हिरीत पवायला
हिरीत पवायला:
विनायक कदम
बारक आसताना पाणी आणि पवन हेज लय आकर्षण. घरापासन आमच्या तळ्यातन चिचणीला पाण्याचा कॅनल गेलता. उनाळच तेला काठुकाठ पाणी. शनवारच शाळा सुटली की आणि उनाळ सुट्टीत मग छातीयेवड्या पाण्यात क्यान नायतर भोपळा बांधून उड्या मारायच्या. पाण्याच भ्या मोडल्याव परत भिरीरा उड्या सुरू झाल्या. आमच्या वस्तीवली, वारकऱ्याची, बेरडकीतली, इसभर पोरं. घरातन येताना टावेल,चड्डी , भोपळा,साबण घिऊन गडी निगायच. ऊन लागतंय म्हणून काय जण डोसक्याला चड्डी नायतर टावेल गुंडळायची.
पवायच मजी साद काम हाय वी. लय ताल. कापड काडून ऊन खायालाच अर्धा तास जायाचा. परत काय गडी आंगुळीच्या आदी वड्याकड हागाय घुसायच. सार आवरल्याव मग कॅनलात धडा धड उड्या पडायच्या. तोंडाला आल्याला कॅनलच पाणी बांधावन खाली जायाचं. बारकी पोर त्यात काय तरण गडी आमच्यात याच. पाण्यात बुडून आमच्या चड्ड्या वडायच. बारक्या पणी लय अब्रूदार माणसं आमी. लाज वाटायची.
आमच्यात काळ परव्या मजी लय हुबलाक. मनसोक्त कस पवाव तर ती परव्या नच. कॅनल कडला आमचं रान. गडी रानात जाऊन लोळायचा. आंग भरून चिक्कूल लावून घ्याचा. आणि पळत यिऊन धाड शिरी पाण्यात पडायचा. पवायच चांगलं तीन तीन तास चालायचं. तवर बायका धुनी धुयाला याच्या. बायांच धुणं धुताना पाण्यात पडल्याल साबण काढून दयायला. तेंची व्हाऊन जाणारी कापड पाण्यातन काडून दयायला लय पुरुषार्थ वाटायचा. बाया कौतुक करायच्या.
रानातन तापून आल्याली बैल पाणी प्यायला यंको आबाचा दाजी, बाळू चव्हाण कॅनलमधी घालायची. गडी सांगायचं जरा थांबा र बैल पाणी पेत्यात. मग कोपरा धरून आतल्या आत पाय हालवत पवायच. दाजी शिट्टी मारून बैलासनी पाणी प्याय साद घालायचा. येकादा खुडील पाणी हालवाय लागला की बैल पाणी प्यायची नायत. दाजी म्हणायचा ये गाबड्या तुला सांगिटल्याल कळत का. चाबूक बगीटलास का? पाटीच कातडं गोळा करल. दाजी दांडगा गडी, लालभडक डोळ, आवाज मोठा आसणारा ह्यो बाबा चाबूक हाणाय कमी करणार नाय म्हणून भ्या न पोर चप धरून बसायची. बैलांच झालं की मग हाळ्या आणि शिट्ट्या. पाणी उडवून आणंद व्यक्त व्हायचा.
कॅनल मधन परत वड्यात मावल्यात पवायच. आमच्यासंग पुरी बी आसायच्या. दांडगा कालवा. म्हसर पडल्यागत पाण्यात पडल्याल गडी पाण्यातन उठू वाटायचं नाय. परत हिरीत पवाय शिकलू तसं धुरळा मग. कड्यावन उडया मारत आंगातली मस्ती दावायची. शिवाशिवीचा खयोळ सुरू व्हायचा. काळ झार पाणी. कोपऱ्यात बसल्याली बेडक , ईरुळ ही कडू कवा पाण्यातन जात्याती वाट बगत बसायची. आमच्या आरडण्यान ती गडी बावरून बसायची. पण येकादा इरुळा पाण्यात दिसला तर कड गाठोसतर गडी हागवाणीव बसायचा.
हिरीत पऊन डोळ लाल भडक व्हायचं. भायर आलं की धुकाट पडल्यागत पांढरा धूर दिसायचा,. डबल छड्या नसायच्या. मग वल्या पिळून घालायच्या. उनांन वाळायच्या. मग हारबर, आंब ,चिचा काडायच्या. घरातन पुडीतन आणल्याली चटणी ,मीठ, हाळद ,लावून कडावा करून गार सावलीत झाडाखाली डुलका काडायचा. पाऊसकाळ कमी झाला. हिरींनी तळ गाठला. आता गावाकडं बी तुरळक पोर पवाय दिसत्यात. काय बापय झाल्याल्या गड्यासनी आजून पवायच येत नाय. पवायचा त्यो आनंदीकाळ परत यील का…?
फोटो सौजन्य:गुगलवरून साभार
लहानपण डोळ्यापुढ उभ केल दादा तुम्ही….
अभिनंदन
आधीचे सगळे भाग इथे वाचायला मिळू देत