“दूरच्या कुपवाड एमआयडीसीत’ बिरोबाच्या बनात”
“दूरच्या कुपवाड एमआयडीसीत’ बिरोबाच्या बनात”
विनायक कदम:९६६५६५६७२३
दुपारी १ ची येळ. कुपवाड एमआयडीसीत यंत्रांचा धाड धाड आवाज सुरू हुता. तर याच एमआयडीसीत ११३ वर्षांपूर्वीच्या बिरोबाच्या चरणी माथा टेकायला सात ते आठ हजार माणसांचं लेंडार लागलं हुत. ५ ते ६ एकराच्या त्या परिसराला आता जत्रेच स्वरूप आलं हुत. मंदिराच्या समोर ब्यांड वाल्यांगत हिरवा कोट घालून नारळीची झाड एका रेषेत उभी होती. शेजारी असणाऱ्या पिपळाच्या पानांची होणारी सळसळ नागराज मंजुळे सारख्या उमद्या डायरेकटरला क्यामेरा लावून शूट करण्यास खुणावत होती. डाव्या बाजूला भर उन्हात गाड्या सभ्यतेन उब्या हुत्या. कुल्फी ,गारीगार , सोडा हेनी भर उन्हात गारवा आणला हुता. गर्भवतीप्रमाणे दिसणाऱ्या झाडांनी हिरवी चादर पांघरत खाली बसलेल्या मंडळींना एसी चा गारवा दिलावता.

ऊन मी म्हणत हुत. पण अशा उन्हात आग ओकणाऱ्या सुर्यालाही नादवणारा ढोल ,ढिम्म पांग टिपांग करून घुमत हुता. डोसक्याला कपाळभर भंडारा लाऊन ,बारीक कुचीची टोपी, लालभडक फेटा, मनगटावर काळा, लाल दोरा बांधलेला, उंचीपूरी भारदस्त शरीरयष्टी ,कोरलेली दाढी ,काळी घोंगडी गळ्यात टाकून दहा ,दहा किलो वजनाचे ढोल वाजवण्यात तरबेज असणारे व आजूबाजूबाजूच्या दहा गावातले बोलावलेलेले धनगर एका सुरात, एका तालात ढोल बडवत हुते.
जत्रेसाठी आलेला व चिचच्या सावलीत बसलेला पै .पावण्याचा गोतावळा आजच्या उध्वस्त झालेल्या कुटुंब व्यवस्थेला धडे देत होता. येकमेकांची ख्याली खुशाली ,संसाराचा गाडा कसा चाललाय ईचारत हुता. मंदिराच्या समोर येकादया महालात घालावा असा कार्तिक मांडव घाटलावता. हजारो नारळानी येकाच ठिकाणी कपाळमोक्ष करून घेटला हुता. तर बिरोबा मंदिराच्या दोन्ही बाजूला आसणारं दोन काळकुट्ट दगडी बकरे पोलिसांप्रमाणे येणाऱ्या हजारोंच्या गर्दीवर सीसीटीव्ही गत नजर ठेवत जागता पहारा देत हुतं.

दुपारचं उन्ह आता चांगलच वाढलं हुत, आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला पोटच्या खंडोबासाठी शाकाहारी व मांसाहारी आशा सवती मोठ्या दिमाखात उभ्या होत्या. वैशाखात बहरलेल्या पिंपळाच्या झाडाखाली बापू बिरु चेहऱ्यात, विचारान प्रेरित झालेला दिसत होता. तरुण पोरात महादेव जानकर, व गोपीचंद पडळकर यांच्यातला तरुणपणातील जोश दिसत हुता. बऱ्याच बायका शुद्ध व कोमल आसणाऱ्या बिरोबाला काकला घिऊ मिरवत हुत्या. वाराबी मातीला घिऊन ढोलासंग नादवला हुता.

भर उन्हान घामानं निथळणारी पोर व त्यांची कापड भंडारयांन पिवळी धमक झालीवती. पिकल्या दाढीत तारुण्य नजरेस येत होतं. गरीब, श्रीमंती आसला भेद न करता साऱ्यासनी जेवायला मातीत बसायची सोय हुती. स्टीलच्या दुनियेत जरमलच्या पांढऱ्या शिपत ताटल्या साऱ्यासनी वाटल्या. पूर्वीच्या काळी पारावर तमाशा तसा पिपळाच्या झाडाखाली जेवाण हुतं. सारीकडं घमघमाट सुटला हुता , त्या वासानं मी कधी जेवायला बस्तुय हेजी घाय साऱ्यासनी लागलीवती. पण तरीबी दंगा, गडबड, गोंधळ कुठंच दिसत न्हवता. मोठमोठ्या भगुल्यातन रश्याच्या लालभडक बादल्या काढल्या गेल्या. ट्रॅकटरची ट्रॉली भरून पांढऱ्या शाळवाच्या भाकरी होत्या. रंजल्या गांजल्यांच्या दुनियेत येखाद्याच आयुष्य यिरघळून जावं तशी भाकरी रश्यात यिरघळणार हुती. पंचतारांकित हॉटेलमध्ये न मिळणारा आनंद त्या मातीतल्या सुगंधात दरवळत होता.
११३ वर्षांच्या जुन्या त्या बिरोबाची जत्रा प्रत्येक वर्षी मे महिन्यात भरत्या. यात्रेच्या आदल्या दिवशी बायका आनवाणी डोसक्यावरून आंबिलीच्या घागरी आणत्यात. रात्री पिठलं भाकरी खाऊन ढोलवादन करत्यात. समाजातल्या साऱ्या घरातन २ किलो ज्वारीचं पीठ दिऊन यात्रेला येणाऱ्या लोकांसाठी भाकरी करत्यात. ४ वाजायचा सुमार आलावता.

रस्सा खाऊन भाजलेली तोंड थंड आईस्क्रीम व बरफाच्या गोळ्याच्या गाड्याकड धावली. जेवण उरकली हुती. सारीजण तृप्त हुन नातलगांना निरोप देत परतीच्या मार्गाला लागलीवती, जत्रा फुटू लागली. पुना फुढच्या जत्रला यायचा शब्द दिऊन व बिरोबाची आण घेऊन. आज गावोगावी यात्रा, जत्रांचं जेवण ताट वाटीत टेबलवर आलं. पण कुपवाड एमआयडीसीत आसणाऱ्या त्या बिरोबाच्या मातीतला सुगंध,चव व माणसांमधला गोडवा बाकी कुठंच मला दिसला नाय…..

फोटो क्लिक: प्रा: कुलदीप देवकुळे, लक्ष्मण हुलवान, सचिन ठाणेकर