जनावरांच बाळतपन:
जनावरांच बाळतपन:
विनायक कदम: ९६६५६५६७२३
गौरी काल दुपारपासनच जरा गप गप हुती. तायगंड आसनारी ती नुसती गपगार बसून आपल्या मुक्या भावना व्यक्त करत हुती. पोटात दुकाय लागलं की कळा घालायची. जागा बदलला. तासाभरान पांटूळ आलं. फुटलं.! तशी ती उठून उबा झाली. सार चाटून साफ केलं. पाच मिनटांत बसली तशी नक्या आल्या. नक्या धरून वडोस्तर गडी भायर आला. त्यो खोंड हाय का पाडी हाय ही पयला आमी बगतुय. कारन दिशी गयला खोंड व्हावा, जर्षिला पाडी, शिळीला बोकाड, म्हशीला रिडी, घुडीला घोडा झाला तर आमी खुश. नायतर नाकं मुरडलीच.
आय सारखाच देकना गडी झाला.चाटून पुसून आयन तेला देकनापान केला. गडी काटक ढूसण्या मारून पॉट भर पयला चीक पेला. तासा भरान वार पडली. तीन तासात येवस्थित सारा कार्यक्रम उरकला. आता येवडा सारा लिवन्याचा कुटाना मजी “बाळतपन”. २ मशी, २ जर्षि, १ दिशी गाय, १ शिर्डी हेंची बाळतपन आमच्याकडच ओ. मानूस काय? आनी जनावर काय त्येज्या भावना, येदना सारख्याच की. संकरितच्या नादात आमी जनावरांच नैसर्गिक गर्भारपण आणि मातृत्वाचा आधिकार पण नाकारलाय हे माज्या धेंनात आलं.
बारक आसताना बा संग म्हशीला रेडा दावाय गावात नायतर सावरड्याला जायाचं. तवा गावात लय रेड हुतं.पांडू बुवा.. बा ..चा दोस्त. मग आमची म्हस तितच. माजाव आल्याली म्हस रातभर टोंगाळा करायची. खुट्ट उपडायची. झुंझुरकाच तोंडात त्वांड
दिसत न्हाय तवा म्हस न्हयाय लागायची. कारन रेडा पयल्यांदा लागला पायजी, तरच म्हस गाब राहत्या. आशी मानस म्हणायची. तीत लक्कडकोट नाय तर चिचच झाड आसायचं. खेलात मुंडक घालायचं. कानामागंन कासरा घ्याचा, म्हूरकी नायतर ईसणीला दाव बांधायचं. आणि येकान शेपाट धरायच.
पांडू आण्णा रेड घिऊन याचा. त्यो नुळ नुळीत गडी. खुट्यासन सोडला की येटवान दावतच याचा. तवर म्हस नाचून मुतून धिंगाणा. तशीच रिटून धरायची. रेड उडल की सारयांचीच दांडगी आब्दा. तीनदा रेड उडवाय लागायचं. म्हस तायगंड आसली की फुडल पाय बांधायचं. माणसं बी लय कलाकार. तीनदा उडून झालं की म्हशीच्या पाटीत कोपरखळी घालायची. म्हस चार्रर्रर्रर्र चार्रर्रर्रर्र वाकायची. मग तिज्या कनाटयाच कातडं वडायच. येवडा सारा कार्यक्रम झाला की मस गाब गिली म्हणून समजायचं. म्हयनाभरात उलाटली तर परत रेडा फुकट आसायचा ह्यो नेम हुता.
गाब गेल्याली म्हस घराकडं आली की रस्त्यात पार न्हायतर लोकांडी ठोंबा टाकल्याला आसायचा. म्हशींन त्यो वलंडुन जायाच. मग परत दिवसभर तिला येकादया झाडाला मानसं मुंडक वर बांधून खाली बसू नी म्हणून टांगायची. दुपारचं तिला सुडून वैरण पाणी व्हायचं. आसा एकंदर प्रकार आसायचा. म्हशीला रेडा, गयला बैल आणि शिर्डीला बोकाड दाऊनच माणसं त्यासनी गाब घालवायची. पण आलीकड रेड उडवून गाब घालवल्याली कूट दिसत न्हायत. म्हसर गाब घालवाय डॉक्टरच इतुय. नैसर्गिक गर्भधारणा न्हायच ओ. कुटल्याबी वळूच कुणाच्यात बी सोडत भेसळ करण्याचा प्रकार.
जर्षि गया व इतर जनावरांच्या बाबतीत आमी लय दूध मिळावं म्हनून प्रचंड अत्याचार केलाय. तेंच्या गर्भारपनाचा आधिकार तर आमी कवाच नाकारलाय. जर्षिला त्या जनावराच्या ताक्तीपेक्षा मोठ्या वळूच वीर्य तेंच्या गर्भात सोडायचं. तेज वासरू आकारान मोठं हुतय. ती जनावर यायला लागल्यावर तेजी काय आबदा हुत्या, तेला त्रास हुतुय हेजा ईचार आमी कवा करत न्हाय. वासरू भायर येत न्हाय, वडायला चार गडी लागत्यात. जनावर भुईला पडून आराडतय, टाचा घासतंय. निराण वडून धरायच वासरू भायर काढायचं. भायर आल्याव गयचा निम्मा जीव गेल्याला आस्तुय. मग आमी तिला कॅल्शियम लावतुय. तिज्या पोटातच महिनाभराच आसल येवड वासरू आमी तयार करतुय. वासरू भायर यिना तर तेला हुक लावून वडून भायर काढत्यात. पाडी आसली तर बरं न्हायतर खोंड आसला तर तासा भरातच त्यो मुका जीव खाटकाला दिउन टाकत्यात. किती भयानक क्रूरतेंन वागतोय आमी जनावरांसंग. त्यांचं गर्भारपण आणि मातृत्व आमीच ठरवत त्यांच्याव पाशवी बलात्कार केलाय*…