बडावन:
बडावन:
विनायक कदम:९६६५६५६७२३
ही बडावन मजी काय ‘भानगड’ आस काय गड्यासनी वाटलं. पण फोटू बगून बडावन मजी लाकडाच कायतर
हाय आस तुमाला वाटल आसल. पण रानातली कन्स मळाय तवा काय आताच्यागत काय मळणी मिशनी हुत्या वी. बैलांच रोळ आणि त्यातनं राह्यलाल बडवायला बडावन लागायचं.
बडावन मजी कुठल्या बी झाडाचं आणि लाकडाच करत न्हवती. भुंगिरड्याच लाकूड लय कटीन आसतंय म्हणून सुतार तेजी मागणी करायचा. तेला कीड लागत न्हवती. मानस बेंद्राला बडावन वारणीसन रंगवायची. फुडल्या शीझन जपून ठेवायची. घव,हारबर, करड,शाळू, हाब्रेट काडायच्या आदी म्हयनाभर काम चालू व्हायचं. खळ रानाच्या मदी ताट काडून ऐसपैस जागा मानस करायची. तिथली जागा झाडून बैल फिरायच्या जाग्यात श्यान काला टाकून बायका सारवून घ्याच्या. आट दिसात खळ खडखडीत वाळायचं. माणसं परत येक थर सारवानाचा दयायची. पीक काडाय आलं की वर शेंड खुडायची.
खुडणी चालू झाली की दगडाच्या रोळाला जुपल्याल्या बैलांच, बैलक्याच काम सुरू व्हायचं. दगडाचा रोळ गोल गोल फिरवायचा. कनसातन धान्य निगायच. धान्य किती निगलय, किती राह्यलंय बागायच्या, पाणी प्यायच्या निमतांन बैलक्या बैल ऊबी करायचा. तवर बायका किती झडलय बगत कन्स उलटी पालटी करायच्या. त्यासनी अंदाज आसायचा किती फेर आजून मारल्याव मग सार निगल. त्यातनं बी राह्ययल्याल्या कनसासनी मग बडावण्याचा मार मिळायचा. खळ्याव दोन बायका तंगच आसायच्या. तेंच्या बडावण्याच्या मारान मनानं धान्य भायर पडायचं.
खळ्यात ऊब राहून बैल मुतायची, हागायची.. पण त्या शेणाच्या पॉला चिकाटल्याला जुंधळ्यासकट शेतकरी पू रानात फिकून दयायचा. किडा मुंगी आणि चिमण्या पाखरांसाठी. धा.. इस पोत्याच खळ आसल तर म्हयनाभर खयोळ चालायचा. बडवून काढल्याल्या धान्याला उपनून वार दयाच मजी लय कलच काम. वाऱ्याचा झोत मस्तीत वाह्याचा. कवा पंका लावल्यागत याचा. नायतर कवा कवा पाटी डोसक्याव घेटल्याल्या बाईच्या मान मुडून पडायची येळ याची. खाली साळूत्यांन नायतर निर्गुड्याच्या ठाळ्यांन कोणतर हातनी माराय आसायचं.
धान्याची चांगली झुडतर झाली माणसं पुती भरून घरला पळवायची. खळ्याव येणारा गरीबातला गरीब बी उचलनीच वज घिऊन जायाचा. रानातंन धान्य गेलं की चुकारीची कणसं, काय राह्यल्याल मागचं बायका बडवत बसायच्या. तवर करड, म्हवरी, हारबर, कायतर कायतर काढाय याच. हातानं बडवून बडवून बायका त्यातलं बी भायर काडायच्या. दोन किलुच्या मापाच बडावन उचलून आपटायचं. दिवसभरात कितीदा आपटतुय हेज गणित न्हवत. बडावन हाणून हाणून बायकांची मनगाट गड्यापेक्षा ताक्तीची बळ आसणारी आसायची. हाताचा चांगला व्यायाम व्हायचा. माणसं मजबूत हुती. तवा हात मोडा बिडायच आसलं प्रकार लय होत न्हवत.
देशात यांत्रिकीकरनाच वार व्हायाला लागलं. आणि सध्या माणूसच एक यंत्र झालाय. मळायला गिरणी आल्या. खळ बंद झालं. रोळ तिथल्या तितच कूट पडला. बैल गोट्यातन गिली. तासाभरात सारा शिवार मिशन गोळा करत्या. उपणाय लागतंय, ना बडवायला लागतंय. बिन तापाची पुती भरत्यात. त्यात कष्टान पिकवल्याच समाधान कुटाय. घरा घरात बडावन कवाच चुलीत गेल्यात. बडावन तयार करणारी जुनी पिढी बी मरुन गिल्या. मळणी मिशन आल्या पण बडावन्यान बडवून धान्य काढत तुमाला भाकरी घालणाऱ्या आय आज्जीच आणि बडावन्याच सुधा कष्ट आमाला दुर्लक्षित करता नाय येणार….?