बहिर्जी नाईक: स्वराज्याचा दुर्लक्षित गुप्तहेर
गर्दीतला आवाज
बहिर्जी नाईक: स्वराज्याचा दुर्लक्षित गुप्तहेर
विनायक कदम:९६६५६५६७२३
गुप्तहेर म्हणल्याव आपल्याला तेज्याबद्दल लय उत्सुकता आसत्या. तेज जगणं, चालणं, बोलणं, वागणं तस तेज सारंच गोपनीय आनी सगळंच गूढ आसतंय. पुस्तकातनी गुप्तहेरांच्या कथा आनी पिच्चररातबी तेंच काम किती धाडसाचं आसतंय आमी बगिटलंय. गुप्तहेरांच डोळ व कान जितकं खड त्यो देश लय मजबूत आनी सुरक्षित आस्तुय म्हणत्यात.
गुप्तहेरांच जाळ उभारायच, ती संभाळायच कसं ही साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज साऱ्या जगाला सांगून गेल्यात. पुलवामाला अतिरेक्यांचा हल्ला झाला आनी डोसक्यात आलं ज्यासनी शिवछत्रपतींचा तिसरा डोळा आसनार ‘बहिर्जी नाईक’. इस्राईलची जगातली साऱ्यात खतरनाक गुप्तहेर संघटना मोसाद आमच्या बहिर्जी नायकांना आदर्श मानत्या.
रामुशी समाजाचा ह्यो गडी शिवरायांच्या संपर्कात कसा आला. महाराजांनी तेला कसा हेरला ह्याबद्दल दोन गोष्टी इतिहासकार सांगत्यात. स्वराज्यात लांडग्यानी आनी कोल्ह्यानी शेतकऱ्यासनी लय पिडलवत. माणसं वैतागलीवती. मग महाराजांनी ह्या कोल्ह्या व लांडग्याच्या शेपट्या कोण तूडून आणलं तेला बक्षीस लावलं. तवा बहिर्जीनी साऱ्यात जास्त शेपट्या कापून आणल्यावत्या.
तर महाराज येकदा मोहिमेवर निघाले हुते. बहिर्जी सोंग आणि नकला हुबेहूब करत हुतं. तेंनी बगिटलं, हेरलं आनी बहिर्जी महाराजांच्या हेरखात्याचे प्रमुख झाले. बहिर्जी आनी निसर्ग हेंचा जवळचा संबंध हुता. निसर्गाच्या हालचाली प्राणी,पाखरच काय? बऱ्याच भाषा त्यासनी आवगत हुत्या त्याआधारे त्यांचं गुप्त काम चालायचं. चार हजार गुप्तहेर त्यांच्या खात्यात होते. बऱ्याच ठिकाणी व परराज्यात बहिरजींनी गुप्तहेरांचं जाळं ईनलवत.
यांच्या आयुष्याव लिखाण कमी हाय पन छत्रपती शिवराय आनी इतिहासालाच म्हायत या मानसाच कर्तृत्व. राजांच्या साऱ्या मोहिमांच्या आदी त्या मार्गाची खडा न खडा माहिती बहिर्जी पुरवायचे. किती मोहिमा आनी काय, काय सांगाव. सुरत लुटीच्या टायमाला स्वराज्यापासन दीडशे कोस लांब आसल्याल्या सुरतेत आधी चार म्हयन बहिर्जी तळ मारून हुतं.
भिकारी हून बहिरजींनी सुरत पालती घाटली. कुणाकड किती खजिना हाय नावासकट लिस्ट काडून लूट करण्यात आली. महाराजांची सातशे मैलावरन केल्याली आग्र्यातली सुटका आनी स्वराज्यात महाराज सुखरूप पोहचवण्याची कमाल ही बहिरजींच्या गुप्तहेर खात्याचीच हुती. माहितीच काय नेटवर्क आसलं या माणसाच. कूट हुता मोबाईल, कूट हुता कॉम्प्युटर, ना कुटल तंत्रज्ञान. नुसती सांकेतीक भाषा आनी विश्वासाच्या बळावर हेरखात उभारलं हुतं.
म्हायतीची व म्हत्वाच्या म्हायतीची देवाणघेवाण घोड्यावरन होत हुती. तीबी त्याच येळत व जलदगतीने. हेराबद्दल नुसता संशय जरी आला तरी बहिर्जी तेजा कडेलोट करायचं. महाराज बहिरजींचं काम बगून बक्कळ पैस हेरखात्यावर खर्च करत हुतं. त्यातन आनी हजारो वीरांच्या रक्त सांडल्यानं ही स्वराज्या निर्माण झालय.
बहिर्जीनी आपल्या आयुष्यात कुणा कुणाची सोंग काडली, हेला महाराज आनी इतिहास साक्षी हाय. बहिर्जी दरबारात आल्याव फक्त महाराजच त्यासनी वळखत हुतं. येवड खतरनाक काम तेंच हुत. इतिहासकार सांगत्यात सुरत लुटल्याव आपली वखार वाचवा ही सांगायला जॉर्ज ऑगझेंनडन ह्यो वखारवाला शिवरायासनी भेटायला आला.
तवा आपल्या वखारी भायर बसल्याला भिकारी आनी महाराजांच्या जवळ आसणारी व्यक्ती ह्यात तेला साम्य जाणवलं. आशी नोंद तेंन करून ठिवल्या. शिवरायांचा तिसरा डोळा व अवघ्या जगान दखल घेतलेल्या बहिर्जीची हेरगिरी करताना युद्धात बानूरगडावर मृत्यू झाला आशी नोंद हाय. आभाळायेव्हढ्या उंचीच्या या मानसाची बानूरगडावर समाधी तरी बगावी हेजी उत्सुकता लागली. इंजिनियर आसणारा आमचा दोस्त महेश गणेशवाडे, तोफिक मास्तर व महेशरावांसोबत भर उन्हाची बानूरगडाची
सावळज जरंडीमार्गी वाट धरली. रस्त्याच्या दुनी बाजूला भों करणारी मुकळी माळ, वाळल्यालं गवात, कुटतरी लांब गुराख्या आपली म्हसर ,शेरड त्या ऊनात राकत हुता, तुटाक, तुटाक ठिकानी काडाय आल्याल्या द्राक्षाच्या बागा गर्भवतीप्रमान वाकल्या हुत्या. आंब्याची रस्त्याकडची झाडं म्हवरान लकाडली हुती. तेजा वास वाऱ्यात दरवळत हुता. वाटलं ही झाड आपल्या स्वागताला उबी हायत.
उन्हा तान्हात बानूरगडाच्या किल्याची चढण लागली. मोठमोठ्या दगडांची केल्याली तटबंदी काय ठिकाणी निखळली हुती. चढण चढून गावात गेल्याव तर भयाण शांतता. किल्ला,समाधी कुट हाय ही सांगायलाबी गावात माणूस न्हवता. शाळच्या येका पोराला गाटून रस्ता ईचारला. फिरंगोजी नरसाळा ह्यासनी सांगून महाराजानी बानूरगडाच्या डोंगरावर ह्यो किल्ला बांधला. सातशे फूट उंच आसणारा ह्यो किल्ला विस्तारानं लय मोठाय.
किल्यातच गाव हाय. पोरान सांगिटल्याल्या म्हायतीच्या आधाराव गाडी धुरळा उडवत निगाली. रस्ता चुकला आणि थेट गडाखालच्या तलावात. रस्ता संपला गाडी थांबली. त्या मातीला पाय लागलं आणि इतिहासाच्या आठवणींन आंगावर काटा आला.
भर उन्हात चौग आगदी देव आल्यागत आलासा बगा. या.आस तलावातली २ पोर ,१ म्हातारी म्हनली. तेज झालत आस. म्हातारीची म्हस तलावाच्या कडला हिंडत हुती. दुसऱ्या म्हशींन तिला हुंदालली तशी पंधरा,ईस फुटावरन खाली पडत म्हस तळ्यात दगडाव कुचली. म्हशीच्या हाडाचा बुकना झालता. काय ठिकानी जकमा हुत्या. डॉकटर आनून तिला सलाईन लावलीवती. पोर म्हनली धरा जरा बघूया उटत्या का?.
कंबरच्या खालन कासरा घालून उटवाय बगिटलं पन म्हशीला उटवना. पाय फऱ्यात कापाय लागलं. लय न्याट लावल्याव म्हशीन हातभर जीब काडली. तरीबी म्हातारी म्हणती उचला. म्हशीची आब्दा बघून राग आला. मावशे चारा लय लागलावता वी हित म्हणून म्हसर हित आनलीस वी. आता मराय लागल्या तिज ती, गप पडुदी तिला म्हणून आवाज मोटा करून सांगिटलं. पोरासनी पटलं. पान्यान भिजवून पुती तिज्या आंगावर टाकली. घिवद्या तिला इसावा तुमी जावा. आस सांगत तेंनी आमाला गडाची वाट दाखवली.
यिडीवाकडी चढण चढत थेट मंदिर आनी समाधीस्थळापशी गिलू. उगवत्या सूर्याच्या दिशेला तोंड करून महादेवाचं दगडी मंदिर बहिर्जी नाईकांच्या समाधीला सोबत करत हुतं. भर उन्हात बोडक्या माळावर आसणाऱ्या त्या मंदिरात आतन गारवा हुता. मंदिराच्या फुड समाधीकड गिलू.
फुडचं चित्र बघून मन सुन्न झालं. पाच फूट उंचीची बहिरजींची समाधी हुती. समाधीवर तुळस लावलीय पण पाण्यामुळ ती शेवटच्या घटका मोजत हुती. पणतीत वात न्हवती, आणि हार वाळल्याला. समाधीला बहिर्जी नाईक समाधीस्थळ आशी फरशी लावली हुती. समाधीवर त्याच मापाच छत, व वरती दोन भगवे झेंडे वाऱ्याव दिमाखात डौलत फडकत हुतं.
खाली समाधीला इजा हु नये म्हनून लोखंडी कड करून उपाययोजना केलत्या. दगडी ज्योत, बाजूला वडाच, पिपर्निच व लिंबाच झाड येणाऱयांना सावली देत बहिर्जीना त्याच भाषेत काही संदेश देत हुतं. तर बाजूला बंद पडलेला सौर ल्याम्प हतबल हुन उबा हुता.
तत्कालीन तासगाव तालुक्यात व आता खानापूर तालुक्यात ह्यो किल्ला हाय. तिथली भयाण शांतता खायाला उटत हुती. समोर बोडका डोंगर, व पवनचक्क्या वाऱ्याची दिशा सांगत हुत्या. आनी लिंबाच्या झाडावर शेंड्यात बसल्याला होला गंभीर हुन शोक करत हुता. पान्याची बुरिंग पानीच नसल्यानं गपगुमान ऊबी हुती.
समाधीपासन कासराभराव येक महिला दोन म्हसरांसह दोन बगळ्यांनाही हिंडवत हुती. माहिती घ्यावी म्हणून गाटलं तर ह्यो माणूस गुप्तहेर हुता. हेज्यापलीकड त्यासनी काय सांगता आलं न्हाय. हातात काटी, पायात पायतांन,आंगात लाल बंडी, डोक्याला लुंगी, बांधून शेरड, मेंढरं घिऊन साठीतला शिवाजी मंडले सावलीला आला. उन्हान पाकाळल्याळी मेंढरं आल्या आल्या वाळल्याल्या पाल्यावर तुटून पडली. शिवाजीरावानी सावली धरली. आमीबी घासून बसत आमची माहितीची भूक भागवायचा प्रयत्न केला.
गुप्त किल्ला हुता आनी नाईक सोंग काढायला पटाईत हुते ही तेंनी सांगिटलं. मानस किती येत्यात रोज हित. मी ईचारलं. कुटली येत्यात.? आशिच की आवड आसनारी येत्यात. उमाजी नाईक जयंतीला चारचाकी गाड्या भरून मानस येत्यात ती म्हनलं.
स्वराज्यासह कर्नाटक राज्यावर टेहाळणी कराय भौगोलिक दृष्ट्या ही मध्यभागी जागा हुती. कुटलंबी तंत्रज्ञान नसताना बानूरगड ही मध्यभागी आसनार ही ठिकान महाराजांनी, बहिर्जी नाईक हेनी कसं हुडकलं आसलं. धर्माच्या काय ठेकेदारांनी समाधीच्या जागीच येक बोर्ड लावून आपली विकृती दाखवून देत या माणसाच कर्तृत्व खूज करायचा प्रयत्न केलाय.
सांगली जिल्ह्यातल ही ठिकाण आख्या जगाला प्रेरणा देणारया या गुप्तहेराचा आम्ही फक्त पेव्हिंग ब्लॉक घालून (तेही ठेकेदार जगवण्यासाठी)सन्मान केला. मंदिर हाय म्हणून मानस जात्यात तर नायतर बहिर्जी तुम्हाला शोधायला आम्हाला मोसाद आनायला लागली आसती. या माणसाच कर्तृत्व या समाधीस्थळी गेल्यावर भावी पिढीला वाचायला, बघायला मिळन गरजेचं हाय. पर्यटन स्थळ म्हणून हेजा विकास हुन गरजेचं हाय.
हेरगिरी करताना युद्धात बानूरगडावर मृत्यू झालेल्या या विराच कुंभारकिनी धरणाला नाव व ही समाधी येवडाच काय त्यो गौरव झाला.
फूड या माणसाच काय झालं? त्याची वंशावळ, यासह बऱ्याच प्रश्नांनी डोसक्यात थैमान घाटलं. ह्या मातीत ही आभाळाएव्हढी माणसं जन्मून चूक झाली आस वाटलं. बानूरगडाव भेटायला कुनी आला न्हाय आला तरी बहिर्जी आजबी स्वराज्यासाठी प्रामाणिकपणे उन्हाळा,पावसाळा,हिवाळा हेरगिरी करतायत. मन सुन्न झालं.
उन्ह कलली परतीचा प्रवास सुरु झाला. डोसक्यात काहूर माजून गच्च झालं. मी शिवरायांपेक्षा मोठा हाय ही कवातर तेंच्या मनात आलं नसलं का? जर आलं आसतं तर इतिहास येगळा आसता. काय विश्वास आनी त्याग मानसाचा.
या दुर्लक्षित हेराच कर्तृत्व आम्ही फूडच्या पिडीला काय सांगणार? सरकार करलं न्हाय करल पन तुम्हा आम्हा साऱ्यांनी प्रयत्न केल्यास बहिर्जी नाईकांचा, त्यांच्या कार्याचा व विचारांचा योग्य सन्मान प्रचार प्रसार करन गरजेचं हाय. बहिरजींच्या बानूरगडच्या समाधीस्थळाला कवातर भेट दया आनी तुमच्या लेकरांना या वीराचं कर्तृत्व सांगा. इतिहास ३ पध्दतींन जिवंत राहतोय. लिखित, भौतिक आनी मौखिक…..
विशेष टीप:
२२ फेब्रुवारी २०१९ ला हा लेख लिहलाय. आता दोन वर्षात तीत बरीच सुधारणा हाय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिल बाबर,आमदार गोपीचंद पडळकर,बानूरगडच सरपंच, सांगली जिल्ह्याचं जिल्हाधिकारी, गडाव जायाला
रस्ता करा म्हणून उपोषणाला बसणारा तासगावचा नगरसेवक अभिजित माळी, गडावर झाडं लावणारी, जगवणारी पोर, ग्रामस्थ या व असंख्य अदृश्य हातांमूळ बहिरजींच्या समाधीस्थळी तेंच स्मारक हुतय.उशिरा का हुईना पन चांगलं कायतर हुतय हेज समाधान हाय.
‘मंदिर हाय म्हनून माणसं जात्याती तर, नाहीतर बहिर्जी शोधायला मोसाद आणावी लागली असती’ या वाक्यातून प्रत्येक शिवप्रेमीच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
विनायक कदम सर,
आपण प्रवासवर्णन, माहिती आणि गावाकडची रांगडी भाषा यांना खूप छान पद्धतीने शब्दबद्ध केले आहेे. आपण मायमातीतल्या गोष्टी समोर आणून सामाजिक जडणघडणीत खूप मोठे योगदान देत आहात. आपण करत असलेल्या कार्याला सलाम व खूप साऱ्या.शुभेच्छा..🙏🙏🙏
धन्यवाद दादा