गावाकडचा पडदयावला पिच्चर:
गावाकडचा पडदयावला पिच्चर:
विनायक कदम:९६६५६५६७२३
लोढे गावातील आणि पंचक्रोशीतल्या तमाम चित्रपट रसिकांना “खुशखबर… खुशखबर…. खुशखबर”….. आज रात्री ठीक साडे नऊ वाजता, सुपरहिट मराठी चित्रपट घायाळ…. घायाळ… घायाळ… याल तर हासाल… न याल तर फसाल…आणि दुसऱ्या दिवशी शेजारयाला ईचारत बसाल. ठिकाण मधली आळी लोढे. रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. गुरवाच म्हयशा, जे के पाटलाच आशा आणि बरच गडी माईकवर ‘फी’ फिरून पुकारून बुक्का उटवायचं. रिडीव सोडला तर आसल काय बगायच मजी घावल्यागत व्हायचं. आमच्यागत बारकी पोरच न्हवं तर तरणी पोर.. पुरी, तरण्या, म्हाताऱ्या बायका, गडी साऱ्यांची मुरकंड पडायची.
दगडू दादाची मदली आळी मजी गावाचा मधला भाग. जुन्यातला दगडी रस्ता. बुध्याच्या घराच्या दगडी भिताडाला पोर टिकून बसायची. गांडीखाली बसाय धा.. पंधरा दगड येका लायनीत मांडल्याली आसायची. पाच वाजल की तीत योक योक गोळा व्हायचा. तितच म्हारती आण्णाची पिटाची गिरण, दगडू दादाच किराणा मालाच दुकान. दुकानाला ,गिरणीत आल्याल गडी तीत दगडाव टेकायचं. गावात वरच्या आळीला जाणारं गडी पयला तीत बैठक मारून मग वर जायाचं.
वरन खाली शांताबाय, उस्मानभय, म्हादा आण्णा हेंच्याकड दारू प्यायला जाणार गडी बी याचं. खालन पिऊन आल्याल गडी त्याचं आळीला दगडाव “आर्र ह्यो काय गाव हाय काय..? हेंच्या ….. आसल्या तीत बसून गावाला शिव्या दयायच. म्हारती आण्णा लय दोन, तीन पायल्या दळान आसल की येगदम वतून डबा लाऊन तीत यिऊन बैठक मारायचा. पिटान पांढरी झाल्याली कापडं ,केस झाडायचा. गावात हाय नाय त्यो परतेक तरचा गडी त्या आळीचा बसाय ताबा घ्यायचा. गावातली प्रतिष्ठित माणसं ऊब राहून बोलायची. बाकीची कान दिउन आयकायची.
तुरळक कुटतर टीव्ही. लोकासनी करमणुकीच कायचं साधन न्हवत. माणसं दिलखुलास बोलायची. बुलून बुलून घायला यायची. खळखळून हासायची. राच्च उशिरपातूर हास पिकायच. त्या आळीला तरण्या पोरांचा चांगला ग्रुप हुता. शाळा, कॉलेजला आसणारी, शाळा सोडल्याली बरीच आणि बऱ्याच नादाची पोरं तीत गोळ्यामेळ्यान आसायची. तितली पोरच तिवडी गणपती बसवायची. तीत परतेक वर्षी येगळा देखावा कायतर आसायचा.
रावशा, इज्या रातभर जागून पटकार बांधून पोरासनी पर्वत बांधून दयायच. तेज्याव मग गणपती. गणपतीला धा ईस रुपय पासन शंभर रुपय पर्यंत वर्गन माणसं आपल्या कुवतींन दयायची. लाकड रऊन, पत्र मारून , पोर स्पीकर लावायची. कॅशेटच टेप तवा हुतं. तर..तरची गाणी फुल्ल आवाज सुडून वाजवायची. पोर गणपतीचं जेवाण घालायची. आणि करमणूक म्हणून पडदयावरचा पिच्चर. गणपतीचा काळ मजी पिच्चर वाल्याचा शिजन. तेला जास्त पैस दिउन आदी सुपारी दयाय लागायची. तारीक बी त्येज्या सवडीन.
तारीक येगदा फिक्स झाली की तेंच्या ग्रुपच गडी माईक फुटलं आसल आरडून ,वरडून पुकारायची. माईक काय येवड सरळ्या झवण्याचं हुतं वी. पुकारायच्या आदी दहा मिंट तेला सरळ कराय जायाची. नायतर किर्रर्रर्र आसा कान फाटायसारखा आवाज चिचणीच्या शिवला जायाचा. आरं आवाज कमी करा म्हणून माणसं बोंबलायची. तर मायकवाल्याची तारांबळ उडायची.
मदीच पोर बच्चन, दादा कोंडके, निळू फुले, हेंच्या आवाजात पुकारायची. पिच्चर हाय म्हणून सांगायची. तवर सुबराव आण्णा तिकडं फिरत फिरत आला की पोर पुकारा म्हणून आण्णाला घळ घालायची. आण्णा म्हणाययचा… हालो…. गावातल्या साऱ्या बायका, मानस, तरणी म्हातारी साऱ्या लोकांनी प्रसाद घ्यायला मधल्या आळीला याचाय बरका. प्रसाद झाला की चांगला गाजल्याला घायाळ पिच्चर पोरांनी आनलाय. त्यो सारयांनी बगाय याचाय. परत तेला सांगिटलं, मला न्हाय सांगिटलं आसल काय चालणार न्हाय. तरी यायची कृपा करा. आख्या गावाला खणखणीत आवाजात निरोप मिळायचा. पोरांच दिवसभर पुकारन चालू आसायचं.
संध्याकाळी पिच्चरला जायासाठी काम आवराय दिवसभर लोकांची गडबड आसायची. बायका सयपाक पाणी करून ,गडी वैरणी, शेन ,धारा, आवरून जिऊन.. खाऊन तंग आसायची. बारक्या पोरासनी पिच्चरचा आवाज यील तसं काय घरात दम निगतुय वी. ती घाय करायची. पोरं शिटर , कांन टुपी, बायका, कार्प तर गडी मपरेल बांधून चादरी गुंडाळून गावाची वाट धरायचं. आसली तर ब्याटरी नायतर काच पुसून खंदीलं लाऊन मळ्यातली माणसं गावाकडं निगायची. नुसती येकाच घरातली न्हाय तर आख्या वस्तीवली माणसं म्योळ करून याची. चालत नायतर मग बैलगाडी जुपायची.
बायकांची बडबड, ब्याट्री, खंदीलाच्या उजीडान कुत्री कोयाळ उटवायची. माणूस मेल्यागत सूर धरून रडायची. गावातली बारकी पोर सात वाजल्यापासन तंग हुन पिच्चर लागायच्या जाग्याव घुटमळायची. पिच्चरवाला आला की पयला तेला आन खायाला घालायचं. लय ताल तेजा. तेला घुटका, तंबाकू , पानं सुपारी काय पायजी नगु बगाय लागायचं. त्यो कवा आट वाजूसतर याचा नायतर उशीर बी व्हायचा. कवा कवा माणसं गोळा झाल्याव त्यो याचा. तवर पुकारणाऱ्यांची दांडगी आब्दा. आता पाचच मिंटात पिच्चर चालू हुणार हाय. आस कमीत कमी तासभर त्यो पुकरायचा पण पाच मिंट व्हायची न्हायत. माणसं दम काडायची न्हायती.
मापाच्या दोन काट्यासनी पांढरा पडदा बांधायचा. त्या काट्या रवायच्या. तवर मिशनी भायर काडून जोडाजुडी सुरू झाल्याली आसायची. पिच्चरवाल्याच्या हाताखाली सामान दयायला ढीगभर पोर गोळा व्हायची. डांबावर आकडा टाकून लाईट आसायची. आकडा टाकला की पाटीबर ठिणग्या खाली पडायच्या. तवर माणसं बसवून घ्याय पुकराय लागायचं. बायकांची लाईन, गड्यांची लाईन आशी बसाय जागा हुती. खाली दगडी रस्ता.
मानस बसाय पुती आणायची. नायतर चपला गांडीखाली ठिऊन बसायची. जोडाजुडी हुन मिशनीच्या किरणांचा फोकस पडदयाव पडला की पोरांच्या शिट्ट्यांचा पाऊस पडायचा. खार्रर्रर्र खार्रर्रर्र आवाज, पडदयावरली चित्र आडकायची, जी एस च्या ची जाहिरात आनी बरच काय लागायचं. साडे नऊ च धा नायतर साडे दहा व्हायचं. गावच्या कारभाऱ्याच्या हातानं नारर्योळ फुटायचा. लय मान आसायचा फोडणारयाला. नाऱ्योळ फुटला रं.. फुटला की भकल माणसात फेकायची.
ये गाबड्यानु बाजूला सरका, फुडली. खाली बसा रं. आर कशाला आडवं येताय. आशा हाळ्या मागच्या मानसांच्या याच्या. काय जन मागणं खड मारून बसाय सांगायचं. मग येकाद भांडकुर पोरग ऊब राहून अंदाजानच पोत्यान शिव्या घालायचं. किरणांच्या आडवं कोण चालला की पडदयाव मोटा च्या मोटा माणूस दिसायचा. जाहिराती संपल्या की पिच्चरच नाव. आवाज वाजतच मोट्या आक्षरात नाव याचं. माणसं हारकून जायाची. ढुंगण उचलून बगायची. माहेरच्या साडीगत पिच्चर आसला की आलका कुबल चा छळ बगून बाया शिव्या घालायच्या, चू….. चू करायच्या. बायका त्या ठिकाणी आपुनच हाय. आस समजायच्या. तवा मुक्का घ्यायचा सिन आताच्यागत बिनधास्त दावत न्हवती. नट आणि नटीच त्वांड जवळ आल की झाडाची दोन फुलं चिकाटल्याली पडद्यावर दावायची. मानस समजायची ही मुक्का घ्यायल्यात. आसल्या सिनला तरणी गाबडी चेकळायची.
शिट्ट्या दयायची. बलात्काराचा सिन आला की व्हीलनची बायच्या पदरासंग झोंबाझुंबी व्हायची. तुला जाळाय न्हेला कडूला. म्हणत बाया तेला शिव्या घालायच्या, कळकळायच्या. पिच्चर मजी आपलं जगणं हाय आस वाटायचं. निम्मा पिच्चर झाला की मदीच रीळ संपायची. माणसात कालवा उटायचा. काय जण तेवड्या येळात मुताय जाऊन याची. कवा कवा लाईट मदीच जायाची. भ्या वाटायचं. लाईट न्हाय आली आणि निम्मा पिच्चर राह्यला तर काय करायचं. पण लायट याची. काय आनंद सांगावा तुमाला तवाचा. नुसत्या शिट्ट्याच की.
येकच्या टायमाला पिच्चर संपायचा. सार सामान गुंडळून पिच्चर वाल्याला येवस्तीत घराकडं घालवुस्तर पोरांची जबाबदारी आसायची. नायतर कवा कवा त्यो गावातच झोपायचा. सकाळी निगुन जायचा. माणसं त्यो पिच्चर डोसक्यात घिऊन घराकडं निगायची. वाटणं घरला जाताना तेंन आस कराय पायजी हुतं. तसं कराय पायजी हुतं म्हणत घर जवळ करायची. रानातनी काम करताना दोन दोन तीन तीन दिवस पिच्चरवर चर्चा व्हायच्या.
पोरांनी चांगला पिच्चर आनलावता म्हणायची. लोकांच्या त्या कौतुकान पोरांची छाती भरून याची. फुडल्या वर्षी ह्यो पिच्चर आनुया म्हणत जुळणी करून पोर फुडल्या वरसाची वाट बगत बसायची. आता पकरतेकाकड मोबाईल आला. घराघरात टीव्ही आला. कुटबी बसून आता मोबाईलवर पिच्चर बगाय यितुय. पण त्या पडदयावल्या पिच्चरचा त्यो गोडवा आता राह्यला न्हाय. जत्रतनी, गावा गावात लागणार पडदयावल पिच्चर बंद पडल्यात. मोबाईलमुळ माणसं बोलणं ईसरत मुकी झाल्यात. आता मदल्या आळीला कवा गेलं की सारं धेनात येतय. मग आमी कमावलं काय..? आणि गमावलं काय..? हेजा हिशोब दिवसभर डोसक्यात थैमान घालतुय.
फोटो स्रोत: गुगल