दाडदुकीव आवशीद देणारा फिरता दवाखाना: नामा गायकवाड
गर्दीतला आवाज….
विनायक कदम :९६६५६५६७२३
दाडदुकीव आवशीद देणारा फिरता दवाखाना: नामा गायकवाड
गारट वाढलं..तसं माणसं आजारी पडाय सुरवात झाली. दिवसात ऊन, पाऊस आणि थंडी माणसांनी बगीटली. वातावरण बदलान माणसं घायला आली. गारठ्याचा दणका आमच्या दाढवर आला. आधीच किडल्याली दाढ मस्तकाव कुणी घणान घाव घाटल्यागत दुकाय लागली. गोळ्या खाऊन २ दिवस रेटल. दुकणं आंगाव काढतुय डॉक्टर कड जाऊन दाढ काढ म्हणून घरात शाब्दिक हाल्ल व्हायला लागलं. २ दिवस तसंच रेटलं. पण लक्षात आलं आपल्या गावात नामा गायकवाड दाढत पाला पिळतुय. लय लांबन माणसं येत्यात. आपुनबी बगूया येगदा पाला पिळून. पाला पिळायला पारूश्यात च्या बिन पेता आणि पाण्यात ब्वाट बिन घालता जायाला लागतंय. दुकायच रेटना म्हणल्याव नामाच घर सकाळ सकाळ गाठलं.
आजपर्यंत लिलेल्या गर्दीतल्या आवाजासाठी आमच्या लोढ्यात मला पायजी तसं पाच सहा नायक घावलवत. त्यात आता नामाची भर पडली. नामा तसा कलाकार माणूस. शिक्षण शून्य. पण भजन, भारुड पट्टीची म्हणणारा. रक्तातच त्यो वारसा हुता. नामाची दुसरी वळख मजी नामा सोंग काढायला लय ताठ. कुणाचबी ,कसलबी सोंग आसुदी गडी तेला न्याय देणारं. काय वर्षांपूर्वी गावात कुणाचीबी वरात आसुदी नामा ठरल्यालाच. मोराची पीस लावून नामा मोराच सोंग काढायचा. आगदी खऱ्याखुऱ्या मोरागत. गावभर वरात फिरायची, नामाला ठराविक रक्कम माणसं दयायची. आमच्या लोढ्याचा गोपाळकाला शंभर वर्षापेक्षा जास्त वरसाची परंपरा आसल्याला. तवा करमणुकीची साधन आत्ता हायती ईवढी न्हवती. आजूबाजूच्या गावातली बी माणसं खीर खायाला आणि भजन बगाय गावात याची.
दोन दोन गावच्या भजनाच्या बाऱ्या लागायच्या. भजन म्हणणारी, पकवाज वाजवणारी, टाळकरी, पिटीवाल, सुरपिटीवाली आसली येकापरिस येक पट्टीची माणसं. येगदा रातच नऊ वाजता भजनाला जुपी झाली. हेज झालं की तेंच भजन तेंच झालं की हेंच भारुड. भजनाला भजन, आणि भारूडाला भारुड आसा सामना चांगलाच लागला. कोंबड वराडल. कोण माघार घिना. मानस यरबाडली. भजान संपायच कवा? कोणचं माग घिना. प्रचंड इर्षेन दोन्ही गाव पेटून उठलीवती. त्या इर्षेतन अस्सल कला भायर निगत हुती. काय माणसं तोंड धुन, आंगुळ्या करून आली. तरी कोण माघार घिना. धा वाजलं. आकरा वाजलं. कोण माग सराय तयार न्हाय. सोळा तास झालं. सूर्य डोसक्याव आला. वाजवणारया माणसांची बोट सुजली. सोंग काढणारी माणसं घायला आली. पण इर्षेन बेभान झालीवती. सर्व प्रकार हाताभायर जात हुता. म्हाताऱ्या माणसांनी मध्यस्ती करून ही बारी थांबवली. त्या वेळी नामा जवानीत हुता आणि त्यानं ती बारी चांगली गाजवलीवती. गावात श्रीकृष्ण अष्टमीला वाजवाय, सोंगाला ह्यो फूड आस्तुय..आसला ह्यो नामा.
नागपंचमीला मातीच नागुब करावत तर नामानच. लय देखणं. नामाच घर गाठलं. दाढ लागल्या बाबा दुकाय पाला पिळ म्हणून घळ घातली. मी घरात बसलू. नामा कसलातरी झाडपाला आणायला भायर गेला. येताना कसलातरी हिरवागार पाला हातातन चोळतच आला. पाला पिळायचा मजी नेमकं काय करत्यात मलाबी लय म्हायत न्हवत. नामा म्हणला कुठली दाढ दुखत्य? म्या म्हणलं उजवी. भुयला तळवट हातारला आणि मला झोप म्हणला. थंड मजी मी म्हणत हाती. आणि पत्री माराय पाय बांधून खाली पडल्याल्या बैलागत माजी आवस्था झाली. काय कळायच्या आत नामान माझ्या कानात त्या झाडपाल्याचा गार ईचु रस पिळला. आंगाव सरसारुन काटा आला. पण करतूय काय? गप बसण्याशिवाय दुसरा मार्ग न्हवता. कानात पाला ठिऊन नामा माझ्या फूड बसला.
कवापासन करताय र ही ? म्या ईचारल. नामा म्हणला आज्या पासन. तीन डुया झालं. दाढत पाला पिळतुय. किमान पाचश्याच्या वर मानस वरसात हुत्यात. माणसं परतेकाच्या इच्छेन पयस देत्यात. सकाळ सकाळचंच पाला पिळाय लागतुय त्यामुळं चांगला गुण यितुय. पण आता माणसं कवाबी येत्यात आस त्यो म्हणला. येगदा मी पाला पिळल्याला माणूस परत दाढ दुखत्या म्हणून कधी माझ्याकड आला न्हाय आस नामा म्हणला. पाला कशाचा व कसला हाय हे सांगत न्हाय. नायतर गुण येत न्हाय म्हणला. लांब लांबन माणसं विश्वासानं येत्यात. तीन दिवस मला नाचवणारी दाढ, माझ्या दाढत पाला पिळून तीन दिवस झालं काय दुखत न्हवती. पूर्वीच्या काळी दवाखान न्हवत मानस झाडपाल्याच आवशीध करून दुखणी बरी करत हुती. वैद्याला मान सन्मान हुता. लोकांचा विश्वास हुत. आजूनबी काय ठिकाणी झाडपाल्याच येग्येगळ्या गावरणी आवशीध देत्यात त्याचा गुण यितुय.
माळकरी नामाला शेतजमीन न्हाय, पण वासरापासन दणदणीत केल्याली दारातली गाय १९ लिटर दुध दित्या. त्याच्या नावातल्या ना सारख नामाच्या अंगात नानाविध कला. गावातनी आवातन सांगायचं काम बी गडी कर्तुय. आणि ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्याव आसलेल्या प्रचंड प्रेमापोटी गेली ३२ वर्षे त्यो स्व खर्चांन पारायण कर्तुय. सांगली आकाशवाणीसह अनेक नामवंत ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा केल्या. अनेक प्रमाणपत्र मिळाल्यात. तीन डुयाचा नामाचा ह्यो चालता फिरता दवाखाना याफूड बी लोकांच्या दाढदुखी बऱ्या करो…..