लकसू दाडी:
लक्सू दाडी
विनायक कदम: ९६६५६५६७२३
गावाकडं गावगाड्यात पन्नास तरची पन्नास माणसं आस्त्यात. मूलखायेगळी, तरवाईक, शिव्या देणारी, आपल्या सव, नाद ,वागणं नायतर कामान लोकातनी वळख झाल्याली. आमच्या गावात आसलंच एक पात्र मजी लक्सू दाडी उर्फ लक्सू आप्पा. सत्तावन्न नायतर आठावन्न वरसाचा गडी मजी एखाद्या पिच्चरमधला जणू खलनायकच. साधा शर्ट, साधी प्यांट, मनगाट भरून दोरा, काळी पांढरी झाल्याली दाडी, गळ्यात चेन आणि माळ, पायात साधं चप्पल. अट्टल दारू पेणारा गडी पण आता माळकरी झाल्याला. बोलणं कमी आयकायच जास्त. मोठं डोळ, त्याव काळा चसमा, भारदस्त आवाज, हासन तर सुडून दया, लय खोलातल कायतर बोलणार. चुकीला चूक आणि चांगल्याला चांगलं म्हणायचा स्पष्ट वक्तेपणा. सामाजिक कामाचा गड्याला लय नाद. घरचा काम धंदा सुडून ,पैस खर्च करू लोकांच्या शिव्या खाऊन गावात सामाजिक कामाला कायम फूड.
दुसरी शाळा झाल्याला लक्सू आप्पा पाच वर्ष येकाच वर्गात. बराबरच भाव शाळा शिकायचं पण ह्यो शाळा सुडून वड्यानी मास धरत बोंबलत फिरायचा. दुसरीतनच मग शाळला नारळ दिउन रानात गाडून घेटलं. ७२ च्या दुष्काळात चिचणीच्या गोप्या शिप्प्या कडन एक आणि पेडतंन येक रेड आणत शिती सुरू झाली. परिस्थिती बेताची. शेताला खातमूत नसायचा, पाणी नसायचं लय पिकायच न्हाय. १९८० ला द्राक्षबाग घाटली आणि दुष्काळ पडला. हिरीला पाणी न्हवत फोडायची म्हणल्याव बा म्हणला चाकरीला जा आणि मग हिर फोड. शिती पिटुदी म्हणत मग मुंबयचा रस्ता धरला. १३ वर्ष डायवरकी करून परत गाव गाटलं. परत शिती सुरु झाली.

आप्पा आणि तेंच गावातल दोस्त मजी सारी तंगाड टूळी. कवलग्याच्या जग्या रामुशाच्यात दारू प्याला जायाची. रात ना दिवस गडी दारूत. आता माळ घालायची म्हणून अशोक बुध्या कडन साडेतीनशे रुपय घेटलं. पंढरपूर पातूर जाउस्तर दारू हाणली. चंद्रभागेच्या पाण्यात पडल्याव उटाय कवा येतंय. तसच उठून महाराजांकडन माळ घाटली आणि गाव गाठलं. गावात आल्याव दोस्त काय सरळ बोलत्याती वी. जुडीदार आलं दर्शन घ्या, नालायक बुवा, लायकीचा बुवा, आता माळ घालून गाळ काढा आसल बोलाय लागलं. तेंच्या बोलण्याकड ध्यानच दिल न्हाय आणि येगदाची दारू सुटली.
आप्पाला सामाजिक कामाचा दांडगा नाद. गावातल कुटलबी धार्मिक कार्यक्रम, माणूस मेल्याव, कोण अडचणीत आसला माणूस बिन बोलवता हाजर. गावात कुटलबी शासकीय काम चालू आसल, रस्ता आसल तर दिवस दिवस स्वता उभा राहून त्यो चांगलं कर्तुय का न्हाय कर्तुय बगत ऊबा राहणार. काम चांगलं करत नसलं तर काम बंद पाडणार. गावातल काम चांगलंच झालं पायजी. गाव सुधरावा, गावातल्या जुन्या परंपरा , वाड वडील हेंच्यापासन आल्याला चालीरीती जपाव्यात. झाड लावावी. शाळा कमी झाली आसली तरी चांगलं काय वाईट काय हे समजत नव आयकायची शिकायची उमेद ठेवणारा ह्यो माणूस.
गावातला गोपाळकाला आठ दिवस देवळात तळ मारून घरची जबाबदारी आसल्यागत काम करणार. खराट घिऊन कुत्र्याच गु काढायसुद्धा मागफूड बगणार न्हाय. मान सन्मान आसल तर कवाच आपेक्षा ठेवणार न्हाय. दिवाळीत हुणारी गावातली पिपळाच्या पारावरली व्याख्यानमाला चालायला बी ह्या माणसाचा हातभार हाय. स्पीकर लावून माणसं गोळा करण्यापासन, झाडलोट, बसाय हातराय, माईक पासन काड्याची पिटी, पावण आलं गेलं, च्या पाणी, ती माणसं घरला घालवोस्तर ह्यो माणूस कदी घरला गेला न्हाय. सामाजिक काम करताना कधी हिकडला हिकडं रुपाया करणार न्हाय. कोण चुकला तर त्यो कोणबी आसुदी तितच तेला त्या भाषेत समजवाय बी कमी करत न्हाय. भारदस्त आवाज आणि बोलायची शैली आवाज चढवून आसल्याण मांनसासणी ह्यो भांडतुय आस वाटतय. पण गडी आतन फणसागत हाय. तेंच मार्मिक बोलणं नव्या माणसाला समजत न्हाय,आणि हेजा काय उद्देश हाय ही कळत बी न्हाय.
आता गावाकडं बी विकासाच वार फिराय लागलंय. सामाजिक काम करताना लोकासनी आता लाज वाटत्या. घरच खाऊन लष्कराच्या भाकऱ्या का भाजायच्या. आपण भल आणि आपलं काम भल आस माणसं म्हणत्यात. पण लक्सू आप्पा गत गावोगाव आशी माणसं हायत तेंनी गावगाडा आजबी जिवंत ठेवलाय…….. लोकांच्या भाराबर शिव्या खाऊन.