--------------------------------- ======================================

छपार शेकरायला :

छपार शेकरायला :

विनायक कदम: ९६६५६५६७२३

वरलीकडच वारं, नायतर बुरबुर सुरू झाली की गावाकडं छपरांच्या कामाला जुपी व्हायची. आता छपर दोन तरची. मानसाची आनी मसरांची. छपार येवस्थित तयार करायच मजी लय आवघड काम. पानी गळनार न्हाय आनी बगनाऱ्याच्या डोळ्यात तेज रूप भराव आस देकन छपार कराव तर बेरडकीतल्या तानाजी मंडलेंनच. हातात जादू हाय गड्याच्या. लय दिखणी छपरं तेन बांधली. छपार करायचं मजी सामान तर काय थोडं लागतंय वी. मिडी, वासं, कळाक, उसाचा पाला, काट्या, निर्गुडीच्या बंदाटी, सुवा, तार, तंगूस, पार, कुराड, पांजरान, यिळा.

मसराची छपरं दोन तरची आसायची. येक पाक्याची व दोन पाक्याची. जनावर किती हायत तेज्याव लांबी, रुंदी व खुट्याव माप ठरल्याल आसायचं. गडी हातभर खाँल डबर मिडी रवाय काडायचं. लिंबाच्या नायतर बाबळीच्या झाडाच्या झनाट मिडी भार पेलत्याल आसल्या हुडकून काडायच्या. परत वासं टाकायचं. पोकाळ कळकाच बांबू उब टाकून तेला तारच कट घालून फिट्ट केलं की परत पांजरान लागायचं.

पांजरान कळकीच आसल की येवस्तीत बसून एक लेवल इत्या. तसं मग करंजाचं ठाळ, निरगुडीच्या फोका बी चालायच्या. पण येवस्तीत लावाय लागायचं. छपराव शेकारनारया मानसाची लय आब्दा उटायची. शेकरनाराच्या हाताखाली काम करायचं मजी लय आवगड काम. तेला पायजी तसं, त्या मापाच सामान दयाला लागायचं.

पांजरान झालं की शेकराय जुपी व्हायची. उन्हाळ्यात वाळल्याल्या उसाचा पाला मानसं गोळा करून ठेवायची. काय जन पेंडया बांधून येवस्तीत छपरासाठी ठेवायची. खालची मानसं पेंडया नायतर पाल कवळ्यान वर फेकायची. वरला मानूस त्यो पाला तेला पायजी तसा लाऊन घ्याचा. लावल्याला पाला यिस्कटाय नगु म्हणून तेज्याव बंदाटी घ्यायची. बंदाटीला शेकारनारा वरचा मानूस आनी छपरात आत योक मानूस लागायचा.

तेला सुवा लागायचा. सुवा मजी तीन चार फूट लोकांडी सळीच्या तोंडाला चपटा आकार दिउन तेला बुळूक आसतय. तार सुव्यात ववुन बंदाटी वरन सुवा आत छपरात ढकलायचा. आतला गडी कळकातन तार ववून परत सुव्याच्या नाकात तिडा मारून दयाचा. चांगल्या काट्या घिऊन बंदाटी झाली की छपराच काम भागलं. शेकारणारा उतरून कूट काय कमी जास्त नजर मारायचा. लोम्बकाळणारा पाला यिळयान कापून आकार दयाचा.

छपार झालं की कुडाची बारी. कायजन कुड तुर्कांटीचा, कायजन कडब्याच्या पेंडया उब्या करून तर काय जन उसाच्या पाल्याचा कुड घेत्यात. आडयावरन येनार पानी आत येणार न्हाय आशा मापान पनाळीच्या आतन कुड माणसं घ्याची. मग आत खुट्ट रऊन दावन व्हायची. उसाच्याच पाल्याच पन कितीबी पाऊस यिउदी छपार गळत न्हाय. गारट्याच जनावरासनी थंड वाजत न्हाय. छपार नुसतं जनावरासनीच न्हवत तर त्यात दिशी चिमण्या कुटी करून आपली पोरबाळ जलमाला घालायच्या. मांजार पाल्यात कुटतर आळ करून बाळत व्हायचं. माणसाची वर्दळ नसलं अशा जाग्याला शेतात छपार आसल तर मोराला अंडी घालाय तेज्यासारखी दुसरी चांगली आणि सुरक्षित जागा नसायची.

पावसाळ्यात अनेकांच्या हक्काचं ठिकाण मजी छपार. पावसाळ्यात पानी न येणार थंडीत गारठ्यापासन काळजी घेणार आनी उनाळयात गारवा देनार छपार गावाकडं बी आता कमी झालय. उसाच्या पाल्याच्या झन्झटीत आता कोन पडत न्हाय. पत्र्याची चार पानं टाकली की झालं काम. पन पत्र्यात छपराचा जिव्हाळा न्हाय. छपरावर आवलंबून आसनारी प्राणी, पक्षी यांचं आश्रयस्थानच एका झटक्यात आमी उध्वस्त केलं. पण हेज्याव बोलाय, ईचार कराय आमाला येळ न्हाय. आमचं घर बांधण्याच्या नादात निसर्गातल्या कुणाचतर कुटुंब आमी उध्वस्त करतोय का हेजा ईचार करा. छपरात बी कधीतरी ईसावा घ्या.

2 thoughts on “छपार शेकरायला :

 • July 19, 2023 at 12:36 pm
  Permalink

  हि कला जगण्याच्या गरजेतून लोकं शिकली. फाटलेल्या परिस्थितीला पांघरूण घालण्याचे हे काम प्रत्येक मोसमात ठरलेलंच… हे काम लोकं गरज म्हणून करत होते, पण आता हि कला फॅशन म्हणून लोकं स्विकारतीलही पण अशी छप्पर बनवणारी लोकं मिळणं कठीण होईल…
  सर,
  सुंदर शब्दांकन…

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *