--------------------------------- ======================================
Uncategorizedगावाकडची माणसं

बालम पाचेगावकर: आयुष्याचा तमाशा झालेला कलावंत

बालम पाचेगावकर: आयुष्याचा तमाशा झालेला कलावंत


विनायक कदम: ९६६५६५६७२३


तमाशा जितपातूर गेला तीत पातूर बालम पाचेगावकर ही नाव म्हायती नसल आसा माणूस सापडणार न्हाय. तमाशा क्षेत्रात राज्यात सर्वाधिक चर्चेतल नाव मजी बालम. जो कुणी तमाशाचा नादया हाय तेला या माणसाची कलावन्त म्हणून काय ताकत हाय हे म्हायती हाय. गेली १० वर्ष मी बालमची कला फडाव बगत हुतो. भारी वाटत हुतं गड्याच काम. पण आलीकडं जरा लिवाय याय लागल्यापासन बालमला भेटायची आणि चार वळी ल्याच्या आस लय दिसापासन ठरवलं. पण बालमच पाचीगाव ही गाव सोलापूर जिल्ह्यातल. जायाचं मजी त्यो जाग्याव हाय का बगूनच जायाला पायजी. त्यात ही कलाकार माणसं जाग्याव घावत्यात वी. म्हणलं फोन करून जावाव भेटाय गड्याला. पण तमाशातली माणसचं काय तेज्या गावातल्या ५० जनासनी तेजा नंम्बर मागिटला. पण योकबी फळला न्हाय.  येवढ्या मोठ्या कलाकार मानसाचा नंबर मानसानी आपणासनी का दिला न्हाय ईचार करून टकूऱ्यात मुंग्या आल्या. आणि तोपीक मास्तरला घिऊन शुक्रवारी पाचीगावची वाट धरली. गड्याला आज हुडकायचाच म्हणलं. सावळजात मिलिंद पोळ सरकारांनी गाडी आडवली. बालमकड जातूय सांगितल्याव गडी म्हणला थांब आलोच. लॉकडाऊनच्या काळात गरीबासनी वाटल्याल्या किटमधून १ किट पिशवीतन बालमसाठी घिऊन आला. जरा येगळाच मिलिंद काल म्या आनभवला. मार्गस्थ झालू. गुरुवारी रात्री पावसानं पूर्व भागाला निबार झोडपल हुतं. साऱ्या रानांनी वड्यांनी पाणीच पाणी. उनाच तडाका आसला तरी वाऱ्यात गारवा हुता आणि वातावरण भारी हुतं.


पाचीगावचा घाट लागला. दुनी बाजूनी गर्द झाडी कोकणात आल्यागत झालं. पाऊस आसला तुफान झालता डोंगरावरन धा गड्याला उचलणार न्हायत आसल दगाड रस्त्याव पडलवत. रस्त्याच्या खाली रान खडूळ पाण्यानं गच्च भरलीवती. गाडीसंग मस्त गिरक्या मारत मारत त्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेत चाल लूवतू तवर डोंगरात शेळ्या घिऊन चाल्याला योक मामा दिसला. गाव आणि बालमच नाव ईचारल. तेंन माजा हात धरून सकाळचा बालमचाच किस्सा सांगत बिन दाताच म्हातार खळखळून हासल. तेवढ्यात मोटारसायकल वरन एक गडी आला तेला थांबवत बालमची भेट घालून दयायला सांगितली. बर झालं वाटलं गडी आज गावात तर हाय. बोलत बोलत घाट संपत आला. तसा डोंगरात बालम त्या मानसाला दिसला. गाडी थांबवली. त्यो हाय बगा म्हणत दाऊन त्यो गडी निघून गेला. फडाव साडी निसून मावशी होत लोकासनी हासवणारा आणि बिथरल्याल कसलंबी हजारोंच हुबलाक प्रेक्षक तेज्या नुसत्या आवाजानं खाली बसायची ताकत आसणारा कलावन्त डोंगरात शेळ्या चारत हुता. लिंबाच्या झाडाखाली बसल्याला बालम उतरून रस्त्याव आला.  चौकशी, वळक ,पाळक झाली मिलिंदरावांची पिशवी तेंच्या ताब्यात दिली. परत डोंगरात हाय त्या जाग्याव यिउन बसलू. पांढरी शुभ्र ईजार, शर्ट, टुपी, हातात घड्याळ, पायात चप्पल, पाटीवरल्या पिशवीत पाण्याची बाटली आणि जेवाण. मी का आल्याचं सांगितलं.


बालमच्या नावानच सुरवात झाली. बालक दामोदर कांबळे वय ६५ , शिक्षण जुनी १० वी. बालक नावाचं बालम माणसांनी केल्याचं सांगत बालम म्हणला मुसलमानाच्या लोकासनी नावावरन वाटतय ह्यो आपल्यातलाच हाय. कूट कार्यक्रमाला गेलं की मुसलमानाची माणसं ऐसा हुवा, वैसा हुवा आस बोलत्यात.  घाटनांद्रेला बालम शाळला हुता. बारक्या पनापासन बालम हजरजबाबी, करामती करणारा गडी. १९७२ ला भारत पाकिस्तानची क्रिकेट म्याच हुती . टीव्ही न्हवती बानूरगडच्या दऱ्यात एका ठिकाणी रिडीव हुता. हेज्यासकट आट ,धा दोस्त म्याच आयकाय गेलत. आणि भारत हारल. गडी यिचित्र. म्याच हारली आता आपुन जगायचं न्हाय म्हणला. मग मरायसाठी झाडाला आसल्याल्या आग्या म्हवाच्या पोळ्याला दगाड घाटलं. म्हव जस उटल तसं ह्यासनी तानाय जुपी किली. फूडून काढलं. गडी सुजून बसल. शाळच्या जवळ शिकू शिवा घाटनांदरे हेंच्या तमाशाची प्रॅक्टिस चालायची. ह्यो आसला करामती गडी बगाय जायाचा. बगून बगून कस बोलायचं काय करायचं शिकला. आणि पयल्यानंदा वयाच्या १९ व्या वर्षी तमाशात फडाव मावशीची पयली भूमिका किली. घरात आल्याव झोडपला. घरात प्रचंड विरोध पण सोबतीला गरिबी बी हुती. हातात पैसा पाणी नसायचा. कायतर काम कराय पायजी आस पटवून देत साऱ्यासनी शांत केल. जित शिकलू तितच मुख्य मावशी म्हणून काम बालम कराय लागला. बालमच्या मावशी आणि सोंगाड्याला माणसांनी डोसक्याव घेटल.


गोकुळात गवळणी धय दुदाच माठ घिऊन मथुरेच्या बाजारला जात आस्त्यात. आणि वाटत कृष्ण तेंची वाट आडवतू. गवळणी आराडत्यात मग लुगडं नेसल्याली मावशी फूड यिउन कृष्णाशी सवाल जवाब करत त्यातनं ईनोद निर्मिती हुत्या. मग खर रूप कळल्याव कृष्ण भक्ती केल्यावर तेंची वाट सूडली जात्या. तमाशा मजी सारी व्यसनाधीन माणसं आस म्हणत्यात. पण बालम तेला आपवाद हाय. तेला कसलं व्यसन न्हाय. व्यसन करू नका, परस्त्री माते समान, चोरी करू नका, आय, बा ला सांभाळा आस त्यो तमाशातन सांगतुय. माज रंगबाजीतल काम बगून मानसासनी हासून हासून मुताय येतंय आस तेंन सांगितल. ते खरं हुतं. फडावर प्रचंड ताकत असणारा ह्यो कलावंत. तेज्या नुसत्या इन्ट्रीन खवळल्याल हजारोंच कसलंबी पब्लिक खाली बसाय पायजी. ईवडी ताकत तेज्या कलत हाय. ४५ वर्ष फडाव मावशी हुणारा बालमन आजपर्यंत राज्यातल्या साऱ्या मोठ्या तमाशात काम केलंय. आता लता लंका पाचेगावकर यांच्या तमाशात त्यो हाय.  तेजी दखल घेत एका टीव्ही सिरियल साठी तेला बोलावणं झालत. पण तमाशा बंद करून खायाच काय.


तमाशाच चांगलं वाईट आनुभव आयकून अंगाव काटा आला. कराडातल्या टेम्बू  गावात तमाशा चालू आसताना मारामारी सुरू झाली. लय दंगा झाला. फड मालकांन बाया माणसं टेम्पूत घालून टेम्पू पळवला. आणि ह्यो गडी मारामारी बगत उबा. जवा पन्नासभर माणसं माग लागली तवा गडी पळाय लागला. लुगडं फिकून दिउन सुटका झाली. कुंडलापूरला आमचं सामान फोडलं पळून जायाला लागल. कोर्टात केस चालुय. त्या गावाची आमी कदी सुपारी घेत न्हाय. पलूस तालुक्यातल्या आंधळी बद्दल सांगताना त्यो म्हणला कलाकारांचं चांगला सन्मान करणार ते गावं. कलाकारासनी तमाशा संपल्याव  घालवाय गाव थांबतय. गव्हाण, नागेवाडी आणि बलगवडेचा उल्लेख त्यानं केला. नागेवाडीत माज काम बगून माज्या पाटीव आर आर आबांनी थाप टाकल्याच तेंन सांगितलं. ४ वर्षांपूर्वी बलगुड्यात चालु तमाशात गड्याला झटका आला. कारभाऱ्यांसह गावान तेला तात्काळ दवाखान्यात नेत गड्याला बरा केला. सकाळच्या शो मदी काम करून तेंन गावाची करमणूक किली.
फड मालकासंग आमचं करारपत्रक आसतंय. ठराविक रक्कम ठरवून वर्षभर राबाय लागतंय. आकाडाला सुरू झालं की मे पर्यंत काम सुरू आसतंय. घराकडं कवा यील हेज टायमिंग नसतय. बालम म्हणला आता तमाशाकड बगायची लोकांची दृष्टी बदलल्या. नुसती गाणी लोकासनी पायजीत. कसा टिकलं तमाशा.

तमाशा टिकवायचा का मोडायचा ही लोकांच्या हातात हाय आस बालम म्हणला.  कवा तमाशा नसला गावाकड आसल की की माणसांसंग पळशी ला द्राक्षबागत कामाला जातूय. माणसं हासत्यात. तू लगा कामाला जाऊ नगु म्हणत्यात पण पोटाला काय करायचं हेज उत्तर कोण दयायचं. स्वतःच शेत न्हाय आणि दुसऱ्यांच्यात आता काम होत न्हाय म्हणून बालम आता घरची ४ शेरड १ रेडाक हिंडवाय डोंगराला जातूय. बालमला वाचायचा प्रचंड नाद. गावात वाचनालय हाय. सकाळच्या बस मधन पेपर याच्या आधी ह्यो तीत हाजर आस्तुय. ढीगभर पुस्तक वाचतुय. बालमला तीन खोल्याच घरकुलच घर हाय. तीत राहतुय. तीन पोर परिस्थिती बेताची, एकाच लगीन झालं दोगांची बाकी हायत. चांगली शाळा शिकल्यात. तुज्या तमाशामुळ आमची लग्न हुईनात या पोराच्या वाक्यान काळीज कातारल. ही सांगताना बालमच्या डोळ्याच्या कडात पाणी साचलं. फडाव लोकासनी हासाय लावणारा मी सोंगाड्या पण प्रत्यक्षात माझ्या वाट्याला रडूच येतंय. मलाबी गलबलून आल. फडाव हाजारो मानसासनी हासावणाऱ्या बालमच आयुष्य किती दुःखा न भरलय. आपलं दुःख झाकून लोकासनी हासवायच. काय म्हणायचं हेला. कला जगवणाऱ्या, जपणाऱ्या लोकांच्याच वाट्याला आसल का यावं. पोटासाठी आमी तमाशात काम कर्तुय. तमाशा ही कला आसल तर आमच्याकडं वेगळ्या नजरेनं माणसं का बगत्यात. उत्तर न्हवत माझ्याकड. आर काय तमाशा लावलाय आस म्हणत शिवी देत तमाशाला आमी बदनाम केला. फडावर सोंग काढताना रोजच्या आयुष्यात जगाय लय सोंग काढाय लागत्यात. ४५ वर्ष कलेची सेवा करून बालमला कलाकार मानधन न्हाय, हेलपाट मारूनबी तेजा फॉर्म सांगोला पंचायत समितीतन दिला जात नाय.

दुर्दैव हाय. शासनाच्या कलाकारांच्या योजना खऱ्या काम करणाऱ्या माणसांपर्यंत कदी पोचल्या न्हायत. कोण ईचार करायचं. त्यो कलेची सेवा कर्तुय,  ही तेजी चूक हाय का? बालमसारख्या हजारो कलाकारांचं ही दुखणं हाय. कोरोनाच्या काळात तमाशा बंद हाय. कित्येक कलाकारांचं जगणं आवघड झालंय. महाराष्ट घडवण्यात , उभारण्यात कलाकारांचं मोठं योगदान हाय. पण तिरस्कार मात्र तमाशाच्या वाट्याला. कमी कापडात नाचणाऱ्या बायचा सन्मान हुतोय. पण धा धा किलुच चाळ पायात घालून , आंगभर लुगडं निसून नाचनाऱ्या आमच्या तमाशाकड येगळ्या नजरेनं का बगत्यात. बालम आतून व्यक्त होत मोकळा झालता. त्येज्या बोलण्यातन समजलवत. पण बालमची दुसरी बाजू बगून वेदना झाल्या. म्हायती झाली. बालमला म्हणलं रजा दया आमाला. बालमसंग फोटु काढला. पाऊस उतरलावता. ठयांब पडाय सुरवात झाली. म्हणलं छत्री हाय का. कागुद हाय म्हणला. गाडी बटाण दाबूस्तर चालू झाली.  घाट चडाय चालू झाला. आयुष्यभर फडाव आणि जगण्यासाठी सोंग काढणारया बालमला नजरेच्या आड होईपर्यत मी बगत हुतो. डोसक्यातन बालम जायना. सावळजला चहा प्यायला थांबलो. तितच डायरी इसरली. मिलिंदराव आणि त्या हाटीलवाल्यांन  आमची अमूल्य म्हायती येवस्तीत दिली. नायतर  लिखाणाचा आमचा येडावाकडा फड उभा झाला नसता.


टीप: सदरचा लेख २ वर्षांपूर्वी लिहलाय. तो प्रसिद्ध झाल्यावर शेकडो हातानी त्याला मदत केली. त्याला आता पेन्शन सुरुय.  कोरोना संपलाय आणि गावागावात तमाशा सुरुय.  बालम जाम खुश हाय आता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *