चिचनीचा पिरुवाला माळीमामा:
चिचनीचा पिरुवाला माळीमामा:
विनायक कदम:९६६५६५६७२३
डोसक्याला पांडरी टूपी, पांडरा शर्ट, पांडरी इजार, लांबलचक वाढल्याल टूपीतन भायर येनार क्यास. गालावर दाडीच यिस्कटल्याल क्यास. तोंडात लांबलचक दात, त्यातून भायर आलेला योक दात, पायात कातड्याच तुटक व चार ठिकाणी सांधलेलं पायतांन, कामाच्या रोजच्या दटयान हाता पायाची नक सुदा काडायला कवा येळ मिळाला नसल्यानं चपलाच्या भायर ती डोकावत हुती. कमरला काळ्या दोऱ्यात बांधल्याली ती किल्ली निमकी कशाची हुती या प्रश्नच उत्तर काय मला आजून मिळालं न्हाय. गरिबीच्या छटा तोंडावर आनी अंगाव, दिसत हुत्या, खपाला बसल्याल पॉट बरच काय सांगत हुत. आनी फावल्या येळत काजा बिडी फुकत तोंडातन पांढरा धूर भायर सोडणारा असा सहा फूट उंचीचा ह माळी मामा उर्फ( तुकाराम राव माळी) रा. चिंचणी तालुका.तासगाव.सध्याच वय ७०आसल.
माळी मामाच भांडवल मजी, एक सायकल, तेला समोर हांडेलला बांधल्याल्या दोन दुरड्या, त्यात पिरू कापायला चाकू, चटणी, मीठ असल्याली बाटली, आनी लहान मुठी अशी दोन दुरड्यात येगयेगळ्या केलेल्या पेरवाच्या राशी. वायरच्या पिशवीत पांडऱ्या फडक्यात बांधल्याली भाकरी. आमच्या वस्तीव माळीमामा पिरु न्हयाय याचा. लोड गावापासन चिचनी ५ किलोमीटरवर. माळी मामा सकाळी सात वाजताच पेरवाच्या बागत सायकलसह हाजरी लावायचा. खात, मुत घालून ऐन तानची आसल्याली बाग चांगलीच रटात हुती. पानाच्या बराबर पिरू लागल्याल. पिकल्याल पिरु तर खाली पडून शेनसड झाल्याली. पाखरांचं थव च्या थव बागत पडायचं. आनी साऱ्यात जास्त कालवा पोपटांचा. मंजुळ आवाज काढून पोपट नाद लावायचं. आरसा घेऊन त्याच किरण पोपटाच्या डोळ्याव पाडल्याव पोपट घावतुय ही कुनीतरी सांगितलेलं सूत्र मला मात्र प्रयत्न करूनबी काय जमलं नाय.
बागच्या वरन लायटीच्या तारा गेलेल्या पाखर पॉटबर खाऊन त्यावर इसाव्याला बसायची. आनी गोफन घिऊन मी क्यांनलच्या बांधावर चकरा मारायचा. शाळला जाणारी पोर बुवा एकटा असला की चारी बाजूनं घुसून पिरू पळवायची.गमजा व्हायच्या. तशात माळी मामाची स्वारी बागत उतरायची. आकडी व पिशवी घिऊन चांगली पेरवाची झाड बघून त्यावर चडायचा. येखाद्या सुंदरीच्या हातागत त्या झाडांची गुळगुळीत साल व गर्भवतीप्रमान भरल्याली ती झाड काही औरच नजारा होता. पायजी तस पिरू काढून पिशवी भरली की सायकलीपाशी माळी मामा याचा. झाडाच शेंड मुडून खाली टाकत त्यावर पिरू वतायचा. चांगलं अडीच, तीन तास झालं की त्यो बास करायचा मग चुलता, नायतर भाव घराकडन पेरवाच माप टाकायला बागत याच. माळी मामा रोजच गिराइक, तशी रोज अनेक याची. मापातन जादा राहिल्यात पिरू माळी मामा ताब्यात घ्यायचा.
सगळं आवरलं की स्वारीची सायकल लोढ्याच्या हद्दीतन भायर पडायची. सगळ्या शाळाच काय सायकलन सावळज पर्यंत गावोगाव ह्यो माणूस प्रवास करायचा. पिरू आले पिरू ही हाळी आली की पोर धावत सायकल कड सुटायची. काय आगाव पोर पिरू हानायचा प्रयत्न करायची. घोळक्यान यायचं. नुसतं पिरू घिऊन ह्यो कितीला, त्यो कितीला आस म्हणत माळी मामाला येड्यात काडत हाळूच पिरू लांबवायची. पन माळी मामाबी काय कच्चा न्हवता. आसली आगाव पोर तेंन हिरलीवती. त्यासनी त्यो दुरडीत हातच घालून देत न्हवता. पयस काढ र्रर्रर्र. त्याशिवाय हात घालू नगू. आसा दम त्यो दयायचा. आख्या पंचक्रोशीत माळी मामाच्या गमती. येगदा लोड झालेली सायकल चड लागल्याव पोरासनी ढकलायला बोलावलं. पोर बिरकी हुती. सायकल चडाव गिली. पोरांनी सायकल फुड ढकलायची सुडून माग वडली. सायकल उरपाटी होत पिरू रानुमाळ गेलं. पोरांनी ती घिऊन किशात घालत पळ काडला. भडकलेल्या माळी मामान तोंडाला यील त्या शिव्यांची लाखोली वाहिली. दगाड हातात घिऊन पोर तानली. पन माळी मामा परिस्थितीन, कपड्यांन गबाळा आसला तरी त्याच्या दुरडीतल्या पेरवाला चव हुती.
बागचा पिरू शिजन संपला की मामा गारीगाराचा उद्योग सुरू करायचा. गेली ३० वर्षे हा माळीमामा ह्योच धंदा करायचा. दुष्काळानं पिरुची बाग वाळून गिली तसं माळी मामा लोड्याला ईना. गारीगार घिऊन रस्त्यान दिसायचा. गेल्या आठ दहा वर्षात माळी मामा दिसलाच नाय. रानात पेरवाची झाड भरली की या मानसाच ध्यान व्हायचं. चिचनीत महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाच्या माहितीसाठी गेलो. हायस्कुलच्या मैदानावर येकटीच ही व्यक्ती खांद्यावर टावेल टाकून उभी होती. नजरेनं हेरलं आर… ह्योच माळी मामा हाय. काय चाललंय माळीमामा.? मी जवळ जात आवाज दिला. मामा हसला. काय न्हाय ठीक हाय. मी म्हनलं वळकलं का? न्हाय म्हणले. म्या पेरवाच्या बागतली वळख सांगितली.
कोनतरी नातलग सापडावा आसा आनंद आम्हा दोगासनिबी झाला. ८ ते १० वर्षांन भेटलेल्या या माणसाला काय इचारावं? माज मलाच कळना. तब्येत ती घरापातूर सारी चौकशी केली. घरच सार आता येवस्थित हाय. एक मुलगा व दोन नातवंड हायती. आता जरा दम्याचा त्रास हुतुय म्हनून सगळं काम थांबवत पोरान आराम करायला सांगितलंय म्हनला. बोलत बोलत माळी मामा चौड्याव बसला. मिबी शेजारीच बसत जुन्या आठवणी जाग्या केल्या. येवढ्यात त्याच शाळेचे शिक्षक जनार्धन पाटील आले. ह्यो माळी मामा हाय समजल्यावर त्यांचाबी चेहरा उजाळला. आमी शाळेला हुतू तवा पासन मामा पिरू यिकत्यात आस त्यांनी सांगिटलं. नंबर आला म्हणून बोलवायला पोरगा आला. जाऊन येतो म्हणत माळीमामा शिबिराची वाट चालू लागला. आनी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला मी नजरेआड हुईपर्यंत बगत राहिलो.
एवढं हुबेहूब वर्णन आणि घडलेलं प्रसंग वाचून,प्रत्येकाला त्याच्या शाळे बाहेर येणारा पेरूवाला आठवेल
धन्यवाद🙏