--------------------------------- ======================================

बंड्या येपारी:

गर्दीतला आवाज

बंड्या येपारी

विनायक कदम:९६६५६५६७२३

जनावरांच येपारी हाताव टावेल टाकून नुसतं हाताच्या बोटाव जनावरांचं दर कसं करत आस्त्याल ही लय दिवस डोसक्यात घोळत हुतं. ही बोटांची भानगड बगायची हुती. ती दावाय मग गष्टीचा गडी पायजी की. गावातल्या टेलरच्या बंड्याला मग गाटला. चार जिल्ह्यातल्या बाजाराव साऱ्यात कमी वयाचा जनावरांचा येपारी मजी लोडयाचा अक्षय शिवाजी ठोंबरे उर्फ टेलरचा बंड्या.वय म्हणला तर नुसतं २३.

वयावं जावं नगा त्येज्या. तेंन डोळ्यान नुसतं गय ,बैल, म्हस, घोड बगीटली की त्यो जनावर स्कॅनिंग करतुय. आणि हेळव्यागत सांगतुय ही येवड, दूध देतंय, हेज यात येवड हाय, ही लाथर हाय, हेला भाला घालायला लागतुय, हिज्या कासतं दूध चढवलय, थांन बारीक हाय, कास गट्टी हाय, हेंन दात लावलाय, बोकडाच वज येवड आसल, ह्या शिर्डीची ही कोकर न्हायत, बैल, खोंडं हेंच तर डोसक्यावल्या भवऱ्यापासन शेपटापातूर त्यो बट्टा हाय ,न्हाय सांगतुय.

ह्यो जनावरांच स्कॅनिंग करतुय आपुन
हेज स्कॅनिंग करूया म्हणलं. मी बाजार बगाय तुज्यासंग येणाराय. कुटल्या बाजारला कवा जातूयस म्या ईचारल. गडी म्हणला सांगोलचा बाजार कोरोणानंतर पयलाच हाय रविवारी. पाटच चारला जावया म्हणला आवरा. गारट मी म्हणत हुतं. पाटच नुसतं तोंडाव पाणी मारून म्या बंडयाच घर गाटलं. तेज कोन तर दोस्त बी बाजारला येणार हुतं. सा गडी झालं . तेवढ्यात रूपनराचा आकन्या आंधारात गुटगुटीत रेडाक वडत घिऊन आला.

जुनूनी जवळ त्येज्या पावण्याला दयाच हुतं. निकमाची आळी, बुध्याची माडी, कोंडवाडा, बामनाचा वाडा, लिजाम आप्पाच्या घरापासन रस्त्यान मिणमिणत्या उजिडात रस्त्यासन रेडाक गपगुमान चोरागत आलत. पण लायटीच्या उजिडात माणसं बगून बावारल. नक्या रूतवून वड खायाला लागलं. गड्यांन तावान डमडमपशी रेडाक वडल. आर वर चडवायच कसं.? का कट्याव चडवूया. आकारामन बंड्याला नमत्या आवाजात ईचारल. तेंन रेडकाच फुडल २ पाय उचलून आत ठेवलं. तू वर हुन दाव धर म्हणला. आता ढुंगाण धरून उचला म्हणला. रेडाक मागन आत्राळी हुन सुरक्षित आत गेलं. कुणाची आक्कल कूट चाललं म्हायती न्हाय. पण त्येज्या आकलच मला कौतुक वाटलं.

तेज दोन दोस्त आणि मी आत बसलू. डमडम चालवाय बंड्या. माग हौद्यात तेज वडील शिवा टेलर आणि पावण्याचं पोरगं पुती टाकून बसली. गारट मी म्हणत हुतं. गाडी सुरू झाली. आंदाज यिऊ पातूर रेडाक गाडीत झोल माराय लागलं. हागाय मुताय लागलं. पण परत गप हुब राहील. सावळज मार्गी शिरढोनचा रस्ता गाठला. वाटतं सकाळच्या व्यायामाला माणसं ब्याट्री, काटी घिऊन रस्त्याच्या कडला चालत हुती. डाम्बरीव कडला उबाऱ्याला कुत्री पाय आकडून बसलीवती.

मदीच येकादा साप, रातभर पोटासाठी हिंडल्याली मुंगस, सस, कुली रस्ता वलंडत घराच्या, लेकरबाळांच्या वडीन सुरक्षित जायासाठी गडबडीत हुती. पाटच काय कष्टाळू शेतकरी जनावराचं शान घाण उरकत हुत. झाडाव पाखर माना आत घिऊन आजून दिस उगवायची वाट बगत हुती. मुताय लावणारा गारटा वाडत हुता. काच जरा खाली घिऊस्तर भार भार वार आत घुसायचं. रस्त्याव वर्दळ न्हवती.

गाडी हायवेला लागली तशी वारुळातन मुंग्या उटल्यागत तर.. तरच्या गाड्या पळत हुत्या. तोंडात त्वांड दिसाय लागलं. कवा न्हवं ती दुष्काळी भागात पाऊस प्रसन्न झालता. डोळ दिपत्याल आशी रानातली शाळवाची पीक रानाला हिरवा शालू नेसवल्यागत दिसत हुती.

हायवेच काम सुरू हुतं. तर मदी आदी उकरून काय ठिकाणी रस्त्याचं चोंबाळ केलवत. फोन करत करत हातीदच्या फूड पावन रस्त्याच्या कडला गारट्यात थांबलवत. फाळक पाडून कासरा सोडला रेडकान अंदाज घिऊन पाय पसरून रस्त्याव गाप किना उडी मारली.

गारट्याच च्या प्याला बंड्यान त्येज्या कायमच्या जाग्याला गाडी थांबवली. ऊन जाळ च्या तेंन गलसातनी वतला. घोट घेटला तर तेंजी चव मेंदवापर्यँत गिली. आज जनावर लय आल्यात. बाजार चांगला हुईल च्या वाला म्हणला. सांगोल्याच्या जवळ आलू तर फुडल्या ट्रक वाल्यांन वरडून सांगिटलं फूड आर टीव हाय. बंड्या त्येज्या दोस्ताला आणि मला म्हणला काका जरा माग बसता का दोगं. गडी फाळ लावत्याल गारट्याच. जनावर भरून येणाऱ्या गाड्या आर टी ओ च गडी आडवत हुतं. काय पावत्या फाटत हुत्या. तर काय भ्या घालून तोडपाणी होत हुतं. साडे सात वाजता कर्तव्यावर आसल्याल आर टी ओ च प्रशासन बगून जरा हासाय बी आलं. गाडीत लोकांडी पायपा धरून आमी हाऊद्यात ऊब हुतु. वार जरकीन मधन आत घुसाय लागलं.

आदळत आपटत येगदा सांगोलचा बाजार आला. गाडी लावली तशी गडी बाजारात घुसला. त्येज्या दोस्ताला शेरड घ्यायची हुती. गयांच्या बाजारातंन वाट काढत शेरडांचा बाजार गाठला. कम्बरला लागत्याला देखण्यापाण शेळ्या आपल्या लेकरांसंग केस फुगवून ऊब्या हुत्या. काय जणांची कोकर मुकळी हुती, तर काय जणांनी पिल्ल्यांची दावन ईगळी किलती.

शिंगासनी कलर लावून काळ्या कुळकुळीत शेळ्या नवं कासार, कंड,चाळ घालून नव्या नवरीगत नटल्यावत्या. देखण्या मालाव गिराईक तुटून पडत हुतं. नुसती शेरडच न्हवती तर, कापाटाचा माल बी हुता. तीस चाळीस किलूची मस्तवाल बोकड आपल्या मस्तीत बाजारात ऊबी हुती. मेंढरांनी मान खाली घालुन ज्यो यील तेला कुक्कु लावायच आसा जणू चंगच बांधलावता. माडग्याळ मेंढराच अवघ्या पंधरा दिवसाच पिल्लू २२ हजाराला मागिटलं.

गावाकडची माणसं जनावर घिऊन बाजारात ऊबी हुती. गिराईक याच. काय दर सांगिटलाय ईचारायच. दर पाडून निम्म्या किमतीत मागायचं. शंभर दोनशे रुपय चडायच. शेतकऱ्याच्या खांद्याव हात टाकून तेला बाजूला न्ह्याचं.

कानात कुजबुजायच. पट्टीतला गडी आसला तर मग हाताव टावेल टाकून बोटावर दर ठरवायला जुपी व्हायची. दोगात दरावरन खल व्हायचा. शेतकरी दयाचा न्हाय. येपारी खोड दाखवून जनावर सलप्यात कसं मिळल बगायचा. सौदा यिस्कटायचा. येपारी लय पाणी मारायचा. दादा ह्यो माल न्हाय त्या दराचा, दोनशे वर दीतू , बग देजा भवानी हुत्या, नगु येडयागत करुस. शे पाचशे, हाजारात येवार मोडत यायचा. ही बगून येकादा दलाल दलाली खायाला मदी शिरायचा. दुनी बाजून समाधान हुईल आसा तोडगा काढत येवार करायचा. गड्याला दुनी बाजूनं पाचशे पाचशे दलाली मिळायची.

दोन चार पास पडल्याली शेरड बगीटली दर ईचारल आणि एका येपाऱ्याजवळ थांबला. दणकाट शिर्डीला माग पाट बुकुड हुता. दर ईचारल्याव बंड्या म्हणला घ्यायचं कायतर सांगा की शिरडू म्हातार दिसतंय. तेंन कम्बर धरली. शिर्डीच दात बघितलं, कासरा मोकळा सोडाय लावला. कोकर पेत्याती का? शिर्डी चालत्या, हिंडत्या का सरळ बघितलं.

येपाऱ्याला बोलला किंमत परत बोला. येपाऱयांन बंड्याच्या हाताव टावेल टाकला. आतल्या आत बोट खूनवुन दोगात बराच खल झाला. आमाला त्यातलं झाट कळलं नाय. पण बंड्यान बरंच आसल्या नसल्याल्या गुष्टी सांगून दर पाडला. शंभर, दोनशे, पाचशे करत १८ हजाराच्या शिरडीला बंड्यान बारा हाजाराला कासरा लावला. पन्नास रुपयची इसारत येपाऱयांन शिर्डीच्या डोसक्याला लावून डोसक्याला लावली. दावी तीवडी माजी मला दया म्हणला. जनावरांच्या दाव्यासंग आपली लक्ष्मी जाती आस म्हणत्यात. म्हणून कितिबी लाखाच जनावर घेटलं तरी दाव देत न्हायत. पैस भागवल. पास पडल्याल्या बाकीच्या दोन शेळ्यांकड जाऊन त्यो म्हणला दे जा मामा पाळाय पायजी. कापाय न्हाय न्हेत म्हणून सांगत त्येज्या भावनेला हात घाटला.

सकाळच्या पाऱ्यात बाजार चांगला उटतुय म्हणून ज्यो त्यो येवार कसा हुईल बगत हुता. येका मामाला एक शिर्डी व चार किलूचा बुकुड गड्यांन १० हाजारात सौदा गुडीत केला. घेटल्याल जनावर आपल्याला फायद्यात कसं पडलं ही सांगत हुता. शेळ्यांचा बाजार फिरून कडावा झाला. आकरा वाजल आसल. पोटात आग पडलीवती. बाजारात १० रुपयला दालचा राईस मिळत हुता. लोकांची मुरकंड पडलीवती. आमी गिलू. तेजी चव खतरनाक हुती. मग गड्याला गय घ्याय गयांच्या बाजारात घुसलू.

गयांचा बाजार आता चांगला फुललावता. ५ हाजारापासन १ लाखापर्यँतचा दर आसल्याल्या गया हुत्या. दिकनी पानं जनावर धुन ,नवं कासर, म्हूरकी, कंड, शिंग घुळून, नक्या तुडूंन, दूध तुंबवून कासा घागरीगत लोम्बकळत हुत्या, हात्तीगत काय जनावर नुसती कंडया ला दाव लावून बांधली हुती. काय वैरण खात हुती, कवा न्हवं ती बाजाराव आल्याली जनावर टोंगाळा करत हागुण मुतून घेत हुती. येवार ठरत हुतं, मोडत हुतं.

ऊन डोसक्याव आलं तेला घ्यायची हुती तसली गय तेला घावना. मग बैल बाजार बगून यिव्या म्हणला. बारक्या खोंडा पासन दिखनी बैल धोतराच पानं वाळत घाटल्यागत लायनीत पांढरीशिपत दिसत हुती. शेतकरी गिरायक कवा यील बगत हुता.

म्हसरांचा बाजार लांबनच बगून परत गयांच्या बाजारात घुसलू. बारा वाजून गेलत. उनाचा कडाका वाढलावता. बगत बगत येका गय जवळ थांबलू. गड्याला पास हुती तिसऱ्या येताची ३० हाजार दर हुता. बराच खल करून तेंन २३ वर येवार केला. आता परतीच ध्यान लागलवत.

बाजारात हेज्या येवडा कमी वयाचा येपारी मला दिसला न्हाय. बारक पोरगं
म्हणून कुणाला ह्यो चेष्टा करतुय वाटत न्हवत. त्यो खसाखस नोटा काडून येवाराला उबा राह्याचा. नोट काढली की बंड्या तोंडाला कुत्रं बांधायचा. बाड बाड बडबाडून येवार करायचा. ती खुबी, बाजाराची नजर तेला आलती.

चड्डीत हुता तवापासन त्यो बाजार बगतुय. त्यातल्या साऱ्या खाचा खोडा तेला म्हायती हायत्या. नफा तोटा कळतुय. मिरजच्या भाबिन बोटावरली भाषा मला शिकवल्या म्हणला. ही भाषा सजा मजी कळत न्हाय. बोट वाकडी करून दोनशे का दोन हाजार म्हणतुय ही फुडला येवार बगून ठरत आसतंय. गेल्या पाच सहा वर्षापासन त्यो बाजाराव हाय. २३ वर्षांच पोरगं ९५ हजारांची गय १ लाख १५ हाजाराला सांगोलच्या बाजारात यिकत तोट्याची माळ लावतय. बेंगलोर वरन स्वताच्या बळाव दोन तीन लाखाच्या गया खरेदी करतय.

ही शिक्षण तेला कुठल्या विद्यापीठात ,शाळत मिळालं न्हाय. त्येज्या बा ला म्हायती हाय आपलं पोरगं फसणार बी न्हाय आणि कुणाला फसवणार बी न्हाय. बा न जनावर बघितलं तर पोराचा सल्ला घितुय. त्येज्या गोट्यात कायम दोन तीन तानप्या गया आस्त्यात. कधी फायदा तर कवा तोटा हुतुय. शिकून पोर बोंबलत हिंडत्यात. रुपाया मिळवायची आक्कल न्हाय. पण बंड्यान आपली आक्कल कशात चालत्या बगून वाट निवडली. त्यो कुणाला लाजला न्हाय. मींदू वापरून त्यो सार करतोय.

खरेदीच्या गया त्यो बाजारात न्हेतुय. न्हायतर घरात यिऊन जिल्ह्यातली माणसं खात्रीन न्हेत्यात. चार जिल्ह्यातल्या बाजाराव त्यो आस्तुय. जनावरांचा बाजार कित्येकासनी जगवतुय. त्यात शिंग घोळणारापासन , डॉक्टर, वाहनवाला, बाजार समिती, वैरण यिकणारा, दावी ,कंड घुंगर यिकणारा, कित्येक मानस त्याव आवलंबून आस्त्यात.

कोरोना लागला त्यात दोन वर्स गिली. परत लम्पी रोगान बाजार बंद पडल. दोनचा ठोका आला. बाजार तुरळक व्हाय लागला. बाजार फिरून पाय घायला आलत. पोटात आग पडलीवती.शेरड, गय गाडीत भरून गाडी आता लोडयाच्या दिशेनं धावत हुती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *