भास्कररावांच्या रानातल्या घरावर मानसं आभ्यास करायल्यात:
भास्कररावांच्या रानातल्या घरावर मानसं आभ्यास करायल्यात:
विनायक कदम: ९६६५६५६७२३
इंग्रजांचा लय प्रभाव आमच्या मानसांवर हाय. आसूदया ! पण? गोऱ्यांच्या चांगल्या गुष्टी कमी. नकु त्याच गुष्टींचा लय पगडा आमच्याव पडलाय.. पैसा, पानी आसल्याल्या लोकानी रानातल्या घराला फार्म हाऊसच नाव दिलं. आता रानातल्या घरात रानातलच पायजी की. रानात लोकांनी शिमेट वतून बंगल बांधलं, चारचाकी गाड्या न्हेल्या. हेज्यावच थांबली न्हायत.
परदिशी झाडं, परदिशी पाखरं (लव्ह बर्ड) आसलं बरंच काय काय…काय न्हेल. पन रानातल घरं कसं आसाय पायजी ही बगायच आसल तर धरणगुत्तीच्या भास्करराव शिंदेंच्या घराला तुमी भेटाय पायजी. ती नुसतं घर न्हाय तर निसर्गाला , पर्यावरणाला अनुकूल घर कसं पायजी हेज मॉडेल हाय.
९ वी शाळा झाल्याल भास्कर सिताराम शिंदे वय(५१) मूळचा तासगाव तालुक्यातल्या वायफळे गावचा माणूस. १९७४च्या दुष्काळात बा..नं गाव सोडलं आणि जयसिंगपूर गाठलं. भास्कर रावांची चार भावांसह १७ जन एकत्र कुटुंबात राहत्यात. जयसिंगपूर जवळ धरनगुत्ती जयसिंगपूर रोडला तेंची कष्टानं घेटल्याल रान हाय. त्याच रानात तेंच पत्र्याच घर हाय. दारातं जाताना तुमचं स्वागत करायला फुलांनी भरल्याली झाडं हायत.
तेंच्या दारात गेल्याव कूट जंगलात आलूय का काय हेजा भास हुतुय. ती घरं निसर्ग,पर्यावरण हेला येवढं पूरक हाय. की घराला तोराणं बांधल्यागत दारातच बिनधास्त चिमनींन आपलं कोट घालून संसार थाटलाय. घराच्या भिंतीसनी वाघनक्याच्या येलान येडा टाकून भिती हिरव्यागार केल्यात. ती सुंदरता बगून मानस तेंच्या संडास जवळ फोटू काढत्यात.
तेंच्या घराफुड २०० विविध जातींची झाड हायत. २५ प्रकारची जास्वंद,१० प्रकारचं आंबा, ३५ वर्षाच वडाच्या झाडाचं बोन्साय, पेरू पासन ड्रगण फ्रुट ती स्ट्रॉबेरी पासन स्टार फ्रुट पर्यंत. तर तुळशी पासन लिली पर्यंत आनी ऑर्किड पासन कमळा पर्यंत, खाऊच्या पानाच्या देशी,कलकत्ता व मगध तीन जाती,
धबधबा, शेनांन सारवल्याला भुयवर भारतीय बैठक मारायची सोय, फरशा टाकून बसाय केल्याली बैठक व्यवस्था, झाडांवर पाखरासनी खायाला ठेवल्याली पाटीत फळं, पाणी, खरीखुरी पक्षांची घरटी, फुलपाखरं, दिशी किळी, मंद आवाजात निसर्गाला आवडणार संगीत, प्रथमोपचार पिटी, घरात सामान ठेवायचं ठिकाण, लहान मोठ्यासनी झोपाळा, सेल्फीच ठिकाणं,
शितीवरील पुस्तकांचं ग्रंथालय, गांडूळ खत निर्मिती, गांडूळ खतांच्यापासून तयार केल्याल औषध, चर्चा, गप्पागोष्टी मारण्याच हिरवंगार ठिकान, शिताफळाच कंपाउंड, पर्यावरणाची माहीती देणारं फलक, पंचवटी , हिरवं घर, ५०० कुंड्यात सुंदर झाडं, आसलं बराच काय तेंच्या घरातफूड लय भारी पद्धतीनं ठेवलं हाय.
भास्करराव म्हणतात शेतकऱ्याला राजा म्हणून नुसतं फुगवून मारलंय. उन्हाळा,पावसाळा,हिवाळा शेतात राबणाऱ्यात शेतकऱ्याच्या शेतात कवाच संडास नसतंय. रानात दिवसभर काम करणारा त्यो पुरुष, महीला भायर उघड्याव जायला जागा नाय म्हणून दिवसभर ताटकळून राहतात तेजा परिणाम त्यांच्या शरीरावर हुतोय. त्यो आजारी पडतोय, म्हणून माझ्या शेतात संडास हाय. रानात काम करताना तेला लागलं, कापलं, डोकं दुकाय लागलं, पोटात दुकाय लागलं,
अंग दुकाय लागलं, साप चावला , विंचू चावला, म्हणून कापसा पासन चिकटपट्टी पातूर सार माझ्या प्रथमोपचार पेटीत हाय. रानात काम करायला बायका आल्या, झाडाला लागल्याली फुलं बगून त्यासनी वाटलं ही फुलं आपण केसात घालावीत.! म्हणून आरशाला टिकली,रुमाल,पावडर पासन न्यापकीन,मास्क ती टाचणी ,पिना पर्यंत सार हाय. रानातली कामं करून दमल्याव आराम करायला गादी हाय.
शेतकऱ्यानं रानातलं शितीचं सामान कसं ठेवायला पायची ही तर तेंनी भन्नाट केलंय. भितीला खिळ मारून सामान जिथल्या तिथं. कुटला नट, कुटला पाना, मार्किंग करून डब्यात ठेवल्यात सामान…नवख्या माणसाला बी घावल. फार्म हाउसच्या घराची व्याख्या बदलणार भास्करराव जयसिंगपूरला कुलकर्णी पावर टूल मधे गेली २५ वर्षे काम करून रिटायर झाल्यात.
आता निसर्ग आनी पर्यावरणावर तेंनी वाहून घेतलंय. तेंच शेतातल घर बगायला महिन्याला ४०० ते५०० मानस येत्यात. त्यात आमदार,खासदार ,मंत्री ,अधिकारी, कृषी विदयापिठाची आभ्यास करणारी पोरं, कॉलेजच प्राचार्य, कृषी अभ्यासक, पर्यावरण अभ्यासक, उद्योगपती, पंचायत समिती, ग्रामपंचायत ही माणसं येत्यात. भास्करराव त्यासनी शेतातल्या मॉडेल घराची संकल्पना सांगत्यात, पर्यावरण जपाय सांगत्यात. झाडांप्रमान तेंच कुटुंब हिरवगार ,येनाऱ्यासनी सावली,पाहुनचार देणार हाय.
१ कोटींच घर ती सध्या बांधाय लागल्यात. ९ वी शाळा शिकल्याल्या ह्यो मानूस एम पी एस सी ,कृषी कॉलेजला व्याख्यान दयायला जातुय. शितीतली पदव्या घेणारी मानस मॉडेल घराचा अभ्यास करायला येत्यात. झाडांसंग बोलनाऱ्या या माणसाच्या घरात आनी दारात आख्खा निसर्ग अवतारलाय.
अनेक पाखरं माझं न्हवं माझ्या बा चं घर या आविर्भावात तिथं राहत्यात,वावरत्यात,संसार करत्यात. माझ्या पासन तुमाला काय धोका नाय ह्यो विश्वास त्यासनी दयाय ती लय राबल्यात.
किळीच्या येका झाडाची ६५ झाडं करून दुर्मिळ झाडं जपनाऱ्या, पर्यावरण प्रेमी,कृषी अभ्यासक भास्कररावांच शेतातलं घर येगदा बगाचं.
फोटो क्लीक:,तोफिक तांबोळी