--------------------------------- ======================================
Uncategorized

गोठ्यातल्या चिमनीची जागा :

गोठ्यातल्या चिमनीची जागा :

गर्दीतला आवाज:

विनायक कदम:९६६५६५६७२३

घराच्या मागं मसराच छपार हुतं. उसाच्या पाला, मिडकी, कळाक, पांजरान, त्यावर पाला आनी पाल्याव परत गळाय नगू म्हणून प्ल्यास्टिकचा पसरल्याला कागूद, छपराव आसली ढीगभर यंत्रना. आमचं छपार मजी चिमण्यासनी तेंच्या मालकीची हाक्काची जागा. जवळच उसाचं पालं, हात्तीगवात, लिंबाच्या काड्या, कापूस, सुतळ्या, दोऱ्या, नारळाची केसरं आसलं सारं मिळायचं. बाजूला सावलीला झाडं, पानी प्यायला, खायाला कोंबड्यांसंग ढीगभर पन्नास तरंच मिळायचं.

पनं साऱ्यात महत्वाचं मजी सुरक्षितता. मानसांकडनं धोका न्हवता, पन साप, मांजार, कुत्र हेंच बी काय भ्या न्हवत. आमचं मांजार कूट दिसलं तरी आमच्याकडनं तेजा चोपना व्हायचा. ती परत तिकडं जायाचं न्हाय. चिमन्या साऱ्या छपरात कुटी करायच्या, कोट करायं सामान आनायला तेंच्यात घालमेल उटायची. कोट कुनाचं चांगल हाय ही बगताना कळायचं. काय चिमण्या लै टिपीन कोट करायच्या. इतर चिमन्या गत तेंच्या कोटयातन काड्या, दोऱ्या लोबकाळायच्या न्हायत. कोट्याच कामं सकाळच लवकर सुरु व्हायचं. कामं करताना हायगय नसायची. ऊन लागाय चालू झालं की कामं थांबायचं. गोट्यात कळकावं, काटक्यावं बसून झोकं घेत चिमन्या एकमेकांच्या खोड्या काडायच्या.

उनाळच दिवस संपत यायला लागलं. पावसाच्या आदी पत्र मारून जनावरासनी चांगला निवारा करूया म्हनून ठरलं. चगाळं काडायचं म्हनलं पन काडायच्या आदी म्हनलं येगदा कुनाची कुटी, लेकरं बाळं हायती काय तर तपासुया . तर येका चिमनीची लेकरं कोट्यात तयार झालीवती. आता म्हनलं हिज बाळतंपन झाल्याशिवाय काय छपार काढायचं न्हाय. पंदरा दिवसानंतर आक्काची लेकरं निघून गिली. परत चापचून बघितलं आनी छपार पाडलं.

नवीन पत्र्याचा गोठा मारायचं कामं सुरु केलं. कामं करताना एक चिमना व चिमनी कामाच्या ठिकानी सारखं घुटमळायची, जवळ यायची, बसायची निघून जायाची. उभ आडवं लोखंडी चॅनल टाकल्यावर एक चिमना चिमनी येका जाग्यावं सारखं बसायला यायची. आयला म्हनलं आसं का हुतंय. परत लक्षात आलं आर हया चिमणीच कोट छपरात त्या ज्याग्याला हुतं त्याचं जाग्याव चिमनी सारकी बसत्या. छपरातली तिजी आवडीची जागा कूट गिली म्हनत ती तिथं घुटमळायची.

चिमनीची भानगड लक्षात आली. पत्र मारून झाल्याव लगीच त्याचं जाग्याला लोखंडी चॅनलला पिव्हीसी पाईपचा तुकडा कापून तिला सुरक्षित वाटलं आसा बांधला. ती दोघ दुसऱ्या दिवशी सकाळी आली. आपल्या जाग्यावर कायतर नवीन आलंय ही तेनी बघितल. आजू बाजून फिरून काय हाय हेजा आंदाज घेत चिमना हाळुच पायपत शिरला, आनी लगीच भायर आला. सुरक्षित वाटल्यावर परत पायपत घुसला. चिमनीला आवाज दिला. तिबी तेज्या मागं आत घुसली. दोघांची आवडती जागा त्यासनी परत मिळाल्याचा आनंद त्यासानी झालावता. त्या दिवशी तेनी किमान पन्नास दा ‘पायपतन’ आत भायर करत उड्या मारून तेनी आनंद व्यक्त केला.

आता चिमना चिमनी रोज आत पायपत बसाय लागली. एक दिवस सकाळी सकाळी दोगांनी पायपतं कोंबड्याची पकं , दोऱ्या गोळा करायं सुरवात केल्याचं दिसलं. आपन दिल्याली जागा त्यास्नी आवडली हुती हेजा जाम आनंद झाला. बगता बगता सारी पाईप भरून तेनी सामान आनत गादी सारख घरं केलंय. त्या घरात अंडी घालत आता लेकरांनी जन्म घेतलाय. बारक्या पिल्लांचा चिवचिवाट रोज कानाव पडतूय. भारी वाटतंय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *