घवाला पानी पाजाय:
घवाला पानी पाजाय:
विनायक कदम:9665656723
रानातन हाबरेट निगाल की घव, हारबर, शाळू, मका, करड करायची घाय आसायची. वड्याला धार हाय तवर दोन, तीन गरगरीत पाणी पाजून घ्याचा डाव शेतकऱ्यांचा आसायचा. सताट वरसापूर्वी आताच्यागत ट्रॅकटर लय न्हवती. बैलांशिवाय शितीच पानं हालत न्हवत. नांगरीफूड माणसं घव टाकायची. आमच्यात नांगराय तुका आप्पाच्या संदयाची बैल आसायची. बैल सुटायच्या टायमापातूर किती रान उटल हेजा अंदाज आसायचा. त्या हिशोबानच माणसं घव मोकळ्या रानाव यिस्कटायची. संदया झुंझुरकाच बैल घिऊन याचा. रानातनी सारीकडच बागायत करायची घाय आसायची. शेताशेतात माणसं गारट्यात खडी आसायची.
नांगरी, शिवाळ, येटाक, मिटुक, खीळ सापत्या, गाडीतन काडून जोडाय पंधरा मिंट लागायची. सकाळ सकाळच्या माश्या बैलांच्या शिंगाव पालत्या पडायच्या. बैल शिंग हालवायची. आणि बैलक्या खासकन आरडून शिवी दयाचा. बांधाकडन वाटा आसल्याण कटीन व्हायचं. पयल तास जरा दमवायच नांगरी कवा कवा उचलून वर याची. मग नांगरीव बा बसाय लावायचा. नांगुर धरायचा मजी काय तोंडाच काम नसतय. तेलाबी आक्कल लागत्या. पालती कवा करायची, खडी कवा करायची, कुठल्या टायमाला कसा नांगुर धरायचा ही म्हायती आसाय लागतंय न्हायतर गर राहत्यात आस बा म्हणायचा. धरणाराऱ्या माणसाचा दिवसभर पीळ पडायचा (गावाकडं कोणतर तापलं की आजून माणसं बोलताना म्हणत्यांत तुला काय नांगुर धराय लावलाय वी येवढ पिसाळलायस) हाराळीचा गड्डा आला की तासातली नांगरी खडी करून बा पाय आत्राळी करून नांगरी दाबायचा. फाळावरन मोटा लाट ढेपसा बाजूला जायाचा. नांगरीव बसणाऱ्या माणसाचं हाल काय सांगू नगा. बैलांच्या शेपटाच तडाक, चाबकाच तडाक, डोसक्यात आडकणारा कासरा, तासातन गोमा , साप आसल कायतर फाळावन पायाव चढायचं , बैल कोपऱ्यात जाऊन वळताना बा नांगरी वाकडी करायचा कवा कवा सड लागायचं नायतर खाली पडायचं.
फाळाची कडी काडून खुरप्यान वसून हुतय तवर बैल वळत आसायची. तवर बैलक्या चाबकाचा धडुका मारून बैल तासात घालायचा. तेवढ्यात नांगराव बसायची मजी दांडगी आब्दा व्हायची. जरा मिशा यिऊन आंगात रग आल्याव मी नांगुर धराय शिकलू. भारी वाटायचं. आपुन आता गडी झालुय आस वाटत ऊर भरून याचा. नांगरी धरून हात घायला याचं. राच्च कवा झुप्लुय कळायचं न्हाय. हाळू हाळू नांगरामाग बगळ, कोतवाल, साळुंक्या, यिनीवाली चिमनी कीड खायाला नांगराच्या माग लागायची. साप, गोमा, बेडक, उंदर खायाला गड्यांची चंगळ आसायची. कोतवाल लय बाराचा. लय बेडर गडी. शिकार करायसाठी गडी मुर्दाण्ड हुन जवळ यिऊन झडप घालायचा. आवत सुटुस्तर गडी हालायच न्हाय. बाराच्या टायमाला बैलांसंग तिबी निगुन जायाचा. आडतास झाली की घवाला सारट का का वाकुरी आसली यंत्रणा आसायची.
बा गत बऱ्याच जणांचं वाकुऱ्यावर न्याट आसायच. का तर पाणी चांगलं बसतंय. पीक ग्वाड येतंय. घरात लांबलचक दांड्याची दोन तीन फावडी हुती. किती सऱ्याच वाकुर, पाण्याचा दंड कुटला, नाक कुटली मारायची , उभं आडवं, ऊस पायस, उजरायच कसं बा शिकवायचा. आमच्या बा च काम मजी लय चोक. योक चिरा कराय दिवस घालवणार पण वाकुर चार गावात कोण आसल करणार न्हाय आसल. नीट घोल. दुरी मारल्यागत. आताच्यागत रोटर न्हवत नांगरान निगाल्याली खरट फावड्यांन वडून लावायची मजी नरडीला याचं. काय ठिकाणी कुदळीन उकराय लागायचं. तवर मुंग्या घव गोळा करायच्या. मग आवरत न्हाय, लय नकसगिरी कर्तुयस म्हणून बा संग वाद व्हायचा. पण बा काय आपला ठेका सोडायचा न्हाय. पण पाणी पाजताना बा ह्यो बा आस्तुय ही कळायचं. आमची वाकुरी कना कन फुटून जायाची पण बा च वाकुर शेंड्याला पाणी आलं तर फुटायचा न्हाय. पयल्या पाण्याला दांडगी आब्दा व्हायची. मोकळं रान आवळून योस्तर पाणी फुटायचा. दोन दोन माणसं लागायची. उसाच पाल, निर्गुडीच्या काटक्या मुडून दाराला लावाय लागायचं. सकाळच्या गारट्यात गार गार पाण्यात घुसाय नगु वाटायचं. पाटाच्या पाण्याव ऊन पाण्यागत वाप निगायची.
पयल पाणी हुन आळवणी देस तोर शेतकऱ्याला चैन पडायची न्हाय. नांगुर ,वाकुरी हुन पाणी भिजाय आट दिस मोडायच. पयल पाणी पेल की टरारून क्वाम्ब याचं. त्यात काळी झार माती काढल्याली मुंगळ्यांची घर वाहत पाणी चिरडून टाकायच. वाकुरी आवळून आली की ती परत फुटायची न्हायत. पूर्वीच्यागत आता झंझट न्हाय. बैल.. ट्रॅकटर न कवाच खाल्ली. राम पाऱ्यात बैलक्यान बैलांच्या माग दिल्याली पल्लदार हाळी आणि ववी आता शिवारात आयकाय येत न्हाय. नांगुर धराय यायचा लांब त्यो रानात बी दिसत न्हाय. वाकुरी कवाच बंद झाली. ट्रॅकटर तासाभरात सारटी सुडुन जातंय. आधुनिकता यायला पायजी पण त्यातन आमी कायतर गमावतुय. पंधरा पुती पिकवणार रान पाच, सा पोत्याव आलं. तंत्रज्ञानाच्या नादात दिखणी बैल आमच्या दावणीची गिली. आंगभरून घाम पडणार काम नसल्यानं गावाकडं पोर बी शरीरान पापी व्हाय लागल्यात. कसदार खायाला न्हाय. तेज परिणाम बी भोगाय लागत्यात. खपली सारखी जुनी वाण पाक मुडीत निगली. तुमचं… आमचं आयुष्य बी वाकुरयागतच येड वाकड हाय की ओ. काय चुकलं.. माकल तर आयुष्यभर उजरून सरळ करण्यातच माणूसपण हाय..
तुमचं गव्ह आम्ही खाल्ल पन… पोळ्या तर लयचं भारी होत हुत्या
एक नंबरात पीक घेऊन त्याचं संगोपन केलं होतं तुम्ही….😍