गावाकडची बुत्ती:
गावाकडची बुत्ती:
विनायक कदम:९६६५६५६७२३
आत्ता बुत्ती म्हनल्याव तुमास्नी वाटलं ही काय नवी भानगड सांगतुय ह्यो. तेज आस हुतं. गावाकडं नवी लगीन हुन सून पयल्यांदा आली, ती गरवार राह्यली, डोळं जेवान आलं, बाळत झाली, घराला गारवा आनला तर लोकासानी लाडू, पेडं, जिलीबी, केळं, पोळ्या,कानुल ज्यो त्यो आपल्या आयपतींन दयायचा तेला बुत्ती म्हनत्यात. तवा काय मोबाईल हुतं वी लगीच कळाय. त्यात पोरगं झालं की पेड वाटायचं. आनी पुरगी झाली की जिलीबी. नांदायला जानाऱ्या पुरीच्या घरची मानस नव्या पावन्याकड चौकशी करायची. गावात हुंबरा किती. मग मानस बुत्ती वाटनाऱ्या मानसाला पक्का आकडा ईचारायची. तेंन सांगिटलं की मग मानस बुत्ती घ्यायची.
कानुल, पोळ्या ,लाडू, बायका रात रात बरं जागून करायच्या. बुत्ती दयायची हाय त्या घरात करू लागाय आजूबाजूच्या चार घरातल्या बायका गोळा व्हायच्या. पुरीच्या तिकडची खुशाली ईचारायच्या. तुजा कारभारी कसाय, सासू कशिय, जिमीन कितीय, मळ्यात काय हाय, जनावरं, दूध दुपत किती हाय, घरात मानस किती हायत आसल्या साऱ्या खानी सुमारी बाया पुरगीला ईचारायच्या. कारभारी कसा हाय, तेला खाईदवार कसा ठेवायचा, सासूच मन कसं जितायच, पोक्त, म्हाताऱ्या बाया नव्या न्हवरीला सांगायच्या. बुत्ती करत करत साऱ्या गावाच्या गुष्टी ती नांदाय जात न्हाय हितन मस गाब जायना हितपातूर चर्चा व्हायची. तवा काय ग्यास हुता वी.? सारं चुलीव चालायचं.
झोपचा भर हुन डुलक्या याय लागल्या की घटमुट आकरी दुधाचा झणझणीत च्या बाया करायच्या. लाकडं घालून घालून लालभडक पडल्याल इंगाळ तवा….तवाच च्या ला कड आनायचं. झोपा जायाच्या. परत नव्यानं जुपी व्हायची. चार पाच बायकांची मनगाट घायला यायची. बुत्तीच करून झालं की मग दुरड्या बांदायच्या. बांदताना खाली काय घालायचं, मदी काय घालायचं,तोंडाला कसलं घालायचं आसल ओक्के काम त्यात मुरल्याली गरतुली बाय करायची. भरून झालं की पांढऱ्या धोतऱ्याच्या धडप्यात बुट्टी फिट्ट बांधायची. मग घरात ,आल्याल्या बायांच्या घरला मनसोक्त ताट भ…भरून जायाची. पाट व्हायची. कोंबड आरडायचं. मग त्याच तापल्याल्या इंगळाव बायासनी आंगुळीला पानी ठेवायचं. तवर त्या तंबाकू भाजून मिसरी लावायच्या. काय हागाय जायाच्या. शिककाय शिजवून त्या बायासनी दनानून पानी घालून, च्या दिऊन केल्याल, लाडू, जिलीबी, पेडं, पोळ्या ताट, परात भरून दयायची.
पुरगीला सोडायला जानारा मुराळी दिवस उगवाय आवरून तंग आसायचा. येकतर बैलगाडी ,नायतर लय लांब आसल तर इस्टी. पुरगी नांदाय जानाऱ्या पुरीला घालवाय सारी वस्ती ,गल्ली गोळा व्हायची. आय लिकीची रडारड उटायची. बाया म्हनायच्या बाय नांदून आय बा चं नाव कर. गाव जवळ आसल तर मुराळी बाराच्या आत पोचायचा. मग हाळदी कुकवाला सारया गावाच्या बायका बोलवायच्या. तवा मोबाईल न्हवत. मोटारसायकली लय न्हवत्या. सायकल नायतर चालत आवातन गुरव दयायचा. घरटी बाय हाळदी कुकवाला यायची. दाल्ल्याच झनझनीत नाव घिऊन बायका दुरड्या सोडायच्या. पोळ्या चांगल्या आसल्या तर करनाऱ्या सुगरनिंचं कौतुक व्हायची. काय आसल ती येक येक परतेक बायला दिऊन हाळद कुक्कु लाऊन पाऊनचार करून बाया घरला जायाच्या.
मग बुत्ती वाटनाऱ्याला बुलवून तेज्या गळ्यात ती दुरडी घालायची. वाटनार गडी आसल तर त्यो सायकल ला माग दुरडी बांदायचा. तर हांडेल ला फूड दोन वायरच्या पिशव्या. बाय मानूस आसल तर डोसक्यावन दुरडी न्हयायची. परतेक घराच्या भायर जाऊन त्यो बुत्ती घ्या वयनी, आस म्हनून हाळी दयायचा. मग घरातन कोनतर भायर याचं. कुनाची बुत्ती ईचारायच. त्यो सांगायचा आमुक आमुक सून नांदाय आली, पोरगं झालं, घराला गारवा आनलाय. मग कळायचं कुनाच्यात काय झालंय. त्यो मोट्या वाडग्यात टाकून काय आसल ती दयाचा. मग ती घिऊन त्यातनं जुंधळ, घव, मका, तांदूळ मानस काय आसल ती दयायची. दिवसात त्यो सारी घरं टिपून त्या घरला ठरल्याल पैस न्ह्याय जायाचा. नुसतं पैसच नाय तर नाऱ्योळ, कापडं, टावेल टुपी ,पानसुपारी दिऊन तेजा सन्मान व्हायचा. तेला जेवाय घालून तेज्या घरला खायाचं जिन्नस दिऊन घालवायची.
पूर्वी मानसांच्यात लय गोडवा हुता. बुत्ती आली मजी कायतर चांगली वार्ता आली आसा लोकांचा आंदाज आसायचा. मोबाईल न्हवत. मग गावात कुनाच्या घरात काय चाललंय ही कळायला लोकांनी बुत्ती सारखी सिष्टीम लावलीवती. हाळदी कुकवाच्या निमतांन घरा….घरातल्या बायका भायर पडायच्या. कुनाचं कसं… कुनाचं कसं आसलं बगायची, कुनाचा प्रपंचा चांगला चाललाय, कुनाचा बारगळलाय चर्चा व्हायची. आल्याली बुत्ती सारं घरं जरा जरा खायाच. त्यात गोडवा हुता. आता मोबाईल ,गाडी, एसटी दळणवळणाची साधनं वाढली. आता व्हाट्सअँप मूळ त्या गल्लीतला मानूस शेवटच्या घटका मुजतुय तवरच भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट पोरं व्हायरल करत्यात. बुत्तीत गोडवा हुता तेज्यामुळं गावाकडं लोकात संवाद व्हायचा.
आता गावाकडं मोजक्याच घरच्या बुत्त्या कवातर येत्यात. बुत्ती दयायची प्रथा बंद होत आल्या. आमच्या गावातला भास्कर आप्पा आजून कवातर बुत्ती दयाय इतुय. बाजारात, बेकरीत आता तयार सारं मिळतंय. पन आमच्या आय,आज्जी,भन, आत्ती, चुलती, मावशा, शेजारच्या बाया हेनी रातभर जागून केल्याल्या बुत्तीचा गोडवा त्यात नाय ओ.