--------------------------------- ======================================

आनंद यादवांचा: गोतावळा

आनंद यादवांचा: गोतावळा

विनायक कदम: ९६६५६५६७२३

गोतावळा ह्यो सबूद तसा ग्रामीन भागाला चांगला परिचयाचा हाय. ‘पै’पावन किती जास्त हायत हेज्यावन त्यांचा गोतावळा दांडगा हाय आसा शब्दप्रयोग प्रचलित हाय. पन लेखक आनंद यादवांनी लिवल्याला गोतावळा मुक्या जिवांच दर्शन घडवणारा हाय. २०ते २५ खुट्ट्याचा भलामोठा मांडव व त्यात आसणारी निरनिराळी तरनी म्हातारी जनावर. या जनावरांच्या कष्टांन फुललेला मळा. मळ्यातल्या दिवस रात्रीचं वर्णन व सर्व मुक्या जिवांचा लळा लागलेला २० वर्षांचा तरुन नायक मजी नारबा. मालकांन त्याच मळ्याच्या राखणीसाठी लग्न करायला मालकांन कशी चालढकल किली. यंत्रयुगाच वार लागलं आणि मालकांन ट्रॅकटरसाठी सारा मुक्या जिवांचा गोतावळा ईकायला काढला. धनी मेल्यागत जनावर गोठ्यातन निघून गेली. नायकान फुलवलेला मळा झाड तोडून बोडका केला. ट्रॅकटर डायवरला लाथ मारली म्हणून सोन्या खोंडाला दिलेला मार , यावरन वाद होत मालकांन सोसत नाही तर वाट धर…आशी वापरलेली भाषा, हा सर्व थरार वाचण्यासारखा आहे. ग्रामीण भागात ज्यांचं जगण झालय त्यासनी सारा गोतावळा डोळ्याफूड दिसलं आस पुस्तक हाय ही.

नारबा नावाच्या नायकाच्या गोठ्यात सोन्या, व चण्या ही जवानीत येणारी २ खोंड हुती. शेतीकामासाठी नाग्या व वाघ्या असे २ ऐटबाज बैल, मोट व शेतीकामाला राम्या व भिम्या नावाचं रेड, शिवलिंग्या व म्हालिंग्या या थोरल्या बैलातील म्हालिंग्या फक्त जिवंत हुता. टिक्की म्हस, थोरली गाय, तीन पाड्या, ३ रेडक, आंधळ म्हारत्या नावाचं घोड, चंपा कुत्री व तीच नाम्या पिल्लू, मारका कोंबडा, शेरड, माकड, चित्तार, ससे, कोल्हे, गाढव, बेडक ,कावळा, चिमण्या, घारी, यांसह अनेक मुक्या जिवांचे विविध प्रसंग वाचकाला समाधी लागावी आस रेखाटल्यात. नारबाला मालकांन कुणाला कशी व किती वैरण घालायची हे सांगितलंवत. रेड्यासनी चिपाड़, आंधळ्या म्हारत्या घोड्यास फक्त भाताचं पिंजार, मात्र नारबा असा भेदभाव करायचा न्हाय, मळा फुलवाय सर्व जनावरांचं योगदान हाय. मात्र वय झालं म्हणून त्यांच्या वैरणीत भेदभाव करण त्यास जमत न्हवत.

वाप केल्याली पाडी, तिची आतील घुसमट व बाजूला असणाऱ्या ५ बैलांची पाडीसाठी झालेली घालमेल डोळ्यासमोर चित्र उभ करतंय. यावेळी नारबा म्हणतो रांडपायी पाड.. वाल्या, सुग्रीवागत भांडाय लागल्यात. पाडीची घालमेल झालेली असते. मात्र मालक चांगला बैल दावण्यासाठी २ दिवस घालवतो, शेवटी नायक सर्व नातेसंबंध तोडून पाडीच भावासोबत संबंध घडवून आणतो. दिवसभर मोटन पाणी पाजत शेतातील नायकाचा दुखर अंग दाबायला रात्री बायकोची गरज वाटायची. मात्र बायको करून दिली तर हेच मळयाकड दुर्लक्ष हुईल म्हणून फुढल्या वर्षी लग्नाचं बघू म्हनत टोलवन व नारबाची बायकुसाठी हुनारी तगमग मन विशन्न करते. कामातन दिवसा येळ नसल्यानं सोन्या चांन्या या खोंडासनी रात्रीच्या चांदण्यात गाडीला जुंपल्याव त्यांचा पळ व खड्यात उलटी झालेली गाडी.

एक दिवस नारबा व सित्यान रेड नांगराला जुपल. झाडाची मूळगी फाळास लागली आणि रेडयासनी नांगुर वडना, मग नायकांन कोयंडा फुटोसतर दिलेला मार आणि मुळी लागल्याचं कळल्याव विनाकारण मारलं म्हणून झालेली तगमग हेलावणारी आहे. पाऊस पडल्यावर आंधळ्या म्हारत्या घोड्याच नशीब उजाडत आस नायक म्हणतो. हिंडत हिंडत ती एका पडक्या हिरीत पडत आणि त्यावेळचा प्रसंग डोळ्याच्या कडा ओल्या करतो. घोड्यांन साऱ्या गावाच्या वराती काढून दिल्या हुत्या. जवानीत त्याचा रुबाब दांडगा हुता. पण हिरीत पडून त्याची हाड मुडली. नायक त्यास हिरीत वैरण पाणी घिऊन जातू पण ती खात न्हाय. हिरीतच त्याचा जीव जातो. दुसऱ्या दिवशी खळ्याचा रिकामा धोंडा व पावसात घोड्याची वाहून जाणारी लीद रोमांचकपणे चितारलीय.

चंपी कुत्रीला शेजारच्या पवाराच्या कुत्र्यानी भांडणात तूडली. जखमी झाली. तिला औषध आनाय नायक गावात ईतू. दया माया नसलेला मालक म्हणतो तिला चावाय त्वांड न्हवत का. मरुदे मिली तर पिल्लू हाय. पन तू आधी मळ्यात जा. चंपी मरती तिला पडक्या हिरीत वडुन टाकलं. आनी आपल्या आयजवळ नाम्या पिल्लू ४ दिवस बसून जीव सोडत. हा प्रसंग विदारक हुता. बारक्या पिल्याचा केल्याला कोंबडा मालकावरन उतरून सोडल्याला आसतू. घारीच्या व मुंगसांमुळे बाकीची पिल्ली टिकत न्हवती त्यामुळं कोंबड्या न्हवत्या व कोंबड्या नसल्यानं झालेला सर्वाना मारनारा ह्यो मारका कोंबडा. लयच त्रास दयायला लागल्यावर तेला कापायची तयारी मालक करतू. मात्र आपलं पोरगं आपल्या हाताने कापाव असा बाका प्रसंग नायकावर येतो. कोंबडा घावना आणि मालक नारबाला धराय हाक मारतू. कोंबडा जाळ फेकून नारबान धरला. वाचताना अंगावर काटा यावा असा हा प्रसंग. २५ मानस जिवली. पाटच रोज वरडणारा कोंबडा पोटात वरडत भांग देत हुता. वाऱयांन साऱ्या माळाला झाल्याली त्याची झुपकदार पीस बघून नारबाची कालवा कालव हुती. उदास हुन त्यो सुतक आल्यागत खुपीत बसतू.

म्हातार म्हालिंग्या बैल नारबा तळ्यात न्हेतो, पोर बेडक धरत हुती. बैल पाण्यात बसल्याव बेडक पळाली. शंकऱयांन म्हालींग्यास घातलेला धोंडा व कसलं केत्तर बैल आणलयास ही शब्द त्याच्या जिव्हारी लागतात. मालकांन ट्रॅकटर साठी जनावर ईकायला सुरवात किली. थोरला बैल म्हणून म्हालिंग्यास दिला जाणारा मान. पण अखेरच्या काळात त्यास उठता बसता ईना, चारा खाईना, मग मालक जिता बैल मांगासनी कापायला नारबा नको म्हणत आसताना दितू . मालकाच्या ठायी त्यास आता किंमत न्हवती. त्याच्या जिवावर सारं फुलवल ही त्यो इसरला हुता. नारबान म्हशीला टोचा मारणारा कावळा एका चाबकाच्या फटकारयात पाडला. त्या मेलेल्या कावळ्याच वर्णन करताना लेखक लिहतो खपली खायाला रुसल्याला कावळा. कावळ्याच्या मातीला त्याचा सारा गोतावळा येतो. लिंबाच झाड त्यामुळं कोळशागत हुत. त्यांच्या भाव भावना जिवंत मानसाच मन हेलावनाऱ्या हायत.

२२ खुटयांची दावन ४ वर आली. पिपळाच्या झाडा बरोबर सारी झाडं तोडून हिरवागार मळा बोडका केला. पिपळ तोडताना त्याला लावलेल्या दोरयांच वर्णन गुन्हेगाराच्या देहास लावलेल्या काढण्या अस लेखक करतो. आणि रो रो आवाज करत एक दिवस ट्रॅकटर येतो मालक खुश हुतो. त्याच्या डायवरचा तालही लेखकान मस्त चितारलाय. डायवरला चाण्या खोंडान लाथ मारल्यावर त्यानं काठीन दिलेला मार व त्यावरून नारबाच्यात व त्याच्यात झाल्याला वाद. लेखक लिहतो जीवाची माती करून मोठं केलेल्या जनावराला मारताना त्याच्या डोसक्यात धोंडा घालावा वाटत हुता. परत काठी लावलीस तर याद राख हा भरलेला दम. व चाण्या मेला तर दुसरा यील पण डायवर मिळायचा न्हाय. आणि सोसत नसल तर वाट धर हे मालकान वापरल्याल शब्द वाचकाच्या काळजाच पाणी करतात.

मळा सोडताना नारबा साऱ्यासनी सोबत याचं आवाहन करतू. तेच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहू लागत्यात. सारी जनावर ,झाड ,पक्षी ,कीटक यासनी चला म्हणून त्यो साद घालतो. आता मळा ट्रॅकटर व डायवरच्या मालकीचा झाला असतो. नारबा जाताना शिर्डी वरडत हुती. नारबा म्हणतो का वरडतीस तुझ्या पिढ्या अन पिढ्या मालकांन यिकून खाल्या. ट्रॅकटर आल्यावर बदललेलं शेतीच स्वरूप चितारलय . नारबाच्या मागन कुत्र येत हुत? का म्हणून ती येत हुत त्यास प्रश्न पडतु. आपुन चाललु मात्र या मातींन काय करायचं ? कुठं जायाचं ?हा प्रश्न नारबाच्या डोक्यात जाळ करतो. बदललेल्या माणसाच स्वरूप पाहून मन हेलावत.

आनंद यादवांचा १९७१ चा ह्यो गोतावळा, आता सुवर्ण महोत्सवात कागदावर जगताना; आपलंही यातल काहीसं मिळतं जुळतं हाय आसं वाटलं. पुस्तकाचा शेवट वाचताना डोळ्यात पाणी आलं. गोतावळा वाचून झाला. त्यो दिवस भकास आणि उदास गेला. बदललेला माणूस व हरवत जाणाऱ्या मुक्या जिवांच्या विषयीच्या आमच्या भावना ,माणुसकी यांची आम्ही माती लुटली. ग्रामीण जगण ज्यांनी जगलय, त्यांनी आवश्य ही पुस्तक वाचा व खरेदी करा. हे पुस्तक जेवढं जुन होईल तेवढं त्याच मूल्य वाढणार हाय. पुस्तक वाचून मनाची घालमेल झाली म्हणून म्हणलं भावनांना वाट करून द्यायला लिहावा गोतावळा. लिउन झाल्याव बरं वाटत हुत. गोतावळा लिहून आळस द्यायला घराच्या भायर आलो तर आमचा गोतावळा एका लायनीत गपगार बसला हुता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *