बेरडकीतला तुकाराम:
बेरडकीतला तुकाराम:
विनायक कदम: ९६६५६५६७२३
बेरडकीतला ‘तुकाराम’. ज्यो कुणी तुकारामला वळकतूय तेज्या डोळ्यासमोर साक्षात तुकारामच ऊबा हुईल. सावळ्या रंगाचा, पाच साडेपाच फूट उंचीचा गडी. डोसक्याला उन्हाळ, पावसाळ कायम मळकाटल्याली टुपी, मनगटात दोरा, गळ्यात दोऱ्यागत रबराच कड, पायात पायताण आसल तर आसल, नायतर तसंच. नेटाची काम केल्यान हाताच कातडं दगडागत झाल्याल. शर्टाला कधी वरची बटन न्हायतीच, प्यांट मातीत राबल्यान घान झाल्याली. क्यास पिकल्याल, पन्नास पंचावन्न वय आसल. आणि कायम दारू पिऊन टाईट आसणारा, आपुन आणि आपलं काम भल म्हणणारा, दारू पेला आसला तर कधी कुणाला येडंवाकडं न बोलणारा, न पडता घर गाठणारा , आणि ठिवणीतली भाषा बोलून मांनसासनी खळखळून हासवनारा आसा सावरड्याचा तुकाराम लालू मंडले. रामुशाचा गडी, प्रचंड धाडशी. कुणी घुस म्हणल तर जीवाची पर्वा न करता कूट बी घुसनारा, मुक्त निसर्गात मनमुराद आयुष्य जगणारा आसा तुकाराम.
सावर्ड आणि लोढ दोन गावच्या मधी नुसता वडाच. पलीकडं रामुशांची वस्ती आसणारी बेरडकी. तुकारामला मला कळतंय तसं बगतोय. हाय तसाच हाय. चालण्यात, बोलण्यात, वागण्यात, कायच फरक न्हाय. तुकाराम नावाचं पात्र बरच दिवस डोसक्यात घोळत हुतं. भेट घिऊन तुकारामला बोलता करायचं म्हणलं. घरापासन गेल्याली क्यांनल वरली वाट तेज्याबी आणि माझ्याबी घरला जात्या. त्यामुळं रस्त्यात सारखा सामना व्हायचा. मटनाची काळी पिशवी घिऊन महाराज घराकडं निगालवत. तवर भेट झाली बसा म्हनलं गाडीव. आमच्या घरापातूर आनलं. म्हणलं कवा येळ देताय भेटूया की. आता घेताय का म्हायती माजी म्हणला. घरात पिशवी ठीऊन बापश्या शिरसटाच्या कोपटात ईतू. या तुमी म्हणला. घरला जाऊन कापड बदालली. आनी कोपाट गाठलं. कोपटात बसायचं कारण एक हुतं. तिथं कोण लय माणसं येत नसायची मोकळ्यापनान बोलता यील म्हणून जागा ठरली.
आवरून कोपाट गाठलं. आनी तुकारामच्या घराकडं डोळ लावलं. आत्ता यील, मग यील म्हणत अर्धा पाऊण तास गेला. आता ह्यो बाबा येत न्हाय म्हणून म्या घराची वाट धरली. घरात गेल्याव गडी बसला तिथंच आडवा झालता. बर फोन करावा म्हणलं तर मोबायल न्हाय. नमूं नमूं चार दिसान परत दोगाचा सामना झाला. म्हणलं सावरड्याची रामुशी ईवडी धतरी हायती मला म्हायत न्हवत. हाना आमाला पायतांन म्हणून गड्यांन पायताण काढून माझ्या हातात दिल. तासांभरान मी कोपटात आलतू म्हणला. तेज्याव चारदा आमची भेट होत खडाखडी झाली. तुकारामला म्हणलं लगा तासगावच्या तशीलदार बी मांनसासनी लगीच भेटत्यात. पन तुला भेटायसाठी तू येळ दिनास लगा. आयला उदया घेता का म्हायती माजी. आस म्हणला आणि नेहमीप्रमाणं म्या बी मान डुलवली.
मंगळवारी धुलवड. सकाळी १० पातूर मिबी घरात हुतु. कॅनलवर जरा कोण येतंय जातंय नदर मारत हुतु तवर स्वारी तंग हुनच आली. म्या म्हणलं धुलवड ढिल्यात दिसत्या आज. ढिल नसतंय म्हणला आपलं आणि पिशवी हालवून बाटल्यातल्या दारूचा आवाज मला तेंन दावला. ही दावत आसताना खाली पाय डांच करत हुत. गड्याला म्हणलं आज सोडायचा न्हाय. आणि रस्त्याव दोगानी बैठक मारली. बोलत करायसाठी तुकारामच्या जुन्या आठवणी म्या काढल्या ,दोन चार उदारण सांगितली गड्याला आत्राळी केला आनी तुकाराम बोलाय लागला. घरात मूलकाची गरिबी. कुर्डुची भाजी आणि, भाकरी मिळायची. बा नं बारक्या बारक्या चोऱ्या करून पोर जगवली. पण चुरी बा गत आमाला जमत्या वी म्हणला.
पंधरा वरसापूर्वी तोंडाव कुठलातर सन आलता. गरिबी मूलकाची. पैस कमी, कूट घौ मिळालं न्हायत. आमच्या गावातल्या कंटूरात दयानु कड तुकाराम आला. म्हणला जरा तांदूळ, घौ घालतुस का मला. दयानु म्हणला तुज गाव जळलय वी हिकडं आलायस. तुकारामच टाळक फिरल. देन्याची आज जिरवायची म्हणून तेंन चंगच बांधला. दिस मावळल्यावर शांतीच्यात जरा दारू मारली. माणसं जेवत्याती, सामसूम व्हायचाय तवरच गड्यांन कंटूरची कवल काडून आत इन्ट्री किली. घौ, तांदळाची पुती तेन फुडली सारा माल येकात केला. आळ केलं आणि त्यात पामोलिन तेलाच्या पिशव्या फूडून वाटल्या. कपाटात नोटा हुत्या पण त्या घेता भायर आला पण मुसलमानाच्या भयन बगीटल. पन्नास फुटावन वरन उडी मारली. घोट्याच्या खालच पाय फिरलं. चालायला ईना आणि रांगत लोढ्यातन घर गाटलं.
तवर सारीकड बोंबाबोंब. तुक्यान कंटूर फोडलं म्हणून. कुनीतरी पोलिसांसनी कळवलं. तिबी गडी नेटानं आलं . घरला न जाता बाजूच्या हाबरेटात मी दडून बसलू. पुलीस यिऊन घरात ईचारत हुतं तुक्या कुठाय. चालाय ईना म्या म्हणलं हाय हिकडं या. उचलून गाडीत घाटला ती तासगावला दवाखान्यात आणि मग पुलीस स्टेशनला. त्या प्रकरणात गड्याला चांगली शिक्षा झाली. बामनाचं एक घर फोडलं. आणि पळवल काय आसल तर २ स्पीकर आणि जेवनाची पिशवी. घरापाशी ,म्हवन्या संग पिकर आणून फुल्ल आवाज सुडून गाणी लावली. तवाबी धरला पुलीसानी. जीव जासतोर चोपला. सारा उद्योग नशेतच ओ. पण आयुष्यात या २ चोऱ्यानी त्याच जीवन बदलून टाकल. बा..ला चोऱ्या जमल्या म्हणून आमाला जमत्यात वी तुकाराम म्हणला.
मी शाळला आसताना बेरडकीतला सुबराव आन्ना डुकरं आनायचा. मंगळवारी बुधवारी राम आंन्नाच्या हिरीव जाम्बळाच्या झाडाखाली सावलीत त्याच वाट घालायचं. माणसं नकु तिथली याची मटण न्हयायला. त्या सगळ्या प्रक्रियेवर माझं बारीक ध्यान आसायचा.
नुसता वडाच मधी. तुकाराम सुबराव आन्नाच्या भावकीतला गडी. तुकाराम डुकारं चिचणीतन सायकलीला उलट पाय बांधून आणायचा. तीस पस्तीस किलुचा हांडेल ला आडकवल्याला डुकुर घिऊन सायकल चालवत पाच किलोमीटर याच मजी लय नेटाचा गडी लागतुय. वड्यातन वर येत जांबळाच्या झाडाच्या सावलीत डुकार टाकून मग सामान आनायचं. तेला मारायचं काम बी तुकाराम शिवाय लय कोण करत न्हवत. कधी कधी आंक्क्या नायतर तानाजीराव. लोकांडी पार डोसक्यात घालून डुकुर मारला जायाचा. पाच फुटाची दगड फोडायची चांगली नेटाक पार आसायची. तुकारामच्या पारच्या तीन दणक्यातच डुकारं जीव सोडायचं. मग ढाळ टाकून डुकारं भाजायच.सूऱ्या न फाडून वाट घालायचं. एका बसणीला दोन कीलु मटन गडी हानायचा. तेज्याच भाषेत सांगायचं तर खायालाबी कमी न्हाय आणि गायालाबी कमी न्हाय.
तवा शिकारी कराव्यात्या तर सावरड्याच्या रामुशानीच. सस, पारव, चितार, लाव्हा, व्हल, यांच्या दांडग्या शिकारी. धा आकरा गडी, सताट कुत्री, जाळ्या , काठ्या, लगोरी, आसल सामान घिऊन सज्ज. एकाद्या उसाच्या फडात ससा हाय आस कळलं तर तेज्या येका बाजूला जाळी लावायची, दोन बाजूला कुत्री घिऊन काय गडी उबा करायचं. आनी चौघांनी आरडत उसात घुसायचं. हाहहहा….. आलं बग… गेल बग आस म्हणत कोयाळ उठवायच. कुत्री तर फडात सशाला कधी धरतुय आस करत हातभर जीभ काढून वास घेत भुलल्या गत करायची. फडाच्या भायर सारी सावध. ससा पळाय लागला की कधी जाळीत आडकायचा. नायतर कुत्री तानायची. बागायती शिती लय आसल्यान दडाय जागा लय. सस लवकर घावायच न्हायत. पण हिबी सुट्टी द्यायची न्हायत.
त्यात तुका माग काढायला लय हुशार. सश्याच्या पायाच्या ठशावरन त्यो माग काढायचा. गडी लय चपळ. कधी कधी जित्त सस तेंन उराव बसून धरल्यात. दिवसभरात तीन चार सस घावायच. मारल्याल सस एका पिशवीत वागवाय जबाबदार माणूस आसायचा. आमच्या वळकीचीच सारी , आमाला सस किती आणि कसलं हायती बगायची तलप व्हायची मग पोपट आप्पा आमाला वायरची पाठीवरची पिशवी खाली घिऊन दावायचा. ती पिशवी कुणालाबी दावत न्हवती तेला वशिला लागायचा. आनी ती बगीटलं मजी आमाला जगात काय न्हाय आस बगीटल्या गत वाटायचं. शिकारीला गडी आस आरडाय लागल्याव आमाला तर काय घरात दम निगतुय वी. मैलभर आमी बी तेंच्यासंग जायाचं. दिस मावळताना शिकार थांबयची. दमल्याल गडी घराकडं याच. दांडगा पळ व्हायचा. मग सस फाडून तेज वाट घालायचं आणि वाटाप व्हायचं. दिसभर रानांत काय घावल तीच खायाच, हिरीत पाणी प्याच, काय मानस बोम्बलायची कडू आली पिकाच वाटुळ करायला. गु बी खावा जावा सशाच्या वाटणीचा शिव्या दयायची. मग तीत जायाचं न्हाय.
आमच्या आणि बेरडकीच्या वस्तीव कोंबड्या लय . वड्याकडला हिरी, वड्याच पाणी आत याला त्यात शिमेंटच्या पायपा आसायच्या आणि त्यात मुंगस आणि इजाट आसायची. कोंबड्या धरून गडी पायपत न्हेत खायाच. अडचण आसल्याण कुत्र्यासनी बी घावायची न्हाईत. बेरडकीतल्या गड्यानी येगदा पायपतली मुंगस भायर काढायची जुळणी किली. वड्याच्या बाजूनं पायपच त्वांड काटी जायल आस मोकळं केलं. आणि कम्बरला दुरी बांधून तुकाराम पोत घिऊन हिरीत उतरला. पायपच्या तोंडाला पोत लावून बसला. हिकडन काटीच्या शेंड्याला पलीदा करून घाटला दोन खाऊन पिऊन नूळ नुळीत झाल्याली मुंगस पोत्यात पडली. का…..र आता कसं हुतय तुकाराम म्हणला. पोत घिऊन वर आला. फट मोकळ्या माळाला पोत न्हेल. चार पाच कुतरी मुंगस कवा धरीन म्हणून घायला आलती. त्वांड सोडलं तशी भुलल्या गत मुंगस पळाय लागली. कुत्र्यांनी आत्राळी फाडून काढली. याक कोल बी आसच धरलवत.
तुकाराम शेतातल्या कामाला बी लय नेटाक. कसलबी काम आसुदी कुठल्या माणसाला आईकनार न्हाय. सारी जीवावर उदार हुन काम करणार. कधी कधी लय वैताग आला की उमाजी च्या छपरात मग गांजा प्यायला जुळणी करायची. बायकुला प्रेमानं आमचं हात्त्यार लय भारीय खाऊन पिऊन दणदणीत हाय म्हणला. येगदा तेंन बायकुसंग भांडान काढलवत. आणी बायकू मला वाढत न्हाय म्हणून सारीकड जाहिरात किलती. आमच्या वस्तीवन तेंन चपाती कोरड्यास मागून आनलवत. ती घिऊन कॅनल वर बसून तिला अंधारात शिव्या दयाय लागला. नऊ वाजलं आसल . म्या ब्याट्री लावली गड्याला धरून घरापातूर न्हेल. रस्त्यात बायकू मला वाढत न्हाय म्हणला. घरापातूर गिलू. आणि गडी बायकुला लैच शिव्या दयाय लागला. कुत्री भुकाय लागली. मला आवगाडल्यागत झालं. बायकू गप बसली पन हेज्या हातात चपात्या बगून भडकली. मी वयनीला उदया भांडणाराय म्हनली. कडूला मी आन घालत न्हाय वी, आस म्हणत भाकरीची भरल्याली बुट्टी दाखवली. दोगासनी शांत केलं आणि मी सटाकलु आसला ह्यो तुकाराम.
अर्धा तास आमचं बोलणं चालू हुतं तवर सुनील सुतार. कॅनल वर आला. तुकाराम म्हणला ये ‘सुतरे’ हिकडं य. धुलवडीच कूट चालल्यायस. बेरडकीत म्हस कापल्या. वाट पायजी का आस मिश्किल म्हणत हासला. काय जुळणी हाय का न्हाय म्हणला. कशाची जुळणी न्हाय सुनील म्हणला. थांब म्हणला आणि पिशवीत हात घाटला. तर निघाली मुकळीच बाटली. आर दळींद्र तुज्या नशिबात न्हाय बग म्हणला. आनी मुकळी बाटली क्यानेलात फिकून दिली. दुसरी बाटली काढली. २ घोट मार, येळ म्हत्वाची म्हनला. सुतार कुरीच पेला आणि तुकाराम निगतु म्हणला. कायम दारू पिऊन तुकाराम आपल्या कामात आस्तुय. कितीबी पेला तर कधी पडत न्हाय.कुणाला शिव्या देत न्हाय, आणि कुणाच्या वाळल्या काडीला आता बिन ईचारता हात लावत न्हाय. शिकार आता बंद हाय, पण गडी मास धराय तळ्याव आस्तुय.
एक पोरगा एक पोरगी. पण अपंग पोरगा जवानीतच गेला. त्याची आठवण म्हणून त्याची कापड व आंगुळीचा दगुड तेंन आजून जपून ठेवलाय. मी मरल तवाच तेला टाकून द्या आस त्यो म्हणला. लेक जावाय मुंबईला सुखात हायत म्हणला आणि घराची वाट धरली. निसर्गात तुकाराम मनमुराद जगतोय. त्याला निसर्गाचच नियम लागू हायत. आणि आमी खोट्या स्टेटसच्या नादात समृद्ध जगनच हारवून बसलोय.
१ नंबर
🙏