--------------------------------- ======================================

गावाकडची सुगी:

गावाकडची सुगी:

विनायक कदम: ९६६५६५६७२३

दोन वर्स रोह्यन्याचा पाऊस खळ्या खांदून ताली फुटूस्तर पडतुय. हात्ती, उतरा, नासक, कुस्क आसली बरीच नक्षत्र चांगली पडल्याती. दोन वर्स झालं पाऊस टायमाव पडालाय. वड्या, वगळीसनी जुन्या काळात पाणी हुतं तस धाड..धाड पाणी पळतय. बारा ,येक वाजोस्तर झिंडू फुटूस्तर ऊन पडतंय. आणि दुपारचंच पाऊस चौकडं जुपी करतुय. माणसांची वाळत घाटल्याली वाळवान आला आला म्हणूसतर पाण्यात भिजवतूय. शेंगा, मूग, हुलग, मटक्या,सोयाबी, चवाळ हाय न्हाय ती कडधान्य वाळवायच काम गावाकडं सुरुय. उतारल्याल काळ झार ढग बगूनच भ्या वाटतंय. गडी वाजतच यितुय. आणि वाळवाणं झाका, म्हसर छपरात वडा, काम बास करा, वैरणीचं बिंडा घिऊन घर गाटा , कन्स गोळा करा, आसल्या हाळ्या शिवारात आयकू यायच्या.

रानात हिंडाय गेल्याली जनावर आडवून ती घराकडं लवकर यायसाठी पाठकाडाव फोकाच वळ टोसतर मालक हाणायचा. म्हसर पळनाती की मालक त्यासनी शिव्या घालायचा. रानातली वैरण बैलगाडीत भरून मुंगा घेत बैल शिवळला वडूसतर पावसाची जुपी व्हायची. चिकलाच्या वाटन पावांड उचलत बैल शेपाट पाटीव टाकून चौकऱ्या उधळायची. आला आला म्हणूसतर वड भरून यायच. वळवाच्या पावसानं काडाय आल्याली पीक काळी पडायची. काळ खाऊ पण पिकलय चांगलं यावं माणसं समाधानी आसायची. झुंझुरकाच दिस चालू व्हायचा. रानातनी काढायला आल्याल हाब्रेट, जुंधळ, बाजऱ्यांवर पाकरांचं झगार पडायच. मक्याच्या फडावणी कुत्री, माकड तुटून पडायची. रामपाऱ्यात माणसं रानाकड पळायची. पण धुकाट कूड घाटल्यागत फूड. धा फुटावला माणूस दिसत न्हवता. त्यात कोष्टयानी रातभर केलेल्या जाळ्या कवा आडव्या येत्याल नेम न्हाय. तोंडाव आडकल्या की जाळ्यात आडकल्याल्या वागागत आरडू वाटायचं.

पाकर राकाय मदी माळा, मचान करून त्याव चढून बसायचं. गोफण बी संग आसायची. हाआआआ हाआआआय आस आरडन्यात आनी गुपणीत दगुड घालून भिरकवन्यात लय मजा वाटायची. मग पाकर जावदयाती न्हायतर कायबी हुदी… पण गुपनीतन दगुड माराय यितुय आस वाटलं की आपुन गडी झाल्यागत वाटायचं. कष्टाळू शेतकऱयांच्या पल्लदार हाळ्या सकाळ सकाळच्या साऱ्या शिवारातन घुमायच्या. आरडून घसा बसला की मग गोड तेलाचा पत्र्याचा डबा संग आसायचा. दोन काटक्या घिऊन तेला बडवायला जुपी आसायची. धाड धाड आर्धा मैल आवाज जायाचा. प्रसन्न वातावरणात पाखर राखणाऱ्या मानसांकडन ग्रामीण भागाच्या कला आजूबाहुला आयकाय मिळायच्या. भजन, गौळण, धनगरी वव्या तालासुरात चालू आसायच. चिचणीचा बाळू शिंदे आणि आमच्या लोढ्यातला यंकू आबाचा दाजी हेंच्या पल्लदार हाळ्या आज बी शिवारात घुमत्यात. दाजी तर म्हसरामाग आसला तर त्यो ववी ची चाल आशी धरतुय येकादया मूडदयात जीव यावा. शाळा जरी शिकली नसली तरी प्रचंड ऊर्जा देणारी ही माणसं साऱ्या शिवारातनी आसायची.

सुगी आली की घोड नायतर बैलगाडी जुपून गिसाडी बिराड घिऊन गावातनी याचा. यीळ, खुरपी, बारकी बिडगी, कुराडी, कोयत, ईळतीची पान ह्यासनी धार लावाय माणसांची मुरकंड पडायची. भात्याच्या हाव वर लालभडक हुणारा जाळं ,त्या कोळशाच्या उडणाऱ्या ठिणग्या बगाय भारी वाटायचं. तेंच्या पालात पिंजरयात शितराची जोड, फायटर कोंबड नायतर पोपट आसायचा. आडवं कुक्कु लावलेल्या बाया. आणि पाच पाच धा धा किलुचा घन मारून लोकांडाला बी घायला आणणारी ही हात्तीच बळ आसणारी माणसं. गावाकडं पीक काढणीच बी लय प्रकार. काय भागात वर शेंड खुडायच, काय ठिकाणी खाली पाडायचं. त्यात बी कापून का बेडग्यान आस आसायच. शाळवाला रान करणारी मानस बऱ्यापैकी बेडग्यानच काडायची. पीक काढाय पैरा आसायच. भल्या पाटच तरन गडी रानात जायाचं. उनाच्या आदी निम्मं रान आडवं करायचं. झाडाखालीच भाकरी खाऊन डुलका काढायचा. परत दिस मावळताना जुपी झाली की दोन तास परत काम चालायचं. चांदण आसल की काय जण शिरवाळ च जुपी करायची ती पाट पातूर कोंबड वरडस्तोर.

हारं, डालग, भाकरीच्या बुट्ट्या, खुरुडी, या सुगीतच लय खपायची. खुडनीला डालग आणि हार लागायचं. कळकाच्या कांब्या पासन अगदी कलबाज काम माणसं करायची. सुगीच्या आदी घिऊन निकळूनी म्हणून ती सारवून ठेवायची. हाबरेटाच्या सताट कडप्या काडून शेजर त्यातली आक्कल आसणारा मानूस करायचा. पाऊस जरी आला तर त्याखाली पाणी जायाला नगु , बरीच दूरदृष्टी ठीऊन शेजर कराय लागायचं. कडपीव वाळाय आणि मग हाऱ्यान शेजऱ्याव कनस पडायची तीत चांगलं वाळली की मळाय मिशन याची. मिशनवाल्यांन हांडेल मारला की पाच सात माणसांचा पाळना व्हायचा. बुस्काट, कूस ,चावायची. जीव गुदमरून जायाचा. शम्बर किलुची पुती वडाय गडी नेटाक लागायचं. शिवार लय आसला तर दिस घुमायचा. मिशनीच्या माग भुस्काटाचा ढीग लागायचा. कनसात उंदर आसायची. मळायच झालं की उनात गदमदल्याली माणसं वड्यात आंगुळ कराय पळायची. मळण्या झाल्या की पुती बांधून घरला पळवाय लागायचं. काय जन तोंड बांधायची तर काय जण शिवायची. मळणीच्या जाग्याव बैतकरी, भिकारी उचलनीच वज घिऊन जायाची. पोत्यान भरल्याल्या बैलगाड्या कटकाटायच्या. चडाला ताक्तीची बैल बी गुडग्याव याची. गडी पाटीला पुती लावून गाडी खाली करायचा. दारात धान्याची थापी बगून शेतकऱ्याची श्रीमंती कळायची.

कनस, कडबा आणि पुती घरला जात न्हायत तोवर रानात राकनीला मानसांचा मुक्काम आसायचा. खंदील, ब्याट्री,काटी, हातरुन काम्बरून आणि संगतीला कुत्रं. पल्लदार कडब्याच्या दोन कटी पेंड्या बांधून बुचाड रानातच ऊब राहयाच. आईट बाज बुचाडाव मग मोर अंडी घालायचा. बुचाडात कुत्री यायची. लागलं तसा कडबा मग वरीसभर तितन आनायचा.

सुगीत कडधान्य ,शेंगा आसल पौष्टीक खाऊन मानसांसंग जनावर बी डिरकायची. बचा.चा दूध दयायची. तोंडाव आल्याल्या दिवाळीला करड, सूर्यफूल आणि शेंगा घाण्याव जाऊन घागरीन त्याल निगायच. कडधान्य यिकून पैसापाणी हातात आला की दिवाळीची चंगळ व्हायची. कापडापासन, फटागड्या, बाजार, पनत्या, वासाच त्याल नुसत दिवाळीचा घमघमाट सुटायचा. आनी फुडच्या घव, हारबर,शाळवाच्या सुगीला भर दिवाळीत नांगुर, सारट, वाकुरी तोडाय जुपी व्हायची. काम झाली की गावा गावातनी जत्रा सुरू व्हायच्या. तमाशा, कुस्त्या, पडदयाव पिच्चर लावून माणसांची करमणूक व्हायची.

आता गावाकडं लै पैशाच्या पिकापायी जमीन, पाणी आणी वातावरणाची वाट लावायचं चालुय. डॉक्टर सांगत्यात दिशी खावा. आर्रर्रर्र पन आनायचं कुठलं. सुगीचा सुवर्णकाळ काय पट्ट्यातन गायब झाला आसला तरी काय भागात आत्ता कामांच तलाल उटल्यात….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *