--------------------------------- ======================================

दिलीप भावची घवाची मळनी:

दिलीप भावची घवाची मळनी:

विनायक कदम: ९६६५६५६७२३

गावाकडच जगनं, माती, मानसं, भानगडी, घटना, सारच भारी. त्या करामती कुनी सांगिटल्या तर फुडची मानसं हासून पालती पडाय पायजीत. आसलाच येक भन्नाट किस्सा परवा गावात दिलीप भाव सांगत हुतं. सताट वरसा पूर्वीची गोष्ट आसल. तवा बुध्याच दिलीप भाव लोडयाच सरपंच हुतं. 

रानातली द्राक्षबाग काडून रानात घव केलता. मानूस दिसायचं न्हाय येवडा फेकत घव आलता. पन कुडी बारीक पडलीवती. आडीच हाजार काड निगाल. मानसं काड कापून, पेंडया बांधून आंबली. आता काडलाय म्हनल्याव मळाय नगु वी मग. तवा गावात दसरथ आन्नाची  मळायची मिशन. येकच हुती.  लोकांडी चाकाची. वाजतच रस्त्याच दगाड फोडत याची. ईनु रुपनराची बैल सकाळी सकाळी जुपून बुध्याच माळ गाटलं. माणसं आली. आट वाजता केनातल त्याल घालून हांडेल मारला.

 भल मोट काड. घव पडनातीच नुसतं भुसकाटच. गडी काड दाबून दाबून रडकुंडीला आला. रानाच खात मुत खाऊन काड लांबलवत. लोम्ब्या लांबल्याच न्हायत. जेवाय बाराच्या टायमाला मिशन बंद किली. पोत्यात दोन चार पायली घव आसल. दसरत आन्नान मंडल्याच्या धन्याला मिशनिव काड दाबायला हाजरीन बोलवला. गडी बाटलीच नादया. मळनी हुईना, पुती भरनाती,परवडायच कसं हेज टेन्शन यिऊन ईनु आनी आन्ना पिऊन तंग झालं. काड बारीक करून करून मिशन बी घायला आलती. दिस मावळता मावळता याक पोत कसतर भरलं.

मिशन तितच सुडून आन्ना घरला आला. ईनु बैल घिऊन घरला गेला. जाताना ईनुला हाळी दिऊन हातानच खुनवत सांगिटलं शांतीच्यात दारूला य. मळनीच हुबाल टेन्शन दारुन कमी केलं. दुसरा दिस उगावला. जुपी झाली पन कालचीच तरा आज हुती. येतानाच  आन्ना तंग हुन आलता. आल्याव दिलीप भावला तिरक्या ढोसन्या हानाय लागला. काड काय हाय भाव मळनी आसावी तर आसली. तेंच्या बोलन्यातली भानगड भावच्या धेनात आली पन गप चुरम दिल.

 पयल्या दिवशी १० लिटर त्याल परत दुसऱ्या दिवशी १० लिटर त्याल टाकीत वतलं. मानसं काड आनून देत हुती, आन्ना काड दाबत हुता, पोत भरत न्हवत आनी इंजान लोडवर यिऊन आरडत काळा धूर टाकत हुतं. ह्यो खयोळ बगाय आनी इंजान का येवड आराडतय म्हणून बगाय घोडवाला रामप्रबू आला. दिस मावळतीला आलता. दुसरं पोत दिवसात भरत आलत.  गुलालाची टिकली लावल्याल्या आन्नाच्या डोसक्याव आठ्या पडल्यावत्या. तेवड पोत भरलं आनी मिशन बंद किली. परत आन्ना म्हनाय लागलं भाव मळनी आसावी तर आशी. कंडकाच काम.

 आन्ना दिलीप भावला म्हनला तुमाला जेवान दीतू मळनीबद्दल मी आज. भाव हासाय लागलं. मी दीतू की कूट जायाचं सांगा म्हनलं. मग बलगुड फाट्याव जायाचं ठरलं. जायाचं कशान तर रामप्रभु म्हनला आपली गाडी हाय की. भाव भाबड्या पनांन म्हनल हेन कवा गाडी घिटल्या. गाडी मजी घोडागाडी हाय ओ. आवरून भावला गावात याय सांगिटलं. रामप्रभूची राधा नावाची दिकनी घुडी हुती. नाव घेसतोर घुडी आत्राळी हुन पळायची. जुडीला मानीक ठोंबऱ्याची घुडी आनली. पन ती गाबनी हाय म्हनल्याव बाळू चवानचा घोडा आनला. घोड आनून जुपायपातूर भाव तेंच्यामागच. सरपंच हाय म्हनून काय तोरा न्हवता. आपुन कोनंतर येगळ हाय आसल दावाव आसल काय डोसक्यात न्हवत. आख्या गावात कुनाच्यात बी ह्यो माणूस मिसळायचा.

 घोडा जुपायच्या आदी शांतीकड जाऊन चौग पिऊन तंग झाली. गाडी जुपली. कवलग्यात गेल्याव परत चार बाटल्या आनल्या. जेवताना प्यायला. कवलग्यातन बलगुड हायवेला जायाला जानाऱ्या रस्त्याला लागली आनी दशरथ आन्नान राधे म्हणून हाळी दिली. घुडींन कान खड केलंन भिंगरी उटवली. खाऊन मांदालल्याल ती उमद जनावरं आंगात ईज संच्यारल्यागत पळाय लागलं. बाजूच घोड बी त्याच पावरीच हुतं. मग काय म्योळच बसला. आंधार कापत घुडी आंतर कापत हुती. पळाव छकडा गाडीत चौग चौड्याव बसलीवती. डांबरी आणि चाकाच घर्षन हुन खाली ठिनग्या उडत हुत्या. भाव म्हनल काय ठिणग्या उडत्यात्या. तस राधे म्हणून आन्नान हाळी दिली. घोड्यांचा हुबाला पळ चालू हुता.

तवर मागन येक चारचाकी गाडी  हेंच्या गाडीच्या फूड आली. गाडीच्या लायटीच्या आंदाजाव घुडी पळाय लागली. मागन राधे म्हणून  आन्ना हाळ्या देत हुता. घोड्यासनी गती हुती. गाडीच्या मागुमाग शंभर फुटावर घुडी हुती. तवर गाडीवाला गाडी वळवाय गेला तसं घुडी गाडीव चडली. घोडागाडीच्या दांड्या आरपार घुसल्या.घुडी बॉनेटवर. सारी बोंबाबोंब. घुडी थांबली. त्या बाबाच्या डोसक्याला लागलवत. गांडूच पत्र चेपलवत. त्यो गुरगुरतच दार उगडून आला. आन्ना म्हनला आर काडा गाडी छला. बाब बितारलं. कूट जाताय म्हनत मोबाईल काडून पुलीसासानी फोन केला. हेंच्याकड कुटला फोन. दिलीप भावच्याच घरातला फोन हुता. पन फोन कूटन करायचा. बलगुडच्या ग्रामपंचायतीतन फोन करूया छला म्हनलं. तर बाबा म्हनला हितच थांबायचं. मग तेज्या मोबाईल वरन घराकडं फोन केला. बलगुड फाटीव आपघात येवडच त्यासनी आयकाय गेलं आनी फोन कट झाला.

 रामप्रभू च्या पायाच्या आंगट्याला लागलवत. घुडी सुडून झाडाला बांधली. त्यासनी काय झालं न्हवत. गडी बांधाव बसलवत. तवर दिलीप भावचा भाव व पुतन्या उत्तम आली. आट वाजता अपघात झाल्याला. पुलीस रात्री बारा वाजता आली. पंचनामा सुरू झाला. तीन हाजार भरपाई पायजी म्हणून त्यो बाबा आडून बसला. रामप्रभू म्हनला ह्यो  गापशिरी येगदम वळलाय आमच्या गाडीला काय ब्रेक हायत वी. आमी काय देत नस्तुय भरपाई. व्हय व्हय म्हणत मागन आन्नाला  ईनुन  सूर दिला. हुज्जत वाढत हुती. त्यातल्या एका पुलीसांन भावला वळकल. सरपंच गाडीत या म्हनून बोलावलं. लय वाडवू  नगा तेला हाजार आनी आमाला दोनशे दया मिटवून टाका विषय म्हनला. भावन पैस दिल.

साडेबाराला घोड जुपल. साऱ्यांच्याच पोटात आग पडलीवती. आता आन्ना राधीला हाळी देत न्हवता. कोन कुनालाच बोलत न्हवत. आंधार गडद होत गारटा वाडत हुता, सारा गाव झोपलावता, कुत्री भूकत हुती आनी धुडक्या चालीवर घुडी गाव जवळ करत हुती…

फोटो सौजन्य: गुगल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *