ठित मंडळी आता 'दिशी खाणं' म्हणत कोंबड्यावर ताव माराय लागल्यात. नोकऱ्या मिळंनात म्हणून शिकल्याली पोरं आता कोंबड्या पाळून उद्योजक व्हाय लागल्यात. आमच्यातबी आधी बऱ्यापैकी कोंबड्या हुत्या. त्यातल्या काय मुंगसांनी पळवल्या,
काय दगाड घालून मारल्या, तर काय खान्यावारी संपल्या. खुरुडं मोकळं पडत आलतं; पण व्हल्याच्या वजनाची१ दिशी कुंबडी तिवडी शेवटपर्यंत तग धरून हुती. इकटीच बिचारी. तिजाबी कुणीतरी दगुड घालून पाय मोडला. चालाय ईना म्हणल्यावर डोळ्यामागारी कायतरी हुदि; म्हणून मी नायकाच्या एका माणसाला दिऊन टाकली. कोंबड्यांचा बिमोड झाला. सगळ्याच कोंबड्या संपल्या. तेज्या आधी आमच्यात एक बारकी कुंबडी हुती. तिनं मोराची अंडी घुळून पिल्ली काडली हुती. ती कुंबडी आजून माझ्या धेनात हाय..!

आता खरं सांगायचं तर... कोंबड्या आणि कुत्री या दोगांविषयी आमच्या कदमांच्यात दांडगा राग. ही कुठं दिसली म्हणलं; की कदमांची माथी भडकलीच म्हणून समजा..! 'हाड हाड... शुक..शुक..' करून त्यासनी हागुट-मूत येक करणार..! कुत्री जनावरांच्या भरड्याच्या पाटीत त्वांड घालत्यात म्हणून आणि कोंबड्या श्यान यिस्कटत्यात, कुठंबी हागत्यात म्हणून.. ह्यचा तेंच्यावर लय राग.! कुत्रं कुठं जर टप्प्यात घावलं; तर उचलणीचा धोंडा तोफगोळा गेल्यागत जायाचा. नेम लागला तर त्या कुत्र्याचं काय खरं न्हाय.! कोंबड्या तर 'खोड खोड' असा नुसता आवाज जरी आला तरी; 'कुठं घालून घिव?'
कुंमडी जमातीचा घरातून वसखंड झाला; पण तल्लफ म्हणून म्या रेडिमेड पिल्लं आणून जाळीत ठिवली. काळी, तांबडी, करडी अशा वेगवेगळ्या प्रकारची ती पिल्लं लहानपनी चोचीनं खाताना बघून बरं वाटायचं. त्यासनी आय न्हवती; मग बलाचा उजीड आय हून त्यांना रातभर ऊब द्यायचा. दिवस जात हुतं तशी पिल्लं मुठी होत हुती. दिखणी दिसायची. आता तलंगा व कोंबडं यात फरक दिसत हुता. निम्मं कोंबडं व निम्म्या कोंबड्या हुत्या. जशी जवानी वाढत हुती तशी सारी नव्या नवरी-नवऱ्यागत दिकनी दिसाय लागली हुती. तब्येतीनं सगळी बरोबरीचीच; पण थव्याचं पालकत्व एकाकडं हुतं.
गडी जबाबदार हुता आणि सगळ्यांपेक्षा जरा ताकतवान हुता. भेदक व करारी नजर, लालभडक शिरगिर, तलवारीगत धारदार चोच, गळ्याखाली लाल भडक बैलागत पुळी, मानंला फिक्कट पांढरा कलर, छाती मिलिटरी भरतीला जाणाऱ्या पोरागत कायम फुगल्याली, पाठीवर करडा तर खालच्या बाजूला काळा कलर, शेपटाचा नुसता घडवल्यागत देकना झुपका, खांब उभा केल्यागत पाय, पायाला बोटभर लांब नक्या..! गरुडागत लालभडक पंजा आणि खाऊन खाऊन मातलेला मारका व प्रचंड दहशत असणारा हा आमचा पैलवान..!
जवानी जशी वाढत हुती; तसं कोंबडं भूलल्यावानी कराय लागलं हुतं. जाळीतच सर्व ख्योळ चालायचा. जाळीतलं बाकीचं गडी, गरीब बघून एखाद्या कुंबडीला हेरायचं आणि चार पाच जण तिच्यावर तुटून पडायचं. योक उराव बसला तर दुसरा तोंडाकडं मारायचा, कोण पकं उपसायचा. योक चावून झाला की दुसरा उरावर बसायचा. आपल्या भाषेत त्या कोंबडीव सामूहिक बलात्कारंच ओ..! कोंबडी पार घायला यायची. पण ह्यो पैलवान असा अत्याचार दिसला; की पळत यायचा आणि घावंल त्या कोंबड्याला ताणून ताणून मारायचा. कोपऱ्यात त्वांड घालून कोंबडं बसायचं; पण ह्यचं मन शांत हुइस्तवर ह्यो सुट्टी देत न्हवता.
त्याच्या शिरगिरा चावून चावून रक्तबंबाळ करायचा. त्यामुळं त्याला सारी टरकून असायची. मजी ह्यो त्या सगळ्यांच्यात हिरोच ओ.! सगळ्या कोंबड्या एकतर्फी हेच्यावरच प्रेम करायच्या. ह्यच्याच मागं फुडं धावायच्या. मार मिळूनबी बाकीची गडी काय सुधरत न्हवती. हुबलाक हुती. यिकटी कुंबडी घावली की बलत्कार ठरलेला.! वस्तीवरचं काय काय कोंबडं आमच्या कोंबड्यांना रानात यिउन तानाय बघायचं.
पण आमचा पैलवान काय सादा हाय व्हय. ताणून ताणून बेजार करत त्यांच्या उराव बसायचा. चोचीनं पकं काडून, शिरगिर तोडून काढत रक्तबंबाळ करायचा. परत त्यो कोंबडा हिकडं यायची हिम्मत करायचा न्हाय. पैलवानचा दांडगा वचक हुता. त्याचा ह्यो दरारा वाढत असल्यानं त्यो चांगलाच माज्या मनात भरला. हेला ‘ब्या’ ला ठेवायचं ठरवलं आणि बाकीच्या कोंबड्यांचा बाजार केला. दहा-पंधरा कोंबड्यात गडी राजावानी वावरायचा. काय खायाला लागला; की मोठाला घास घ्यायचा. नरड्यात जायना तर मानंला झटका दिऊन परत आत घालायचा प्रयत्न करायचा. पाणी प्याय लागल्यावर एखादा माणूस पाणी पेल्यागत; शिरगिरीवरनं गळ्याव पाणी यायचं. पळाय लागला तर बाहुबलीतला ‘प्रभास’ आल्यागत वाटायचं. बसला तर रुबाबात.! त्याचं सगळंच जगन राजावानी हुतं..!
आलीकडं गडी जरा मारकुटा झालाय. तेला कोंबडीला जरी धराय गेलं; तर गडी तानल्याशिवाय आणि उड्या मारून टोच्या घातल्या शिवाय सोडत न्हाय. तेच कुत्र्याच्या बाबतीत पण हाय. कसलंबी कुत्रं आसुदी, गडी त्यच्या मागंच लागतुय. भीती नावाचा प्रकारचं न्हाय. नुसता तंबत हुबा ऱ्हातुय. लय देखणा गडी; पण जबाबदार बी तेवढाच. उकरड्याव हिंडाय लागला की स्वता उंच ठिकाणी काही न खाता हुबा ऱ्हाउन जागता पहारा देणार.
कोंबड्यांना काय धोका वाटला; तर वरडून जागं करणार. ठराविक येळंत पल्लेदार आवाजात “कोको… को..” असा आवाज साऱ्या शिवारात जाईल असा वराडणार. दोन वर्षांपूर्वीचा गोंडस गडी आज चांगला 3 किलो वजनाचा झालाय. त्याचं देखणं रूप व दरारा याची लय भुरळ पडल्या. त्यामुळं त्याला सूरी न लावता त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्याला सांभाळायचं, आसं ठरवलंय. एखाद्या मॉडेल प्रमाणं त्याचं भरपूर फोटोबी घेतल्यात. अगदी उकरड्याच्या कडंला बगळ्यागत एका पायावर हुबं ऱ्हाऊन…!
विनायक,तुझा मनापासून अभिमान वाटतो.गर्दीतला आवाज साता समुद्रापल्याड पोहचत आहे.गर्दीतला आवाज म्हणजे रांगड्या ग्रामीण महाराष्ट्राचा खणखणीत आवाज होय.
मनापासून धन्यवाद साहेब
👌👌👌