--------------------------------- ======================================
Uncategorizedगावाकडची माणसं

देवराष्ट्रेच्या रवीच्या कलेच्या प्रेमात “टाटा” हायत

देवराष्ट्रेच्या रवीच्या कलेच्या प्रेमात “टाटा” हायत

विनायक कदम:९६६५६५६७२३

सरकारी नोकऱ्यांसाठी पोरं दिवसरात्र येक कराल्यात. पोराला नुकरी नसलं तर ती जगण्यालायकच न्हाय आसा समज पोरांच्या आय.. बा .. चा आता झालाय. मग कलाकार माणसाला कोण हिंगलतय. सांगली जिल्ह्यातल्या देवराष्ट्रेच्या रवींद्र शिंदेचा बा कोकरूडला पाटबंधारे खात्यात. सरकारी नोकरदार माणूस. रवी मजी रसायन येगळ हुतं. तेज मन शाळत कवा रमल नाय. सातवीचा आसताना मातीचा गणपती करून खाट खाली ठेवलावता. घरात शिव्या देत्याल म्हणून चुरून गड्याचा उद्योग सुरू हुता. घरात संशय आला. ही खाट खाली का सारखं घुसतंय. बघिटलं तर हेंन गणपती केलता. साऱ्या गल्लीतल्या बाया गोळा झाल्या. तेज्या कलेचं कौतुक साऱ्यानी केलं. आणि कला तेज्या डोसक्यात फिट्ट बसली.

बारक्यापनीच हातात ब्रश आलं. पयल पेंटिंग आय बा चं काढून तेजी तेंन फेम करून आणली आणि बगून आय बाच्या डोळ्यात पाणी तरळल. हेला जी आवडतंय ती करूदी म्हणून तेंनी हेला मोकाट सोडला. कोकरूड मधन वडलाची कोकणात गुहागरला बदली झाली आणि निसर्ग हेज्या डोसक्यात घुसला. समुद्राकडला तासंनतास बसायचं. निसर्ग बगायचा, चित्र काडायची आणि शंख शिंपल गोळा करायचा नाद लागला. शांतिनिकेतनला कला शाखेच शिक्षण सुरू झालं. रवीच्या कलेतल बारकावं ,तेजी पेंटिंग बगून मास्तर खुश व्हायचं. कोकणात राह्यल्याला गडी. २४ तास नुसता निसर्गच तेज्या डोसक्यात. वडलांचं दोस्त शाम देसाई चित्रकार हुतं. हेजी कला बगून तेंनी साऱ्यानी हेला पाठबळ दया म्हणून घरात खडसावल.

पदवीच शिक्षण झालं. कलाशिक्षक म्हणून कूट नुकरी लागत्या का बगूया म्हणून तेंन काय ठिकाणी प्रयत्न केल. पण तेज्या कलेची कदर कुणी नाय किली. तेंन आपल्या कामात गाडून घेटलं. डोसक्यातल जी हाय ती ब्रश घिऊन कागदाव काडाय सुरू केलं. हेज काय हूईल म्हायती नाय. दोन दोन दिवस तीन तीन दिवस घराच्या वरच्या मजल्याव तेंन गाडून घेटलं. त्यो काय कर्तुय घरातल्यासनी पण कळायचं नाय. आन खायालाच तेवढ खाली याचा. येकादा विषय डोसक्यात आला की रातभर बसून त्यो पेंटींग काडायचा. जाऊन रात्री बसल्याला रवी दिवस उगवायला आंगुळ करायलाच ऊटायचा.

पेंटिंगची आवड, तेज्यातली आक्कल आसणाऱ्या लोकांनी तेज्या कलेची पारख किली. तेजी पेंटिंग विकत घ्याय सुरवात किली आणि रवी सुखावला. लॉकडाऊन च्या काळात तेला भरपूर येळ मिळाला. आणि गुहागर मधन गोळा करून आणल्याली तीन पुती शंख शिंपल चाळून त्यातनं तेंन विविध कला साकारल्या. नुसतं शंख शिंपल वापरून तेंन विविध आकाराचं गणपती, बगळयांचा थवा, फ्लेमिंगो पक्षी, मेलेलं हारीन खाणारी गिधाड, शिंपल्यातला नंदी, घोड्यावर संसार घालून चालल्याला मेंढपाळ वाल्याचा संसार बगून माणूस डोसक्याला हात लावंतय. त्या घोड्याव नुसता संसाराचं न्हाय, बाजल,खुरुडी, कुराड, आकडी, वागर, धान्य,घागर, बारडी, पाल माराय काठ्या, घोंगड सारं हाय. ही सारं कराय ,शिकाय तेंन लय पालथं घातलंय. तेंन बारीक बारीक सामान तयार कराय काय काय केलं ही आयकल्याव डोसक्यात मुंग्या आल्या. कुराड तयार कराय थम्सअप च्या लहान टिन च टोपाण घासून तेजी कुराड किली. स्वतः खुरुड ,बाजल ईनल. शिंपल्या पासन येक मूर्ती करायला१५ ते २० दिवस जात्यात. एका शिंपल्याला ,शंखाला तेज्या बरोबरीचा हुडकायला कधीकधी हातातंन शे पाचशे शंख शिंपल जात्यात.

आवडलेल्या वस्तू कुटन कुटन आणाय तेंन लय ताप घेतलाय. कोल्हापुरात जोतीबाजवळ जुन घर पाडत हुती. त्यातली दोन दगडं आवडली तेंन मागून आणली. तेज्याव कलाकुसर किली*. कोल्हापुरात गटारीत येक दगुड पडलावता. काडायचा कसा, दिवसा माणसं काय म्हणत्याल म्हणून रात्र हुस्तोर त्यो तीत थांबला आणि अंधार पडल्याव दगुड घाणीतन भायर काढला.
सागवानी लाकडाच तुकड तेंन हुडकून आणल. त्यातन दोनचाकी बुलेट, आणि चार चाकी जगवार गाडी तेंन लाकडाची किल्या. गाडीला चाकापासन गिअर पातूर सार लाकूड हाय, ती कोरीवकाम बगून तेज्या संयमाला दाद दयावी वाटत्या. बुलेट कंपनीच मालक गाडी बगून भाळलय. ऑफर पण दिल्या. पण बुलेटवर म्हयनाबर कोरीवकाम सुरू हुतं. तेला पेंटिंग करायला दोन, तीन दिवस जात्यात. रवीची निसर्गाची काय पेंटिंग एका डॉक्टरला आवडली.

डॉक्टर विकत घिऊन गेला. १ कोटी १० लाखांचं त्यांचं घर पण रवीच पेंटिंग बगून मानस ईचाराय लागली ही कुटन आणलंय. तेज्या कलेपुढं कोटींचा बंगला फिका पडला. जिल्ह्यात सोय नाय. आपल्या कलेचं प्रदर्शन करायला रवीला पुण्या मुंबईला जायला लागतंय. दोन वर्षांपूर्वी मुंबईत आर टी सेंटर मधे रवीच्या पेंटींगच प्रदर्शन लागलं. प्रदर्शनात तेज कौतुक झालं. उद्योगपती रतन टाटा यांचे बंधू नोबेल टाटा प्रदर्शन बगाय आले.समुद्रकिनारा काढलेलं एक पेंटिंग त्यासनी आवडलं. मुंबईत तेंच ५ स्टार हॉटेलचं काम सुरुय. त्या हॉटेलची १५ बाय १२ इतक्या भव्य पेंटिंगची ऑर्डर तेंनी त्याला दिलीय.

रवीच्या कलेची दखल सांगली जिल्ह्यान घितली नाय पण महाराष्ट्र , देश विदेशांन घितल्या. कोल्हापूर पासन सिंगापूर पर्यंत तेजी पेंटिंग गेल्यात. मुंबईतील नामांकित जहाँगीर आर्ट ग्यालरीत आता रवीच प्रदर्शन लागणार हाय. त्यासाठी तेज सिलेक्शन झालंय. तेजी पेंटिंग अमूल्य हायत. पुण्या, मुंबईच्या नादाला लागायचं न्हाय म्हणून तेंन स्वताच्या घरात प्रगल्भ आर्ट ग्यालरी सुरू किल्या. पूर्वीच्या काळी कलेला किंमत हुती. कलेला राजाश्रय हुता. आता चित्रकला विषय संपल्यात जमा हाय. कलाशिक्षक म्हणून जागा भरल्या जात नायत. रवीची आर्ट ग्यालरी बगाय पर्वा मंत्री जयंत पाटील आलते. त्यांनी तीन तास वेळ दिऊन मनसोक्त पाहिलं. त्यातलं बारकावं, बरीच म्हायती घेत तेंनी पेंटिंग विकत घेत तेज्या केलेला दाद दिली. आपल्या मातीतली लेकरं पुण्या मुंबईला नाय तर राज्याला भारी हायत. तेज्या घरात ग्रामीण संस्कृती आणि निसर्ग उतरलाय. मला ऐवडा पगार आणि येवड प्याकेज हाय या मानसिकतेत आडकल्याल्या गड्यानी
टाकाऊ वस्तुपासन आपली कला दावणाऱ्या
रवीची कला येगदा बगा. सारं फिक हाय तेज्या कलेफुढं. देवराष्ट्रेची रवीची प्रगल्भ आर्ट ग्यालरी साऱ्यानी येगदा बगा आणि तेज्या कलेचं कौतुक कराय ईसरु नगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *