छपार:
छपार:
विनायक कदम: ९६६५६५६७२३
वरलीकडच वारं, नायतर बुरबुर सुरू झाली की गावाकडं छपरांच्या कामाला जुपी व्हायची. आता छपर दोन तरची. माणसाची आणि म्हसरांची. छपार येवस्थित तयार करायच मजी लय अवघड काम. पाणी गळणार न्हाय आणि बघणाऱ्याच्या डोळ्यात तेज रूप भराव आस देखणं छपार कराव तर बेरडकीतल्या तानाजी मंडलेंनच. हातात जादू हाय गड्याच्या. लय दिखणी छपर तेन बांधली. छपार करायचं मजी सामान तर काय थोडं लागतंय वी. मिडी, वास, कळाक, उसाचा पाला, काट्या, निर्गुडीच्या बंदाटी, सुवा, तार, तंगूस,पार, कुराड, पांजरान, यिळा.
म्हसराच छपारात दोन तरची आसायची. येक पाक्याची व दोन पाक्याची. जनावर किती हायत तेज्याव लांबी, रुंदी व खुट्याव माप ठरल्याल आसायचं. गडी हातभर खाँल डबर मिडी रवाय काढायच. लिंबाच्या नायतर बाबळीच्या झाडाच्या झनाट मिडी भार पेलत्याल आसल्या हुडकून काडायच्या. परत वास टाकायचं. पोकाळ कळकाच बांबू उब टाकून तेला तारच कट घालून फिट्ट केलं की परत पांजराण लागायचं.

पांजराण कळकीच आसल की येवस्तीत बसून एक लेवल इत्या. तसं मग करंजाचं ठाळ, निरगुडीच्या फोका बी चालायच्या. पण येवस्तीत लावाय लागायचं. छपराव शेकारणारया माणसाची लय तारांबळ उडायची. शेकरणाराच्या हाताखाली काम करायचं मजी लय आवगड काम. तेला पायजी तसं, त्या मापाच सामान दयाला लागायचं.
पांजराण झालं की शेकराय जुपी व्हायची. उन्हाळ्यात वाळल्याल्या उसाचा पाला माणसं गोळा करून ठेवायची. काय जण पेंडया बांधून येवस्तीत छपरासाठी ठेवायची. खालची माणसं पेंडया नायतर पाल कवळ्यान वर फेकायची. वरला माणूस त्यो पाला तेला पायजी तसा लाऊन घ्याचा. लावल्याला पाला यिस्कटाय नगु म्हणून तेज्याव बंदाटी घ्यायची. बंदाटीला शेकारणारा वरचा माणूस आणि छपरात आत योक माणूस लागायचा.
तेला सुवा लागायचा. सुवा मजी तीन चार फूट लोकांडी सळीच्या तोंडाला चपटा आकार दिउन तेला बुळूक आसतय. तार सुव्यात ववुन बंदाटी वरण सुवा आत छपरात ढकलायचा. आतला गडी कळकातन तार ववून परत सुव्याच्या नाकात तिडा मारून दयाचा. चांगल्या काट्या घिऊन बंदाटी झाली की छपराच काम भागलं. शेकारणारा उतरून कूट काय कमी जास्त नजर मारायचा. लोम्बकाळणारा पाला यिळयान कापून आकार दयाचा.

छपार झालं की कुडाची बारी. कायजन कुड तुर्कांटीचा, कायजन कडब्याच्या पेंडया उब्या करून तर काय जण उसाच्या पाल्याचा कुड घेत्यात. आडयावरण येणार पाणी आत येणार न्हाय आशा मापान पनाळीच्या आतन कुड माणसं घ्याची. मग आत खुट्ट रऊन दावन व्हायची. उसाच्याच पाल्याच पण कितीबी पाऊस यिउदी छपार गळत न्हाय. गारट्याच जनावरासनी थंड वाजत न्हाय. छपार नुसतं जनावरासनीच न्हवत तर त्यात दिशी चिमण्या कुटी करून आपली पोरबाळ जलमाला घालायच्या. मांजार पाल्यात कुटतर आळ करून बाळत व्हायचं. माणसाची वर्दळ नसलं अशा जाग्याला शेतात छपार आसल तर मोराला अंडी घालाय तेज्यासारखी दुसरी चांगली आणि सुरक्षित जागा नसायची.
पावसाळ्यात अनेकांच्या हक्काचं ठिकाण मजी छपार. पावसाळ्यात पाणी न येणार थंडीत गारठ्यापासन काळजी घेणार आणि उनाळयात गारवा देणार छपार गावाकडं बी आता कमी झालय. उसाच्या पाल्याच्या झन्झटीत आता कोण पडत न्हाय. पत्र्याची चार पानं टाकली की झालं काम. पण पत्र्यात छपराचा जिव्हाळा न्हाय. छपरावर आवलंबून आसनारी प्राणी, पक्षी यांचं आश्रयस्थानच एका झटक्यात आमी उध्वस्त केलं. पण हेज्याव बोलाय, ईचार कराय आमाला येळ न्हाय. आमचं घर बांधण्याच्या नादात निसर्गातल्या कुणाचतर कुटुंब आमी उध्वस्त करतोय का हेजा ईचार कधीतरी करा. छपरात बी कधीतरी ईसावा घ्या.
फोटो सौजन्य :गुगल