--------------------------------- ======================================

चिंचणीचा छोटा जेसीबी:

          

पंचक्रोशीत गाजतोय चिंचणीचा “छोटा जेसीबी ”

विनायक कदम:९६६५६५६७२३

          छोटा जेसीबी ?? ही काय नवीन ? ह्यात काय येगळं? ही तर चार चाकांचं उकारणार मशीन आसलं. आसणार.! आसं तुम्हालाच काय मलाही सुरवातीला वाटलं. पण तासगाव तालुक्यातल्या चिंचणीत मी दोन पायांचा चालता बोलता छोटा जेसीबी बघितला. त्याचा जन्मच बहुधा खुदाईच्या कामासाठी झाला असावा. वयाच्या १६ व्या वर्षी सुरू झालेलं खुदाईचं काम आजअखेर वयाच्या ६३ व्या वर्षांपर्यंत सुरूच हाय. टिकाव, खोरं, पाटी, पार, घन हेज्यासंगच तेज कायमचं लगीन लागलेलं..! त्याचं हे कष्ट पाहून चिचणी गावानं तेल 'छोटा जेसीबी' अशी उपाधी दिली...!

   गुलाब मोदीनसाब कातराल, वय ६३, मूळ कर्नाटक, जमखंडी गाव मुधोळ, साडेपाच फूट उंच, पिकल्याल केस, डोक्याला टावेलची बांधल्याली टापर, उभट नाक, रुंद कपाळ, त्यावर पडलेल्या आडव्या रेषा, कोरल्यागत रुबाबदार डोळे, पान खाऊन लाल झालेलं तोंड, लांब बाह्याचा अंगरखा, त्याच्या खाली लुंगी असा मुस्लिम पेहराव... असं त्याचं साधारण वर्णन..!
    खुदाईचं काम तसं खूप कष्टाचं; मात्र त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. आपण हाथरुणात असतो त्यावेळीच म्हणजे सकाळी सहालाच गुलाबरावांचा दिवस सुरू होतो. उन्हाचा कडाका वाढायच्या आधी ११ वाजेपर्यंत कामाचा धुरळा पाडायचा. ११ ला जेवायला यायचं! त्यानंतर ४ तास आराम करून परत ३ला जायचं ते रात्री ६ किंवा ७ लाच घरी परतायचं! लोकं काम सांगायला घरी येतात. त्यांना काम शोधत फिरावं लागत नाही. केलेल्या कामाचा मोबदलाही चांगला मिळतो. या प्रामाणिक कष्टाच्या बळावरच त्यानं पोरा-पोरींची लग्नं किली. त्यांचं आता सगळं सुरळीत हाय. पोरगं कर्नाटकात गावाकडं गेलं. आता जेसीबी आणि त्याची बायको दोघंच चिंचणीत महादेवनाथ मंदिराच्या पाठीमागे एका भाड्याच्या खोलीत राहतात.

      "मी मुस्लिम असूनही जातीपातीच्या भिंती कधी आडव्या आल्या नाहीत. या गावानं मला खूप प्रेम दिलं. माझा संसार उभा केला. या गावातच आता उरलेलं आयुष्य घालवायचंय.!" अशी त्यांची प्रामाणिक भावना त्यांनी व्यक्त केली. जेसीबीला माहिती दिली; म्हणून धन्यवाद दिले. माहिती घेऊन निघालो; पण माझ्या डोक्यात प्रश्नांचं थैमान सुरूच होतं. ४४ वर्षात या जेसीबीनं किती काम केलं असेल; याचं काही मोजमाप करता येईल असं वाटत न्हाय. आताच्या काळात माणसाच्या कष्टाला किंमत उरली न्हाय. माणसाची किंमत त्याच्याकडं किती 'गांधीबाबा' हायत; यावर केली जाते. गाडी चालू करून तासगावच्या दिशेने निघालो. अशा माणसांचा समाजानं सन्मान, कौतुक केलं पाहिजे; अशी काळजातून भावना दाटून आली. कुठल्याच सन्मानाची अपेक्षा न ठेवता ४४ वर्षे राबणाऱ्या या जेसीबीचा आपल्या परीने लिखाणातून सन्मान करावा; म्हणून केलेला हा सारा वेडावाकडा लेखनप्रपंच...!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *