--------------------------------- ======================================
गावाकडची माणसं

बामणाच २२ वर्ष रान करणारा मुसलमानाचा रप्या

बामणाच २२ वर्ष रान करणारा मुसलमानाचा रप्या

विनायक कदम: ९६६५६५६७२३

देशात राजकारण्यांनी मतांसाठी जाती धर्मात कळवंडी लाऊन टकुरी फोडायच काम केलंय. पण गावाकडं आजून जातीवरन नाव घिऊन येकमेकासनी प्रेमान हाळ्या माणसं आजून देत्यात. पण कुणाला तेज वंगाळ वाटत न्हाय. कोण कुटल्या बी जातीत आसुदी गडी येकमेकांच्या जीवाला जीव देणारं. बिनधास्त बोलणं, चालणं, वागणं म्हणून जातीच्या भिती तेंच्या मदी कवा आल्याचं न्हायत.

लोढ्यात मुसलमानाचा रप्या मजी लय फाटकाळ तोंडाचा गडी. लिजाम आप्पाची तीन पोर रप्या, सलम्या, झांगऱ्या. ईसभर माणसं येकात नांदणार घर. दुधाची डिरी, म्हसर, आचारी, शिती, बांगड्या, डायवर, घरात परतेकाच्या आंगात साऱ्या कला. मर मर राबणार, दणकून खाणार, गावातन पंढरीच्या वारीला जाणाऱ्या माणसांसंग सलम्या धा दिवस आचारी हुन वारकऱ्यांची सेवा करून यिठ्ठलं भक्ती कर्तुय. गावात कुणाच्याबी घरच कार्यक्रम,सण ह्यात आचारी ह्योच. तेंच्या सणाला सारा गाव जेवाय हेंच्या घरात. जातीच्या नजरेतन गावांन बी त्यासनी आणि तेंनी बी गावाला कवा बगीटलं न्हाय. सार प्रामाणिक कुटुंब.

रप्या बोलाय लागला तर त्यो बुलतुय का भांडतुय कळत न्हाय. त्येज्या दोस्तांच्यासंग त्यो बोलाय लागला तर हाराभर शिव्या देणार. घरात आला म्हणलं की घरात पोर , बायका बावारत्यात आसला दरारा. पोरासनी पोर झाली तरी चुकला की हानाय बी त्यो हायगय करत न्हाय. गावातल्या बामनाच शिरीतल रान रप्या १९९९ पासन निम्या निम्म्या वाट्यान कर्तुय.

बामनाची शिरी मजी चार गावात फेमस. शे दीडशे वर्षांची आंब्याची झाड. दिवसा ऊन भुईला याच न्हाय. झाडांच्या सावलीला शेरड, म्हसर, निम्मा गाव झोपाय याचा. आंब लागल्यावर तर शिरीचा काय ताल सांगावा. झाडं म्हवरली की नुसता घमघमाट. येगयेगळ्या चविची झाड. वाऱ्यान पाड पडायचं. माणसं खाऊन डिरकायची. सकाळच तर शिरीत दोन चार ठिक्की पाड घावायचं. आख्खी शिरी येपाऱ्याला ठरवून दयायची. आंब उतरण म्हयनाबर चालायची.

निर्मला श्रीकृष्ण काळे या बामनाच्या काकींची ही ८ एकर शिरी. १९९९ पासण रप्या गेली २२ वर्ष इसवासान तेंची शिती कर्तुय. काय हुईल ती निम्मं निम्मं घरच्यागत. गेल्या २२ वर्षात तेंच्यात कधी वाद झाला नाय, जात म्हणून कधी कुणीच कुणाव येगळ्या नजरेनं बगिटलं न्हाय. ९९ च्या अगोदर वरसाला माणूस बदलाय लागायचा पण रप्याच्या ताब्यात रान आलंय तस तेज्याकडच हाय.

वड्याच्या कडलाच ही शिरी हाय. शिरीत ४० वर्षाच जुन्या काळातल घर हाय. आता तीत राह्यला कोण न्हाय पण शेतात रात्री काय काम आसली की मुक्काम आस्तुय. सात आठ माणसं निवांत मुक्काम करत्याल ईवडी सोय. येगदा शिरीत जायाचा योग आला. घर बगीटलं तर ती घर न्हवत तर जुन्या काळातल संग्रहालयच हुतं. जर्मलच पावडर ठेवायच डब, दिवा, पळ्या, पत्र्याच डब, घोळणा, चाड, बास्केट, जुन्यातली सुटकेस, लाकडाचा बेड, लाकडी कपाट, लाकडी पिटी, टेप, रिडीव, आसल बरंच काय काय जुन्यातल ढीगभर सामान.

वड्याकडच्या त्या घरात प्रचंड शांतता आणि समाधान हुत. इसवास ह्यो शब्द आता दुर्मिळ झालाय.
माणसं बोलताना म्हणत्यात इसवास पानिपतात गेला. पण शिरीत रप्यासारख्या माणसांनी त्यो आजून जिवंत ठेवलाय….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *