आवातनं :
आवातनं :
गर्दीतला आवाज:
विनायक कदम:९६६५६५६७२३
आप्पा हायती का घरात आवातनं हाय. गायकवाडाच्या नामाचा आवाज सकाळी सकाळी कानाव आला. लैच तलपेन म्या तेला यिचारलं कुनाचं रं ? सुबराव आण्णाचं. काय हाय. बोकाड हाय, आरवाडीला. बरं बरं म्हनत नामाला वाटला लावला. आता गावाकडल्यासनी म्हायती आसंल पन शेरातलं वाचक म्हंत्याली ही कुटल काय सांगाय लागलंय. तर मंडळी आवातनं मजी निमंत्रण.
आमच्या गावात शंकर आप्पा,भास्कर आप्पा,बाळू, यिजू, लाल्या, सोन्या गुरव पासन रग्या, जग्या, यिष्ल्या,आब्या,ती गायकवाडाचा नामा हितपातुर आवातनं सांगाय याची. त्यात मग साकरपुडा, लगीन, पूजा,गारवा, डोळ जेवान, बोकडाची जत्रा, पोरग झालं, पुरगी झाली, दहावं , तेरावं, वरीसराद, जाग्रान ,गुंधुळ, मुरळ्या आसल्या बऱ्याच गुष्टींच जेवाय आवातनं आसायचं.
आवातनं आसंल की जेवाय जायाचा मान घरातल्या कर्त्या गड्याला. नायतर पोर आसली तर थोरल्या गड्यासनी आसायचा. मुटी मानसं कायतर कामात आसली की आवातन्याला पोरांचं नंबर लागायचं. तिकड जाताना आपल्या शिन मिंनच्या पोरासनी तुमच्यात कोन आवातनाला येनाराय रं..? इचारून तेला फूड घालून न्ह्याचा. आपल्या पेक्षा वयान थुरली मानसं तीत आसायची. ती गेलं की यीचारायची आर यू आलायस आप्पा कूट गेला. आसल कुनी इचारल की लै आपमान झाल्यागत वाटायचं.
ही झवनी आपल्याला आजुन बारक समजत्यात. आमालाबी मिशा आल्यात, गडी झालुय आमीबी. डोळ जळलं काय तुज.? आस म्हनू वाटायचं. यीचारनाऱ्यान भोळ्या वारी यीचारलं आसायचं पन तवा तेवढं समजायची आक्कल कुटली. पोळ्या आसू नायतर बोकडाच. आमच्या गावात टायमिंग पाच वाजताच आसल तरी राती धा वाजुस्तर गडी जेवाय हायतीच.
बोकडाच्या आवातनाला लै गर्दी व्हायची. काय घरातन मोटया संग बारकी बी याची. वासाचा घमघमाट सुटल्याला. जेवाय यीसबर गडी बसल्याला. बाजूला जिऊन यिसबर पान तंबाखू खात माप काडत काय गडी बसल्याल आसायचं. ही कडू कवा उटत्याती आनी जागा कवा मिळत्या हेज्याव डोळा ठिऊन काय जन चप धरून आसायचं. जेवल्याल्या गड्यांच टाकल्याल्या खरकाट्याव ताबा घ्याय कुत्री चाल करून एकमेकांच्या उराव बसायची.
तवा कूट टेबल, खुर्च्या आसली भानगड न्हवती. ढेकळात पंगती बसायच्या. जागा मिळाली की बर वाटायचं. भावकीतल तरन गडी भावकीच कांम म्हनून वाडाय पालतं पडायचं. ताट आलं की चांगल धुतलय का बगून पुसायचं. तवर ताटात उंजाळ आमटी आबिषेक घाट्ल्यागत ताटात पडायची. मग मटन, लिंबू, कांदा, मीठ, भाकरी याच्या. उनाळच्या दिवसात आसंल ऊन ऊन खायाच मजी तोंडाला आग लागायची. पंगतीच्या गतीनं जेवाय लागायचं. नाय उरलतर मानसं बोंबलायची. खिशात भरा रं हेज्या. जात न्हाय तर घ्याचं कशाला येवढं. बांधून न्हे जा. लै आबदा व्हायची.
जेवान झालं की पानी पिऊन आवातनं जेच्यात हाय तेला भेटायचं. आलुय म्हनुन सांगत किती मानसं जिवली ईचारत चौकशी करायची. निगतू म्हनून सांगत वाट धरायची. पूर्वी मोबाईल, मोटारसायकली आसंल काय जलद निरोप देनारी साधन न्हवती. गावातलं चांगल निरोप आवातनं वाला दयायचा. लोकं त्या घराच्या सुकदुःखात सामील व्हायची. रानात राबता राबता आवातनाच्या निमतान तेला सवड मिळायची. कुनाचं कसं चौकशी व्हायची. आमच्या गावात तर आवातनं येतंय. तुमच्यात येतय का..?