--------------------------------- ======================================

गावाकडल्या शंकरआप्पाची हाजामत:

गावाकडल्या शंकरआप्पाची हाजामत:

विनायक कदम:९६६५६५६७२३

तुजी बिनपान्याची हाजामत करीन..?म्हनाय सोपाय पन हाजामत मजी आताच्या नव्या खोंडासनी लय वंगाळ कायतर वाटतंय. कटिंगला, शेविंगला निगालुय आस शुद्ध भाषेत पोरं बोलत्यात. क्यास कापाय आता आधुनिक साधन आली पन आमच्या गावातल्या शंकर आप्पाची हाजामत मजी लय जबऱ्या काम. मी शाळंला आसलं तवा आप्पा साठीत हुता. दुकान फिकान कुटल तवा?. आप्पा घराफुड दारातच पिंडीच पोत भुईला हातरुन खाली बसवायचा. आप्पाच्या वायरच्या पिशवीतन कात्री, मोट्या दाताचा कंगवा, हातमिशन, तुरटी, बारका साबन, वस्तारा,आनी घासायचा दगुड आसल मोजकच सामान हुतं. त्यावच सारं काम चालायचं. पेशल बिशल आसल काय न्हवतं तवा.

हाजामतीला कोन पोरगा बसला की पोरांचं बा बी सांगायचं न्हायत आनी सांगिटलं तर आप्पा बी आयकायचा नाय. हातमिशन लाऊन डोसक्याची पार वाट लाऊन टाकायचा. पाक टकाल करायचा. जवानीत याय लागल्याल्या पोरासनी डोसक्याला जरा क्यास जरा ठिऊ वाटायचं. पन हाजामतीला गेल्याव आप्पा खाटकागत धरल्याल मुंडक सोडायचा न्हाय. क्यास कापाय लागल्याव आप्पाचा योक हात बसल्याल्याच्या डोसक्याव आसायचा. त्यो नुसता हात न्हवता तर त्यो ढाई किलोचा हात हुता. कोन कितीबी खाली वळवळलं तर हालाय याच नाय. आप्पा वरन दाबायचा. हालाय याचं नाय. मान खाली घालुन कड याचा. पण बाबं सोडायच न्हाय. लय आवकाळ कोन आसला की गुडग्यात मुंडक दाबून धरायचा. मुंडक कापून टाकल्याल्या कोंबड्यागत पोरांची फडफड व्हायची. 

सारं कापल्याल क्यास,कोंडा सारया आंगातच पडून चावायचं. लेवल काडाय लागलं की लय आब्दा व्हायची. आप्पाच काम चोक आनी लय नकसगिरीच. भार भार आवरायचं नाय. मान खाली करून करून मुडून पडायची येळ याची. तवर खाली छड्डीत कायतर गेल्याल आसायचं. वळवळायचं. पन कोन हालला की आप्पा शिव्या दयायचा. वस्तरा कापलं की खज्जाळीच्या म्हनायचा. आमच्या बाजूला नंबर लाऊन सताट गडी बसलं आसायच. तेंच ध्यान हाजामतीवच आसायचं. ये गाबड्या हालतयस कशाला कापलं बीपल की आस आप्पाच्या सुरात सूर मिसळून तिबी म्हनायची. मग लैच आवगडल्यागत व्हायचं. तासबर चांगलं जायाचं. हाजामत झाली की पिंजऱ्यातन सोडल्याल्या पोपटागत तितन कवा पळीन व्हायचं.

थंडीच्या दिसात हाजामतीला गारठ्यात जायाचं मजी मुताय याचं. आप्पा पानी ठिऊन ठिऊन शेवाळ आल्याल्या तांब्यात हात बुडवून पानी लावायचा. पानी डोसक्याव योसतर साऱ्या आंगाव पडायचं. आप्पा पानी लावतुय का आंगुळ घालतुय वाटायचं. पानी आंगाव, मानवर पडून वगाळ याचं. कवा कवा ऊन बगून आप्पा पोत हातरायचा. बरं वाटायचं आनी आप्पाची हाजामत सुरू झाली की झॉप याची. आप्पा दगडावर वस्तारा लाऊन दाड्या वडायचा. परत बिलेट आलं. येका बिलेटाव आप्पा दिवसभर दाड्या वडायचा. निबार दाडी आसल्याला येकादया गड्याला भडभडायचं. आप्पा भडभडतय लगा  म्हनायचा. “भडभडतंय”..? सकाळीचं नव बिलेट आनलंय आनी तुला भडभडतंय वी म्हनायचा.

आप्पाच काम येवड चोक आसायचं परत दोन म्हयन डोसक्याला क्यास याच न्हायत. डोसकं मोकळ आनी हालकं व्हायचं. आख्या गावाची हाजामत आप्पा बयत्याव करायचा. कुनाचं जावाळ आसलं की धोतार , शर्ट, लाल पटका गुंडून, पायात बूट घालून, वायरची पिशवी पाटीव टाकून आप्पा याचा. जावळाच तेवड पैस आप्पाला रोक मिळायचं. पन पिकाच्या काडनीच्या हंगामात आप्पाला निरोप याचा. मशिला वैरन आनी मळनी झाली की खळ्यावन उचलनीच वज आप्पा घिऊन जायाचा. रानातल्या वैरनी पासन घरात खायाचं कायपन केल्याल मानसं न मागता आप्पाला दयायची. रानातल्या कोरड्या वल्याशाच तर पायजी तेवढं न्हयायची मुभा आप्पाला आसायची. साऱ्या गावात आप्पाला इज्जत आसायची, मान हुता.

आप्पाला रान न्हवत पन येकाद्या जमीनदाराच्या दारात पोत्याची थाप नसलं ईवडी आप्पाच्या दारात आसायची. शेरडं, म्हसरं दारात आसायची.आप्पाच्यातन येक मस आमच्या बां न आनलीवती. मस यिली  की तिला रेड्याच व्हायच्या. रेडं कवा व्हायचं नाय. दूध बी लय दयायच्या. बा मानसासनी सांगायचा ही शंकर आप्पाची आवलाद हाय. आता भुयला बसून क्यास कापायच सारं बंद झालंय. दुकानात गादीसारख्या खुर्चीव एसीत, टीव्ही बगत ,गानी आयकत क्यास कापाय बसलं तरी शंकर आप्पाच्या त्या पोत्यावरल्या हाजामतीची मजा आता येत न्हाय.

फोटो सौजन्य: गुगलवरून साभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *