--------------------------------- ======================================

आठरा पुरानांची आय आसनाऱ्या तमाशाचा “भास्कर”सदाकळे

आठरा पुरानांची आय आसनाऱ्या तमाशाचा “भास्कर”सदाकळे

विनायक कदम : ९६६५६५६७२३

सावरड्याच्या भास्कर सदाकळे ही नाव आता जिल्हा काय राज्याच्या परिचयाचं हाय. तमाशाच्या फडाव मावशी आसणारा भास्कर आवड म्हणून समाजातल्या अंधश्रद्धाबी दूर करायच्या कामात स्वतःला झोकून देत राबतोय. पण तमाशात रात्री राजा आसणारा कलाकार सकाळी ईळा घिऊन केकत्या कापाय जातूय, ज्या पोरीसनी तुमी रात्रीच डोळ मारताय त्या पुरी जनावरागत डुकरांसोबत घाणेरड्या खोल्यात राहत्यात. तमाशा कला व कलाकाराच जगणं किती भयानक हाय भास्करन सांगितलं आनी हादरलो.
पन भास्करला या वेदनांची जाणं हाय , कलाकारांसाठी कायतर करायला पायजी म्हणून गडी झटतोय. आनेकासनी
भेटतोय.कलाकारांचा पडदया मागचा तमाशा कसा आस्तुय ही भास्कर लिहतोय.

सावरड्याच्या यिठ्ठलं सदाकळ्याचा भास्कर बारक्यापणापासनच कलाकार गडी. कुनाचं तर आवाज काढ, नकला कर, गाणी म्हण, आसल कायतर करायचा. शाळा चालू हुती. दहावी नापास झाल्याव परत शाळच तोंड बघितलं न्हाय. तमाशाचा गड्याला चांगला नाद. पण पोरडकीला कोण घेतंय वी लगीच. गडी हिरमुसला. तवा गावात पोरांनी एक कलापथक बसवलवत. शाळत तेजी तालीम सुरू आसायची आणि भास्कर खिडक्या धरून चुरून बगायचा. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी कायतर अडचण आली आणि एक कलाकार कमी पडाय लागला. साऱ्यांचा मोर्चा भास्करकड. भास्करला पात्र मिळालं चाकरीचा गडी. पण कला गड्याच्या रक्तात हुती. त्या संधीच सोन केलं. त्यो कार्यक्रम बगाय माया तासगावकरं यांच्या तमाशातली काय माणसं हुती. तेंनी आमच्यासोबत काम करा म्हणून घळ घाटली आनी आजपर्यंत तेंन परत कधी माग वळून बगीतलंच न्हाय.

घरात कोण कलाकार न्हाय. आनी आपला पोरगा तमाशात जाणार म्हणून बा भडकला. यिरोध केला. भास्कर म्हणला मी कलेवरच जगीन आणि तुमास्नी बी जगविन, शेतात काम करायचं मला जमणार न्हाय. माया तासगावकरच्या तमाशात चांगलं नाव झालं. त्याकाळी तमाशा वगसम्राट म्हणून वळकणारया गणपत व्ही मानेंचा जोर हुता. त्या तमाशात काम करायची संधी मिळाली. आणि योगायोगन मावशीची भूमिका करणारा कलाकार दारू पिऊन तरररर झाला. मावशी मजी तमाशात महत्वाच काम. आता कोण करणार? आणि भास्करन मावशी व्हायचं ठरवलं. विनोद करून मांनसासणी हासवन मजी सोप्प काम नसतंय. पण साऱ्या फडासह मांनसासणी बी मावशी आवडली.

चिचणीच गणपत व्ही माने मजी वग लिवणारा ताक्तीचा कलाकार. नऊ अक्षरांचाच कायम वग. पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली आणि इंदिरा पुन्हा जन्माला ये ह्यो वग दिल्लीत राजीव गांधी यांनी बघितला आणि त्यासनी रडू कोसळलं. कलेत इतकी ताकत हुती. या वगात भिंद्रावाल्याच्या टोळीतला माणूस म्हणून भास्करची भूमिका हुती. तमाशा चालू हुता आता भास्कर जवानीत आलता. लग्नासाठी पुरी बगाय सुरू झालं. पण तमाशात काम कर्नाराला कोन देतय ओ पुरी. तमाशातली बाय घिऊन ह्यो घरला यील आसल म्हणत मानसानी गड्याला नाकारला. पण हेजी कला बगून मावस भयनीन आपली पुरगी दिली. प्रपंचा ,संसार सुरू झाला. अनिष्ट रूढी विरोधातल्या भास्करन गड्यांन लग्नात यिर काढला न्हाय*0.

आरवडेच राजाराम मस्के त्या काळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच कआं करत हुतं. सापांची भिती मोडावी म्हणून ते पोरासनी सापाला मारू नका , हात लावा आस सांगत हुतं. भास्करला ती भावलं आणि तेंन समाज प्रबोधनाच व्रत हाती घेतल. परिस्थिती नाजूक आसली तरी समाजातल्या अनिष्ट रुडी संपल्या पायजीती आस भास्करच मत हुतं. गाडून घेत काम सुरू केलं. गावोगाव प्रत्येक शाळा , सार्वजनिक ठिकाणी स्वखर्चान जाऊन तो प्रबोधन करू लागला. ही काम करत आसताना त्या कामाचा बोभाटा केला न्हाय. प्रसिद्धीपासून भास्कर कोसो दूर. प्रबोधनाच काम भास्करण तमाशात बी सुरू ठेवलं. मावशी बनून आल्यानंतर समाजातल्या स्त्री भ्रूण हत्या, शिक्षण, वृक्षतोड, तंटामुक्ती, जलसंधारण, मुलगी वाचवा आसल उपक्रम लोकासनी हासत खेळत सांगत त्येनं प्रबोधन सुरू केलं.

आजपातूर कमीत कमी २ हजार प्रयोग त्यांनी केल्यात. शाळतल्या पोरासनी ग्रह ताऱ्यांची ओळख व्हावी, पोरासनी अवकाश संशोधनाची आवड निर्माण व्हावी म्हणून समिती च्या कार्यक्रमासाठी तो राज्यभर फिरतोय. तमाशा कलावंतांच्यात व्यसनाधीनता वाढल्या हे सांगताना भास्करच्या चेहऱ्याव चिंता जाणवली. कलाकारांचं जगणं लय वाईट हाय त्यामुळं तरणी कोण यात याला तयार न्हायत. मांग, महार, आणि डोंबाऱ्याच्या मांनसानीच यात काम करायचं. आता पारध्याच्या पोरी बी नाचाय लागल्यात्या.

कलाकारांच्या लय आडचणी हायत्या भास्कर सांगत हुता. रात्री फडावर ला राजा सकाळी केकत्या कापाय जातूय. तेला गावात कामाला कोण सांगत न्हाय. कार्यक्रमाच्या रात्रभर जागरणांन पोटाच आजार हुत्यात. उपचार करायला पैस नसत्यात. कलाकार मानधनाव बोलताना भास्कर म्हणला व्यसनान पन्नाशीतच कलावन्त मराय लागली मग कुठली आल्या कलाकार पेन्शन. पोटासाठी नाच ते मी पर्वा कुणाची आशी आमची आवस्था हाय बगा. दोन दोन तीन महिन तमाशा तेज्याव वरीसभर कस जगायचं. आता तमाशातल्या कलेची प्रेक्षक कदर करत न्हाय, त्यासनी नुसती बाय पायजी आसत्या. मग त्यात अस्सल कला व कलाकार मरतुय ही कोण बगतुय. म्या बी बऱच तमाशा बघितलं पण भास्कर सांगितल्याल्या वेदना फडाव मांनसासणी खळखळून हासवणारया या माणसांच्या तोंडाव कधी या वेदना दिसल्या न्हायत. तमाशा कलाकारासनी आमी काय वागणूक दीतूय प्रत्येकानं भान ठेवाय पायजी. तमाशा आमी कवाच बदनाम केलाय. येत्या काळात त्यो टिकलं का ह्यो प्रश्नच हाय पण कलेसाठी तमाशासाठी आपल्या आयुष्याचा तमाशा केलेल्या या माणसांचं भविष्य काय…?

2 thoughts on “आठरा पुरानांची आय आसनाऱ्या तमाशाचा “भास्कर”सदाकळे

 • June 24, 2022 at 5:34 am
  Permalink

  भास्कर सदाकळे यांना जीगरी कलाकार म्हणता येईल.
  अनेक कलाकारांच्या जीवनाची परवड झालेली दिसते, पण त्यातूनही मार्ग काढत कला जिवंत ठेवण्यासाठी केलेली धडपड कौतुकास्पद आहे….
  सलाम त्यांना व आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आपणास…🙏🙏🙏

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *