--------------------------------- ======================================
गावाकडचं फोटो

लेंगऱ्याच्या यिलास शेठनी बैलांच पुतळं उभारल्यात:

लेंगऱ्याच्या यिलास शेठनी बैलांच पुतळं उभारल्यात:

विनायक कदम: ९६६५६५६७२३

राज्यात बंद पडल्याल्या बैलगाड्या शिरती परत सुरू झाल्या आनी नाद येकच येकच बैलगाडा शर्यत ही गान राज्यात धुमाकूळ घालायला लागलं. मोबाईलच्या रिंगटोन पासन कुटल्याबी कार्यक्रमात ही गान धुरळा उडवाय लागलं. बैल आनी शिरती मजी ग्रामीण भागाचा आत्मा. ह्यो नाद बगनारासनी वाटतूय तेवडा सोपा नाय. जनावरासंग जनावरं व्हाय लागतंय. जपाय, जीव लावाय लागतंय. तेला बी भावना हायत. पन आता मानस मतलबी हायत. पन प्राण्यांवर प्रेम किती आसाव. आसल तर ती कुटपर्यंत मानूस जाऊ शकतो ही बगायच आसल तर तुमाला सांगली जिल्ह्यातल्या विट्या जवळच्या लेंगऱ्याला जायाला लागलं. लेंगऱ्याच्या यिलास शेठनी मानसाचं न्हवं आपल्या लाडक्या बैलांच पुतळ उभारून तेंच्या स्मृती जपल्यात.

लेंगऱ्याच विलास शेठ मजी भन्नाट मानूस. सोन्याच्या व्यावसायात प्रामानिक काम करत शितीची आवड ठेवनारा. नुसत्या ६५ वर्षांचा तरून. घरची सव्वाशे येकर जमीन. रानात, हाब्रेट, घव, मका, शाळू, सोयाबीन, उडीद, मूग, तूर ,मटकी, रताळ, गाजर ना ना तरची पीक. धान्य, वैरन बक्कळ कितीबी खावदयाती जनावरं.
घरात कायम तिसभर खुट्याची दावन. दिशी गया, तरनी खोंड, बैल, म्हशी, रेडक, घोडं, आसली सारी जनावरं. नुसती ती जनावरं न्हवती बगनारा बगत उबा राह्यला पायजी आसली हात्यार हुती. त्यासनी वैरन, भरडा, धुन पाकाळणं, गोंजारन, शिरतीच्या बैलासनी तालीम, व्यायाम , खान, आवताच्या बैलासनी लागवड आसल सारं धंद स्वता विलास शेठ करायचं. घरात दोन, तीन दिशी गया हुत्या.

तवा काय डाकटर कडन गया भरवत न्हवती तर बैल दावत तेंच नैसर्गिक संबंध घडवून मानस आनत हुती. चांगलं वळू बैल तवा गावा गावातनी मानसांच्यासकड आसायचं. देकना,आवलाद चांगली बगून मानस वळू गयला सोडायची. आताच्यागत जनावरं गाबडायचा प्रकार तवा लय न्हवता. येगदा बैल दावला की जनावर गाबच राह्याचं. खिलार आनी लांबार उबार गयासनी आटपाडी भागातन चांगलं वळू दावलवत. गर्भार गया बाळत झाल्या. आनी घडवल्यागत दिकनी पान खोंड दुनी गयासनी झाली. जलमल्याली चार दिसाची खोंड बगनाऱ्या गड्यासनी म्हयन्याभराची हायती आस वाटायच. यिलास शेठनी लय खोंड बगीटली पन ह्या दुनीच देकनेपन काय येगळच हुतं.

गयला पिऊन,भरड खाऊन गडी जवानीत येत्याल तस नुसतं घोड्यागत दिसाय लागलं. मानस बगाय याय लागल्याव तर विलास शेठला त्यासनी कूट बांधू आस झालं. दीड वरसाची झाल्याव छकड्याला जरा जुपून तालीम दयाला पायजी की.? आजून गडी म्होरक्याव हुतं. रानांत दोन दोन कासर लाऊन न्हेल. खाऊन उमातल्याली खोंड गप बसत्यात वी. छकड्याला जुपाय आनुस तर चार गड्यांचा तेंनी पाळना केलता. जसं जुपून गडी माग सरलं तसं गडी बेफाम उधळलं. किती पळतुय, काय करतूय ही त्यासनी कळत न्हवत. मोकळं रान घावल तिकडं चौकरया उदाळली. पळून पळून कडावा झाल्यावर फिसलून मनानं थांबली. पन गाडीत ईलास शेठ ची सुदा तेंनी आब्दा किलती. कासर वडून वडून हात रक्ताळल्यागत झालंत. तेंनी लय खोंड बगिटली पण हेंचा ताव काय निराळाच हुता.

सोडाय, बांदाय म्हूरकीन आब्दा करत चार गड्यांचा लोमकाळा व्हाय लागला. तवा नाकात येसन ववली. चार दिवस थंड आलं पन आंगातला ताव काय कमी झाला न्हवता. वय वाडाय लागलं तस गडी आनीक देकनपानं दिसाय लागलं. ईलास शेठ नी येकाचं चातुर आनी येकाच लकुळ नाव ठेवलं. छकडा आता त्यासनी किरकोळ वाटाय लागला. तवाच्या लाकडी बैलगाडीचाबी धुरळा उडवाय लागलं. खाऊन मातल्याली जनावरं. तेंच देकनपन बगून ईलास शेठ खायाला बचा बच घालायचं. तेंची ताकत बगून ठरवलं. ह्यासनी रानातल्या कामालाच नुसतं जुपायच. रानात शम्बर नंबरी नांगुर दोग दुमता करायचं. चार, सा बैलाच्या नांगरान नांगारल्यागत लोकासनी वाटायचं. खाऊन पिऊन उपाटल्याल गडी घोड्यावानी पल्लदार, भारदस्त दिसाय लागलं. तेंच रूप आनी काम बगाय मानस जवळचीच काय कर्नाटकातन यायला लागली. ईलास शेठचा त्यासनी आणि तेंचा ईलास शेठला इतका लळा लागला की नुसत्या नजरेनं भावना वळकाय लागलं.

मुळात जनावरं आनी बैल हेंच्याव ईलासरावांच विशेष प्रेम साऱ्या पंचक्रोशीला म्हायती. घरची शिती हेंच्या कष्टान फुलली. राब राब राबून जवानी सम्पली. तशी ईलासरावांनी तेंच आवत बंद केलं. तेंनी आता नुसतं बसून खायाच म्हनत त्यासनी शासकीय भाषेत सेवानिवृत्त केलं. दोगासनी काम नसलं तरी तेंचा खुराक, जपन, तेंची बाकीची काळजी घ्याय काय हायगय न्हवती. ईलासरावांच्या साऱ्या घरादाराला त्यांचा लळा लागलावता. वय झाल्यान दोगांचाबी घरच्या दावनीला जीव गेला. ईलास शेठ धाय मुकलून बैलांच्या गळ्यात पडून रडल. त्या दोगांच्या जिवाव मळा फुलला, त्यांचा अवखळपना, तेंच रूप, कामं सारा भूतकाळ त्यासनी आठवला. विटा लेंगरे रस्त्याच्या कडला त्यांचं रानं. रानात बांदाला दोगासनी पुरल. मानसांची माती लोटत्यात तसं माती लुटली. दहावा, तेरावा केला. ईलास शेठच बैलांच प्रेम बगून मानस आश्चर्यचकित झाली.

बैलांच्या जान्यान ईलास शेठनी हातरुन घाटल. रानात जायनात. गोट्यात जायनात. बैलांच्या आठवनीनं ती घायाळ झालत. घरच्यानी, भायरच्या मानसांनी समजूत काडली. पन बैल काय डोसक्यातन जायनाती. तेंची आठवन जपाय काय करायच तेंच्या डोसक्यात थैमान घालत हुतं. तेंच्या लक्षात आलं. समाजात, राजकारनात चांगलं काम करनाऱ्या लोकांचं, नेत्यांचं पुतळ बांधत्यात. मग आपल्या बैलांनी चांगल काम केलंय आपुन तेंच पुतळ बांधायचं. गावात योक मूर्तीकार हुता. तेला बोलवला. दुनी बैलांच फोटू दावलं. आसल बसल्याल दोन पुतळ मला जरून पायजीत आस सांगितलं. मूर्तीकार बी चाट पडला. येव्हड्या वर्षात तेंन बैलांच पुतळ करा म्हनून कोन आला न्हवता. तेज कसब पनाला लागलं. जीव तोडून तेंन सा म्हयन्यात चातुर आनी लकुळ दावनीला निवांत बसल्याच पुतळ उभारलं. ही पुतळ बगून ईलास शेठच्या डोळ्यातंन पान्याच्या धारा लागल्या. मुर्तीकारान जीव वतून हुबेहूब दोगासनी घडवलं हुतं. पुतळ बगून ईलासरावांच दुःख कुटल्या कूट पळून गेलं.

कडावा हुसतर ती बैलांच्या पुतळ्याजवळ बसून न्ह्याहाळायचं. दोगासनी जाऊन वरीस होत आलं. वरीसराद धडाक्यात घालायचं तेंनी ठरवलं. तवर तीत पुतळ झाकून ठेवलवत. वरीसराद घालायला गावाला, पय पावन्यासनी निरोप गेलं. भव्य मांडव घालून मानसाच्या वरीसरदागत तेंनी थाट केलता. कार्यक्रमाला आल्याली मानसं चातुर आनी लकुळचं पुतळ बगून चाट पडली. साऱ्यानी ईलास शेठच्या बैलांच, त्यांच्या प्रेमाचं कौतुक केलं. वीस वर्ष जेनी माझ्या रानात काम केलं, मळा फुलवळा त्या बैलांच्या आटवनी पुतळा उभारून जपन मजी आचाट काम हाय. ईलासरावांच्या मळ्यात रस्त्याकडला ही पुतळारुपी जोड निवांत गोठ्यात बसल्या. रस्त्याला येनाऱ्या जानाऱ्या मानसासनी तेज आप्रुप वाटतंय. वरीसराद, बेंदराला दोगांच्या आठवनीनं घर व्याकुळ हुतय. त्यासनी निवद दावत्यात. ईलासराव म्हनत्यात मानूस काय जनावरं बी चांगलं काम करत्यात तेजी आठवन आपल्यालाच काय येनाऱ्या पिडीलाबी राह्याला पायजी. ६५ वय आसनारं ईलासराव १०० म्हशी म्हशी आनी शिरतीची बैल आजून पोटच्या पोरागत पाळत्यात. कवा गेला तर बगून या पुतळ आनी तेंची जनावरं बी….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *