जिसका कोई नहीं उसका तो “अस्लम” है यारो..!
गर्दीतला आवाज:
विनायक कदम:९६६५६५६७२३
जिसका कोई नहीं उसका तो “अस्लम” है यारो..!
"दो दिन कि है जिंदगी, हमें अपना फर्ज निभाना है...!" एका हिंदी चित्रपटातील ही फार अर्थपूर्ण गाणं..! ऐकायला बरं वाटतं.! पण त्याप्रमाणे जगण्याचा विचार फारसं कुणी करत नाही. माणूस म्हणून आम्ही जिवंतपणी कधी कुणाची पर्वा करत नाय ओ.. मग मेल्याव काय अवस्था.! मेलेलं मढं... मग ती कुणाचंही असो; त्याच्या वेदना सारख्याच.! अशा मढ्यांचीही आपलेपणाने काळजी घेणारा माणूस आमच्या तासगावात राहतोय.
गेल्या ३५ वर्षात १० हजार पेक्षा अधिक प्रेतं त्यान आपल्या टाटा सुमो गाडीतून वाहिली.. कुणी दिल तेवढं भाडं घेतलं..! शेकडो बेवारस प्रेतं स्वखर्चानं त्यांन शासकीय दवाखान्यापर्यंत पोहचवली. पांढरा कपडा व इतर बाकी सर्व लागणाऱ्या वस्तू स्वतःच घेऊन त्या डॉक्टरला देण्यापाठीमागे मेलेल्यांचा अखेरचा प्रवास व्यवस्थित व्हावा एवढीच त्याची प्रामाणिक भावना..!माणुसकी म्हणून, समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून, आवड म्हणून घेतलेलं त्याचं हे व्रत अखंड सुरू आहे. कुठल्या अनुदान, पुरस्कार वा कुणाच्या कौतुकाच्या अपेक्षेने न्हवे तर फक्त समाधानासाठी..!
मेलेल्या माणसांची वाहतूक करून, आलेल्या भाड्यातून जगण्यासाठी जेवढं येतं त्यातच तो समाधानी असतो. कुणी मेलं तर पोलीसांचा पहिला फोन याला..असा हा मुलखा वेगळा अवली माणूस..! ‘अस्लम नसरुद्दीन मणेर’ ( वय ५० ) मोमीन मोहल्ला, तासगांव, जिल्हा सांगली….!
'अस्लम'..... डोक्याला वाढलेले कुरळे केस, डोळ्याला चष्मा, पानामुळं लालभडक झालेलं तोंड, हातात काळा दोरा, साधा शर्ट, साधीच प्यांट, डाव्या हातात काळा दोरा, बोटात अंगठी, पायात साधी चप्पल, पायाच्या अंगठ्यात पितळेची रिंग, सदा हसतमुख, सर्वांना आदरानं दादा...साहेब...बोलणारा, पावणेसहा फूट भरदार उंची असणारा अस्लम..! 'चुकला फकीर मशिदीत शोधावा' अशी एक म्हण आहे. मात्र अस्लमला कधी कुठं शोधावं लागत नाही. तासगावच्या कोर्टासमोर उभी असणारी 'एम.एच.१० १४३१' ही त्याची लाडकी पांढरीशिपत टाटा सुमो, त्यावर त्याचा मोबाईल नंबर लिहिलेला..! आणि गाडीच्या जवळच कुठंतरी घुटमळणारा अस्लम.! ही चित्र आजचं नाही; तर तासगांवकर गेली ३५ वर्षे तासगावच्या कोर्टासमोर याचा अनुभव घेतायत.!
नसरुद्दीन व रुबिया मणेर यांच्या पोटी जन्मलेला हा असामान्य कर्तृत्वाचा अस्लम मणेर.! आई बापांसोबत १० बाय १५ च्या खोलीत राहायचा.!सातवी पर्यंत शाळा शिकला. गड्याला गाड्या चालवायचा लय नाद होता. 'आई-बा' ला गोड बोलून वयाच्या १८ व्या वर्षी अँबेसीटर कार घेतली, भाड्याला लावण्यासाठी.! तासगावात सर्व शासकीय कार्यालयं कोर्टाच्या आसपासच होती. त्यामुळे कायम ते ठिकाण वर्दळीचं..! म्हणून अस्लमनं हेच आपलं ठिकाण निवडलं. किरकोळ किरकोळ भाडं सुरू झालं. एकेदिवशी अचानक आलेल्या एका भाड्याने त्याच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली..! तासगावच्या पोलीस स्टेशन मधून फोन आला,"अस्लम... तासगाव पोलीस ठाण्यातून बोलतोय. जुळेवाडीत अज्ञात ४ जणांनी विष पिऊन आत्महत्या केलीय तू भाडं करशील का?" मेलेली माणसं आपल्या गाडीतून वाहून न्ह्यायला सहजासहजी कुणी तयार होत नाही. काहींना तर तसा विचारही करवत नाही.
मात्र वयाच्या १८ व्या वर्षी अस्लमनं ते धाडस दाखवलं. त्याच्या गाडीत
४ मेलेली माणसं गपचीप पडली होती. पोस्टमार्टम करण्यासाठी तासगावच्या दवाखान्याच्या दिशेने गाडी धावत होती. ही माणसं कोण, कुठली हे माहीत नसूनही तो या कामासाठी तयार झाला होता. त्या घटनेपासूनच त्याच्या या जगावेगळ्या कामाची सुरूवात झाली. माणूस जिवंतपणी माणसाशी माणसागत वागत नाही.! मग मेल्यावर त्याची काय दशा होत असेल? पण, “मेलेल्यांची हेळसांड आपण होऊ द्यायची नाही.!” असा ‘पण’ त्यानं आपल्या मनाशी केला आणि गेली ३५ वर्षे तो आपला ‘पण’ पाळतोय..! भाड्यासाठी गाडी लावलीय एवढंच घरात माहिताय. आई वडिलांना त्यानं कधीच, “मी मेलेली माणसं नेतो” असं सांगितलं नाही.
अस्लमचं लग्नाचं वय झालं होतं. घरचेही त्याच्या लग्नाच्या तयारीला लागले. घरची मूलकाची गरिबी.! जयसिंगपूर येथील एक स्थळ आलं. मुलीचा बा विद्युत बोर्डात नोकरीला होता. अस्लमचा प्रामाणिकपणा जिद्द, चिकाटी व कष्ट करण्याची उमत बघून त्यानं आपल्या 'रुबाणा' चा हात त्याच्या हातात दिला. छोट्याशा खोलीत राजा राणीचा संसार सुरू झाला.! वेलीवर आरिफ व अन्सार ही दोन फुलं लागली.
मेलेली माणसं पोस्टमार्टम करून त्यांच्या घरापर्यंत नेण्याचं काम सुरू होतं. 'पोलीस, डॉक्टर आणि अस्लमभैया' हे समीकरणच बनलं होतं. अस्लमच्या घरी कुठं चाललाय? हे विचारायची व पोलिसांचा फोन आला; तर उचलायची परवानगी न्हवती. सगळ्याच पोलीसांकडे त्याचा नंबर असेल.! रात्री बेरात्री कधीही पोलीसांचा किंवा कुणाचाही फोन आला म्हणजे हा गडी लगेच तयार... उठला की गाडी चालू.! सांगितलेल्या ठिकाणावर पोहचायचं. तिथली परिस्थिती बघायची आणि पुढच्या प्रवासाला सुरवात करायची. कधी-कधी कुणीच निर्णय घेत नाही. मग अस्लमच निर्णय घेतो.
त्याच्या शब्दाला किंमत, मान आहे. लोकांचं त्याच्यावर प्रेम आहे. मेलेल्या माणसाचं भाडं त्यानं कधीही हट्टाने मागून घेतलं नाही. माणसं असेल तेवढं द्यायची. त्यानं कधीही त्याबाबत कुरकुर न्हाय केली. प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. अशा दुःखाचा डोंगर कोसळलेल्या समयी कुणाकडं पैसे असतात, नसतात; पण या अवलीयानं कधी भाड्यासाठी हट्ट केला नाही..!
हे झालं नातेवाईक असलेल्या लोकांचं… पण बेवारस मेलेल्या लोकांचं काय…? या लोकांसाठी कोण भाडं देणार? त्यांना कुठं न्यायचं? उचलून गाडीत कोण घालणार? असे असंख्य प्रश्न.! मात्र अशा बेवारस मेलेल्या लोकांचा आई, बाप, भाऊ, सखा व मित्र अस्लमच होतो. पोलीसांनी एकदा सांगितलं; की “भैय्या… हितं बेवारस मढं आहे, जाऊन या.” मग पुढं काय करायचं? त्याला सांगावं लागत न्हाय. कापडाच्या दुकानात जाऊन पांढरंशुभ्र कापड व पोस्टमार्टम साठी कापूस, दोरा आणि अन्य सामान तो खरेदी करतो . अगदी आपल्याच घरातलं कुणी मेलंय याप्रमाणे..! मेलेल्याला आदरपूर्वक उचलून गाडीत घालायचं आणि शासकीय रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अभ्यासासाठी ती बॉडी सोडून यायची.!
याचं भाडं त्याला कुणीच देणार नसतं. पोलीसांना पण माहिताय, अस्लमला सांगितलं की, काम होतंच..! पोलीस आणि डॉक्टरांच्या बरोबरच तासगाव तालुक्यातील प्रत्येक गावात हा माणूस सर्वांच्या परिचयाचा झालेला आहे.
पेट्रोल,डिझेल महाग झालं; म्हणून आम्ही कुणाला गाडी सुद्धा देत नाही. आणि हा ज्याच्याशी कसलाही संबंध नाही, असं बेवारस मेलेलं माणूस सोडायला आपली गाडी विनामूल्य घेऊन जातो. का?? तर कुणी कौतुक करावं म्हणून किंवा कुठल्या पुरस्कारासाठी नाही; तर मनाच्या समाधानासाठी.! आतून वाटतं या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो यासाठी..! लोकांसोबतच पोलीसही त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. गाडी घेतल्यावर आईनं त्याला सांगितलं होतं, “इमानदारी सोडू नको.” आईचा शब्द प्रमाण मानून तो आपलं काम प्रामाणिकपणे करतोय. प्रेत सोडून आल्यावर गाडी चकाचक धुऊन परत तासगांवच्या कोर्टासमोर उभी केली जाते. गेल्या ३५ वर्षात यात एकही दिवस खंड पडला नाही. अस्लम आमच्या विचारांच्या पलीकडचं व आवाक्याच्या बाहेरचं; समाजाच्या सेवेचं फार मोठं काम करतोय.! त्याला कुणाकडून कसल्याच सन्मानाची वा कौतुकाची अपेक्षा नाही. अस्लमची सगळी माहिती घेतली आणि २ रुपयांचा चायना पेन देऊन व्हाट्सअप, फेसबुक वर समाजसेवेची जाहिरात करून स्वतःचा उदो उदो करणारे भंपक समाजसेवक नजरेसमोर आले.आणि त्याचवेळी त्यांची कीवही वाटली..!
शेकडो बेवारसांच्या या बापाची शासन दरबारी कुणीतरी दखल घ्यावी. त्याचा योग्य मोबदला त्याला मिळून, आभाळा एवढं मोठं काम असणाऱ्या या अस्लमचा यथोचित गौरव व्हावा..! त्याला व त्याच्या कर्तृत्वाला न्याय मिळावा…!