--------------------------------- ======================================

हारबऱ्याचा हावळा

हारबऱ्याचा हावळा

विनायक कदम:९६६५६५६७२३

पूर्वी शेताभातातली मानसं निसर्गाशी समरस झाल्याली आसायची. निसर्ग बी ठरवूनच केल्यागत पाऊस, थंड, ऊन पाडायचा. निसर्गाचा समतोल हुता. कुटल्या हंगामात काय पीक घ्याच ही ठरल्याल आसायचा. घव, हारबर, कडधान्य, तीळ, शेंगदान, सूर्यफूलासारखी पीक त्याल काढायसाठी मानसं घेत हुती. काय कूट मागायलाच लागत न्हवत. सारं गावातच मिळायचं. गावं स्वयंपूर्ण हुती. धन धान्यांन भरल्याली घरं, गाय गुरांनी भरल्याल गोटं आनी घरात सारी येकात राह्याला आसल्यान घरात गोकुळ नांदायचं. मानसं खाऊन पिऊन हात्तीगत. शंभर सव्वाशे वरीस चेष्टवारी जगायची. खानं बी त्यांचं दमदार आसायचं. आता आमी वडापाव, बर्गर वालं गडी. दातं तर कूट सरळी राहिल्यात आमची.

पार्ट्या हा प्रकार तसा आता ग्रामीण भागात बी चांगला मुरलाय. पार्टी म्हनलं की झनझनीत मटन आनी बाटल्या फुटल्याशिवाय मजा हाय वी. पूर्वीची मानसं हुरडा पार्टी, हावळा पार्टी, मक्याची कनसं, रताळं भाजायची आसल्या पार्ट्या रानात व्हायच्या. येगयेगळ्या हंगामातनी ही सारं रानात व्हायचं. रानात बांदावा बसून खरपूस भाजल्याली मक्याची कनस खायाची मजा कूट पैस दिल तरीबी मिळनार न्हाय ओ. आख्या शिवारातली मानस आसल्या पार्ट्यासनी हाजरी लावायची. परतेकाच्या बांधाव ही व्हायचं. आसल्या पार्ट्या करत मानसं येकत्र याची. तुज्या शेतात काय, माज्यात काय, रानांत किती उत्पन्न निगलं, दर कसा, फूडं कुटलं पीक घेनारं, सनं ,वारं, जत्रा, पाऊसपानीच काय येकमेकांची सुयरीकबी आसल्या पार्ट्या करून गप्पा हानत ठरवायची.

ह्या पार्ट्या मजी ग्रामीन भागाचा येक उत्सवच हुता. मानसं येकत्र येत घडाघडा मनातलं बुलून व्यक्त व्हायची. शरीराला परतेक हवामानानुसार, हंगामानुसार काय पायजी ती घटक मिळायचं. दात घट्ट व्हायचं. ती सारं वैभवशाली ,समृद्ध आनी संपन्न हुतं. दोन दिसापूर्वी मलाबी हारभाऱ्याचा हावळा खायाची तलप झाली. पन पावसानं पिकांची वाट लावली. आमच हारभरं जरा मागास हायती. तुका आप्पा आनी रामा शिरसटाच हारंभरं यंदा लवकर व चांगलं आलत. हारंभरं मिळत्याल ओ पन पार्टीला कोन नगु वी संग. आता कुनाला बोलवायचं म्हनलं. काय गड्यासनी बोलवायचं म्हनलं तर काय लगा बोलावतूय हारभऱ्याच्या पार्टीला म्हनलं. मग चिचनीचा आमचा दोस्त रवीकिरन जाधवांना फोन केला. पन तेंनी तारीक बदलायची मागनी किली.

जाऊदी म्हनलं. आपला आपुनच भाजू हावळा. आंधार पडल्याव तुका आप्पाच्या रानातन मूठभर ढाळ उपडून आनलं. तसं मटनाच्या पार्ट्यांसनी तुका आप्पाच्या कांद्यासनी लयदा आमी दचका दिलता.
उसाच्या पाल्याची मुट आनली. पेटवली आनी ढाळं धरलं जाळावं. ताड ताड आवाज होत हारंभरं भाजाय लागलं. आग लागून घाटं खाली जाळात पडाय लागलं. खरपूस वास सुटला तसं तोंडातन पानी गळायच बाकी हुतं. आसली तलप झालती. करपाय नगु म्हनून सारं पसरलं. येवस्थित पायजी तसा हावळा भाजला हुता.

काय वल्ल हारंभरं भाजून फुटलवत. तर काय फुटाण्यागत झालत. घावल्यागत पालत पडलू हारबऱ्याव. पॉट भरून खाल्लं. राकंमुळ हात काळ मिट झालवतं पन भारी वाटत हुतं. आमच्याकडं द्राक्षपट्टा वाडला. खरीप , रब्बीची ही पीक रानांतन गायब झाल्यात. मानसासनी आता स्वतासाठी येळ न्हाय मग हुरडा पार्ट्या कुटल्या करत्यात. पन गावाचं अस्सल गावपन आनुभवायला, हावळा, मक्याची कनस, हुरडा, ऊस, चिचा आसलं रानात बांदाय बसून खायाला पायजी. त्यात भारी सुखं हाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *