भिलारच्या पुस्तकातलं प्रत्येक पान तुमची वाट बघतय
भिलारच्या पुस्तकातलं प्रत्येक पान तुमची वाट बघतय
विनायक कदम:९६६५६५६७२३
पुस्तकं वाचल्याण माणसाचं मस्तक सशक्त होत. मात्र आता स्पर्धेच्या युगात ग्रंथालय, वाचनालय ओस पडली. व आमच्या धडावर आमचं डोकं राहिलं न्हाय. चांगलं काय , वाईट काय अभ्यास नसल्यानं आमच्या धडावर अनेकांच्या डोसक्यांनी आश्रय घेतला. राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे लंडनच्या दौऱ्यावर होते. लंडन शहरात फिरत असताना “ऑन वे” या गावात प्रत्येक घरात पुस्तक होती. घरांच्या भिंतीवर पुस्तकांची, पेनांची व विविध वाचनाची माहिती सांगणारी चित्र रेखाटली होती. प्रत्येक घरात विशिष्ट पुस्तक ठेऊन ती वाचायला बसण्याची सोय केली होती. माजी शिक्षणमंत्री या गोष्टीने खूपच प्रभावित झाले. असा प्रयोग आपल्या देशात कधी झाला न्हवता. केला तर तो यशस्वी होईल का? अनेक प्रश्नांचं थैमान त्यांच्या डोक्यात होत. मात्र पुस्तकांचं गाव ही संकल्पना राबवायचीच याची जिद्द तावडे यांनी बाळगली.
पुस्तकांचं गाव उभारणाऱ्या टीमने गावाची निवड करताना त्या ठिकाणी पर्यटक जास्त येतील, त्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय व्हावी, गाव स्वच्छ असावं, दारूबंदी, यांसह अनेक गोष्टी पाहिल्या जात होत्या. अनेक नामवंत लेखक, साहित्यिक यांच्या गावांनी यासाठी नकार दिला. मात्र महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांच्या मधे भिलार गाव होत. हव्या त्या सर्व गोष्टी त्या ठिकानी उपलब्ध होत्या. गावाला ही संकल्पना सांगताच एखामुखी गावानं हो म्हणून सांगितलं. मंत्री विनोद तावडे यांनी तात्काळ भेट देत पाहणी केली आणि टीम कामाला लागली. हे होईल का? याचा उपयोग काय यांसह अनेक नकारार्थी प्रश्नांची चर्चाही झाली. मात्र पुस्तकांची आवड असणारी २५ माणसं तयार झाली.
या २५ लोकांनी फक्त आपल्या घराची एक खोली पुस्तकांसाठी द्यायची होती. ती आनंदानं प्रत्येकानं दिली. खोली दिली म्हणून काम संपलं अशातला भाग न्हवता. तर पुस्तकांची काळजी घ्यायची कशी, आलेल्या पर्यटकांना काय सांगायचं, बोलायचं अस सांगितलं गेलं. ठाणे येथील एका संस्थेनं सर्व २५ घरांवर वेगवेगळी चित्र काढून गावच्या सौंदर्यात भर घातली. राज्य मराठी विकास संस्थेचे कार्यकर्ते पुस्तकांसह सर्व गोष्टी प्रत्येक घरात कशा व्यवस्थित ठेवता येईल हे बघत होते. हायफाय घर , शाळा, लॉज, मंदीर अशा अनेक ठिकाणी जागा फायनल होऊन पुस्तक लागली होती. माजी मंत्री तावडे घारीप्रमाणे या सर्व तयारीवर लक्ष देऊन होते.
कुठल्या घरात कुठली पुस्तक आहेत. तिकडं जायचं कसं याचे फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूला होते. पुस्तकांची माहिती देणाऱ्या काढलेल्या पत्रकात सर्व नकाशा होता. आणि तो दिवस उजाडला ४ मे २०१७. माजी मंत्री विनोद तावडे यांच्या स्वप्नातला हा प्रकल्प. भारतातल्या पहिलं पुस्तकांच्या भिलार गावाच लोकार्पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. गुढ्या उभारून गाव सजल. मोठा बहुमान गावच्या शिरपेचात रोवला होता. स्ट्रॉबेरी पिकवणाऱ्या भिलारची आज पुस्तकांच गाव म्हणून ओळख झाली.
उद्घाटनानंतर माजी शिक्षणमंत्री भिलारवासीयांना लिहतात…
“वाचनसंस्कृती वाढावी या उद्देशाने माझ्या संकल्पनेत असलेलं देशातील पहिल पुस्तकांचं गाव साकारताना आपण मला आत्मीयतेन सहकार्य केलंत तसेच पुस्तकांच्या सानिध्यात वाचकांनी यावं , राहावं ही माझी संकल्पना यशस्वी करण्यासाठी आपण केवळ आपलं घरच न्हवे तर आपल्या आयुष्यातील महत्वाचे क्षणही या पुस्तकांच्या गावासाठी समर्पित केलेत. याबद्दल मी आपला व समस्त भिलारवासीयांचा ऋणी आहे”
(विनोद तावडे)
पुस्तकांच्या गावाला पाहिले वाचक लाभले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. या पुस्तकप्रेमी माणसानं आवडीन पुस्तक चाळली व पवार पब्लिकेशन कडून काही पुस्तक गावाला भेट दिली. पुस्तकांचं गाव म्हणून ओळख झालेल्या भिलारला लोकांचा ओढा वाढला. पुस्तकवेडी माणसाचं काय, पण हेनी केलंय तरी काय हे बगून ईवया म्हणून माणसं जाऊ लागली. तिथल पुस्तकांच वैभव व पुस्तकांच्या श्रीमंतीच कौतुक करू लागली. अनेक दिवस उत्सुकता होती कस आसल भिलार. शुक्रवारी भिलार गाठलं. साडेतीन ते चार हजार लोकसंख्येच भिलार. गावात प्रवेश करताच ठिकठिकानी लावलेले पुस्तकांची माहिती देणारे फलक येणाऱयांच स्वागत करत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर इमारती, झाड, पाखरांची किलबिल होत होती. संतोष सावंत यांच्या घरी राहण्याची सोय होती. रात्रभर डोक्यात घोळत होत कसं आसल गाव. सकाळी सहालाच उठून गावात पुस्तकांची घर पाहायला सुरू केली.
पुस्तक असणाऱ्या प्रत्येक घराच्या भिंतीवर त्या त्या प्रकारची चित्र काढली होती. इतिहासाची पुस्तक असतील तर छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्र घरावर होती, कथा, कविता, बालसाहित्य, ३५ ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारातील पुस्तक होती. पुस्तकांना ठेवायला एक फिरत स्टॅड , दोन कपाटं व पाच खुर्च्या प्रत्येक घरात होत्या. या आपलंच घर आहे हे प्रत्येक घरात दिसलं. वाचन झाल्यावर काय वाटलं याचा अभिप्राय लिहायला एक नोंदवही व एक अभिप्राय वही होती. प्रत्येक घरात माणस प्रेमानं बोलावून माहिती देत होती. कुणी घरांत नसेल तर बिनधास्त घरात घुसून मनसोक्त पुस्तक चाळता येत होती. शांत वातावरण व पक्षांचा सुमधुर आवाज, वातावरण प्रसन्न करत होत. मात्र पुस्तक चोरीची कधीही घटना इथ घडली नाही. एकेकाळी राजकारणात रमलेल भिलार आज पुस्तकांमध्ये रमलय.
सत्तावीस नंबरच्या विनोदी पुस्तकांच्या दालनातील शिल्पाताई सांगत होत्या पुस्तकांच्या गावामुळं आमच्या घराला अनेक दिग्गज साहित्यिक लेखक व मान्यवर मंडळींचं पाय लागलं. गावात शिरताच सोनकांत देसाई व पुष्पां देसाई ही दोन आज्जी आजोबा भेटली. या पुस्तकांच्या गावात सत्तर टक्के मराठी पुस्तक आहेत. या पुस्तकांची परिस्थिती बाबत दर दोन महिन्यांनी आढावा घेतला जातोय. आणि विनोद तावडे तर सदैव भिलारवर ध्यान ठेऊन आहेत. अनेक चांगल्या गोष्टी सुरू होतात व लगेच बंदही पडतात. पण भिलार त्यास अपवाद होत. स्ट्रॉबेरीचा गोडवा इथल्या माणसांमध्ये होता. येणाऱयां पाहुण्याला अगदी घरातल्यागत पाहुणचार मिळत होता. अगदी शिवसह्याद्री हॉटेल मधील मालकही अतिथी देवो भव: आपल्या आचरणातून दाखवत होता. पुस्तक बघता बघता दुपारचा एक कधी वाजला समजल नाही. पुस्तकांमुळ यापुढे भिलारमधी अनेक अधिकारी, लेखक, साहित्यिक, राजकारणी, अभ्यासक, विचारवंत, व चांगली माणसं व देशाची भावी पिढी चांगली घडेल. आज आमच्या घरात टीव्ही, कार, मोबाईल, गाडी या वस्तूंसाठी जागा आहे मात्र पुस्तकांना घरात जागा नाही. पुस्तक घराघरातन हद्दपार झाली. कसा होणार देश महासत्ता, कसं होणार आमचं मस्तक सशक्त. भिलारच्या पुस्तकांचा सुगंध अजूनही माझ्या मस्तकात आहे. तुम्हीही भिलारला भेट दया! तिथल्या पुस्तकातील प्रत्येक पानं तुमची वाट बघतय….