हिंदूंच जीव वाचवतोय मुसलमानांचा निसार:
हिंदूंच जीव वाचवतोय मुसलमानांचा निसार
विनायक कदम:९६६५६५६७२३
तासगावच्या निसार मुल्लाच्या स्पेरपार्टच्या दुकानात जायाचा योग आला. गड्याचा फोन चालू हुता. साध्या कापडातली सात आठ मानस डोळ्यात जीव आनून तेज्या तोंडाकडं बगत हुती. मुंबईत येका मोठ्या हॉस्पिटलच्या डॉकटर ना त्यो बोलत हुता. पंधरा वीस वर्षाच्या पोरांचा हार्ट वर कायतर शस्त्रक्रिया हुती.लाख , दोन लाख रुपय खर्च सांगितला हुता. हातावर पोट आसनारी हिंदू कुटुंबातली मानस मुसलमानाच्या निसारकडं मदत मागाय आलती. जातीच नाव ह्यासाठी घितूय की दुनी जातीतल्या धर्माच्या हुबलाक ठेकेदारांमुळं माणुसजात धोक्यात आल्या.
निसारन ईचारल तुमच्याकड रेशनकार्ड कुटलाय? तेंनी सांगितलं केशरी. आजून किरकोळ दोन तीन कागद तेंन सांगत कागद घ्या आनी मुंबई गाठा म्हनला. तिथं हेला हेला भेटा. नंबर दिला. जायाला पैस हायती का दिऊ ईचारल. हायत म्हणल्याव मुंबईला बिनधास्त जावा तुमचं ऑपरेशन फुकट व येवस्थित हुईल आस सांगत कुटुंबाला धीर दिला. माणसांच्या तोंडाव टकळाई आली. त्या माणसांचं काय झालं मला उत्सुकता हुती. मुंबईच्या पंचतारांकित हॉस्पिटलला त्या पोरावर फुकट उपचार झालंत. निसारन फक्त शासनाची महात्मा फुले योजना येवस्थित राबवून कुणाचातर जीव वाचवला भारी वाटलं. शासन ढीगभर चांगल्या योजना आनतंय पन त्या आमाला म्हायती नसतंय. पैस नसल्यानं मानस दुकनी आंगाव काढत्यात. वेळेत उपचार नाय केल्यानं मानस मरून जात्यात.
पन निसारसारखा मानूस शासनाच्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवून लोकांच जीव वाचवतुय. तेजा फोन कायम चालू. कुटला दवाखाना,कोन डॉकटर, योजना कुटली, त्यासत बसवायचं कसं, कुटल्या योजनेत काय आजाराव उपचार हुत्यात ही सारं तेज्या हेळव्यागत तोंडपाठ. तेज्याकड मदत मागाय आसल्याल्या मानसाची त्यो कवा जात ईचारत नाय. त्यो सांगतोय माझ्याकडन कायतर मदत हुत्या म्हनुनच मानस येत्यात होत नसत तर का आली आसती. मग लोकांसाठी जीव तुडून त्यो यंत्रणा हालवतुय. त्यो सांगतो महात्मा फुले आरोग्य योजना व मुख्यमंत्री फंड यातून ७००ते ८०० विविध आजाराव फुकट उपचार हुत्यात पन आमाला म्हायत न्हाय. मग काय दवाखान व डॉकटर गरीब लोकासानी लुटत्यात. पण काय डॉकटर देवापेक्षा मोठं त्यांचं काम हाय आस सांगतोय.
पित्ताचं खड, गर्भाशय पिशवी, मुतखडे, महिलांचं आजार, मोडलेले अवयव, गुडघेदुखी, शिरा स्नायू, मणका सरकने, मोतीबिंदु, गाठी, मणक्यात पानी हुने, हृदय बायपास, लहान मुले शुद्ध अशुद्ध रस्क्तवाहिनी, हृदय होल, हृदय झडप लहान, मोठी, यासारखी २५ हाजारापासून १० लाखापातूरचं उपचार सांगली, मिरजेसह, मुंबईत पंचतारांकित हॉस्पिटल मदी करून दीतूय. ही करताना कुनाची कागद आस्त्यात, कुनाची नसत्यात. मग ह्यो अधिकाऱयांच्या हाता पाया पडतुय, वैद्यकीय कामासाठी पायजी मदत करा म्हणून सांगतुय. तेज काम जिल्ह्याला म्हायती हाय. कोन आडवत नाय. तेज्या शब्दाला किंमत हाय. काय दवाखान महात्मा फुले योजना राबवत न्हायत. त्यासनी मग निसारचा फोन गेला की वाकत्याती. सरकारनं महात्मा फुले योजनेसाठी राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक नेमल्यात. त्यो थेट त्यासनी फोन करून त्या हॉस्पिटलची तक्रार करतूय.
गरिबांवर मोफत उपचार करून चांगलं काम करणाऱ्या डॉकटर व स्टाफचा त्यो लोकांच्यासाठी आभार मानतूय. ही फुकट उपचार करून घ्यायला तेला टक्केवारी , कमिशन मिळत नाय. ही त्याची आवड हाय. यातनच त्यो लोकासनी फुकट उपचार व्हायला पायजीत, शासनाच्यास योजना लोकांच्या पातूर चांगल्या राबल्या पायजीत म्हणून धडपडतुय. चार वर्षांपूर्वी दिल्लीत एका संस्थेनं देशातल्या ३४ लोकांना पुरस्कार ठेवलावता त्यात निसारच नाव हुतं. तेंन मदत केल्याल्या आकड्यावर त्यासनी शंका आली. तेंनी चेक केलं ८०० मदी ६९० हिंदु व ११० मुस्लिम रुग्ण त्यांना सापडले. त्यांना वाटलं ह्यो मुसलमानाचा म्हणून तेंच्याच लोकांच्याव उपचार मदत करतूय.
निसारचा धर्म सांगतुय शंभरातल अडीच रुपय तुमी दान करा. ही धर्माची शिकवन तेज्या डोसक्यात फिट्ट हाय. त्यो रक्तदान शिबिर घितुय, ऊसतोड कामगारासनी कपडे, फराळ, बेघरासनी शॉल स्वेटर दीतूय. पाणपोया काडतुय, वारकऱ्यासनी फराळ, शिवजयंती साजरी करतूय, अपंगासनी सायकली आनी इफ्तार पार्ट्या टाळून त्यो गरीब हिंदू रुग्णासनी मदत करतूय. ही करत असताना मी लय मोठा समाजसेवक हाय आस दावायच नाय. तर सामान्य कुटुंबातल पोरगं तुमी आमी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीसनी लाजवलं आस काम करतंय. तेंन आजपातूर १० वर्षात लहान शस्त्रक्रिया ५०२२ व १५०० मोठ्या शस्त्रक्रिया फुकट करून आनल्यात. त्यो नुसत्या फोनवर फिल्डिंग लावून दीतूय. त्यो मानूस वळकीचा हाय नाय ह्यो विषय गौन. मग मदत केल्याली मानस कुटबी रस्त्यात तेज पाय धरत्यात ही तेज्या कामाची पावती. कोविड काळात त्यो लय राबलाय हिंदूच्या आनी मुसलमानांच्या धर्माच्या ठेकेदार टग्यानी धर्म खतरे मे है आशा घोषना दिऊन नुसती पोरांची माथी भडकवायची. पन तेंच्यामुळच मानूसधर्म धोक्यात आलाय. पण निसारसारख्या मानसांनी त्यो मानूसकीचा धर्म जिवंत ठेवलाय.
मस्तच आहे निसार भाऊ यांचं काम सलाम त्यांच्या कार्याला