आंब्याला पाड लागलाय:
आंब्याला पाड लागलाय:
विनायक कदम: ९६६५६५६७२३
आला गं बाई आला गं बाई आला गं..
आला आला आला आला….
ओ ओ ओ आला आला आला आला..
पाडाला पिकलाय आंबा
आंबा बाई पाडाला पिकलाय आंबा
नीट बघ पाडाला पिकलाय आंबा…
भर उनाचं एफ एम वर सुलोचना चव्हाण हेंची लावनी लागलीवती. लावनीत पाड लागल्याल्या आंब्याचं वर्णन हुतं. झाड बगाय येपारी यितुय. त्या येपाऱ्याला गान्यातन झाडाची मालकीन सांगत्या भारान वाकल्याल्या झाडाची चोरांनी खड मारुनीती म्हनून म्या किती काळजी घिटल्या. खडा पारा ठिऊन राकन किल्या. केशरी रंगाचा आंबा हाय. तेजा वास तर घिऊन बगा की तुमच्या तोंडाला पानी सुटलं. तुमी आस घुटमळू नगा. झाड तुमी घेटलं तर माजी काळजी मिटल.
गितकार तुकाराम शिंदेंनी ते गानं येवढं भारी लेलंय की पाड लागल्याल उभं झाड डोळ्याफुड उभं व्हाय पायजी. आता गुडगाभर झाडाला आंब लागत्यात पन तेला चव ना चोता. गावा गावतनी जुन्या मानसांनी लावल्याली झाडं मजी आभाळाला टेकाय गेल्याली तेंची उंची. चार गड्यांच्या कवळ्यात बसणार न्हाय आसला बुडका. पसारा तर काय बारका हुता वी. तेंन आपल्या अंगाव सजा सजी कुनाला चडाय दिल न्हाय. वड्याकडला, बांदाव तट च्या तट.
गारीगार सावलीत शे दोनशे मानसं बसत्याल आसला तेजा आवाका. आमच्या गावात वड्याकडला सावरड्याच्या हाद्दीत मानूस झाडाव चडला की चिचनीच्या हाद्दीपातूर झाडाच्या ठाळ्यावरन आंब उतरत फूड सरकायचं. मानसांनी आंब्याच्या झाडावरनी, त्येज्या चवीवरन शेताची नाव ठिवलीवती. गुटी आंबा, शेपवा आंबा, लोनच्याचा आंबा, नासका आंबा चिक्कार नाव झाडाची. झाडासनी आल्याला म्हवर बगून मानसं पावसाचा अंदाज सांगायची. साऱ्या रानानी, शिवारात, वड्याकडसनी नुसता म्हवराचा घमघमाट सुटायचा.आणन त्याव ढीगभर मधमाशा मध गोळा कराय पालतं पडायच्या.
गर्भार बायला संभाळल्यागत मानसं आंब्याच्या झाडाला जपायची. राकाय गडी झाडाखाली बसायचं. म्हवराच, बारीक आंब्यात कुय भरून पाड लागून झाड उतरुस्तर राकनी आसायची. बिन पाड लागता मानसं झाड उतरायची न्हायती. पाड झाडाखाली पडला की येपारी दावाय सुरवात व्हायची. खायासारक आंब झाल्यात,पाड लागलाय कळलं की पोरांच टोळकं ध्यान दिउन आसायचं.
चिवाट गडी झाडाव तर चडनांर. नायतर भिरीरा दगाड घालून आंब पाडनार. मजा हुती त्यात. कुनाचा नेम लय हाय कळायचं. पन आंबा टिपायच्या नादात बाजूच चार आंब बाद व्हायचं. ठापड्यासनी लागल्याल्या दगडाच्या आवाजानं मालक शिव्या देतच याचा.
गाबडी कुटणबी घुसून पळून जायाची. कुनाला लागायचं. वरबडायच, शर्ट फाटायचा, रक्त याची पन आंब हानायचं काय सोडलं न्हाय. किशातनच चटणी मिट आनून खाऊन हिरीत पवाय उड्या पडायच्या. तंग जुळनी आसायची. आमच्या गावात उस्मान भय, तेंचा मिरजचा पावना, बबन रुपनराचा बा. आसल बरंच येपारी हुतं. उतरायला म्हनलं तर ठरल्याल गडी. मौला आबा, बळी आण्णा, सुबास चव्हाण, आंदा मंडले, दगडू मंडले, बाळू मंडले,
हेंच्याशिवाय सजासजी मोट्या झाडावनी कोन चडत न्हवत. बगून घाम फुटलं आसल्या त्या झाडावनी चडायच मजी लय आवगड काम. मग उतरनारांचा तालच की. आण्णा म्हनून मानसं माग लागायची. उतराय येताना मग गडी येका खांद्याव झिलनी, चेळ, चेळ सोडाय वडणी, जेवनाचा डबा घिऊन तंग जुळणी आसायची. घरातन गासबर खाऊन आल्याल गडी झाडाखाली आल की पानं तंबाकू खाऊनच झाडाव चडायचं.
पयल शेंड्याव हुन उतराय चालू करायचं. नुसत्या पानागत बगल तिकडं पिवळ हाडूळ आंब. नागीन लवल्यागत गडी लऊन गडी शेंड्यावल आंब वडायचा. भरल्याल चेळ उतरून घ्यायला खाली मानूस आसायचा. तेंन देट काडून आंब मातीत उलट करून लावायचं. पिकल्याल बाजूला काडायच. चेळ्यातन झाडावल्या गड्याला पाणी, जेवान वर पोचत व्हायचं.
लय पसाऱ्याच झाड आसल की दोन गडी त्याव चडायचं. दिस मावळतीला चांगला गाडीबर आंबा उतरून व्हायचा. घरला न्ह्यायचा आसला तर मोजत शेतकरी मोजत न्हवता त्यो बैलगाडीच्या साठ्याव माप लावायचा. किती आंबा कुटल्या झाडाव निगला.
येपारी आसला तर माप टाकायचा. मौला आबा लहाब म्हणून कायतर मोजायचा. ती भाशा बी भारी हुती. घायला आल्याला आंबा चगळात टाकूसतर पिवळा हाडुळ व्हायचा. आताच्यागत आवशीद मारून नुसता पिवळा हाडुळ करत न्हवती. वाडा, माळवतीच्या घरांच्या खोल्याच्या खोल्या आडी घालाय भरायच्या. तेज्यावनच म्हन पडली आसावी योक आंबा आडी नासवतुय. घरादारात नुसता घमघमाट. घागरीन शिकरान.
सुना, लिकीबाळी, पय, पावन ह्यासनी डालग्यान आंबा पोच व्हायच. शेजारया पाजाऱ्या पासन भिकारी आकारी आंब्यांन जोगवायचा. मानसं बसणीला पाटीबर आंब वरबडायची. खाऊन खाऊन हागवानी लागायच्या पन सुट्टी देत न्हवती. सगळा दिशी आनी इरसाल माल. वरलीकडलं वार सुटलं की जात टीगायची न्हाय. नासायची कीड पडायचं. मग मानस लोकासनी वाटून घर मोकळं कराय बगायची. आंब्याचा शिजन दणदणीत संपायचा.
आंब्याचं झाड नुसतं मांनसासनीच न्हाय तर पशु पक्षी, माकडं, वाटसरू, चोरट्यांच सारयांच आत्म तृप्त करायचं. वार सुटलं की पोत्यानं पाड झाडाखाली पडायचं ती गोळा करायचं मजी लय आनंद वाटायचा. जुनी झाड भिरडान पोकारली. नव्या पिडीच्या गड्यानी रांन पडतंय म्हणून झाड कापली. शेकडो वर्षांचा साक्षीदार आसल्याली झाड संपली.
आता कलमी झाडाचा जमाना. तांब्यागत मोटा आंबा. पन तेला चव कुटाय. गावाकडची मानस म्हनायची गावाकडच्या पोरासनी खुट्याला तिडा घालाय, पवाय, आनी झाडाव चडाय याला पायजी. आता पाच सहा फुटाची झाड. तेज पाड खायाला पोर ईनात. दगाड मारायचं, आनी झाडाव चडायचं लांबच. ग्रामीण भागाचा त्यो सुवर्णकाळ आता संपलाय. संपला न्हाय तर त्यो आमी आमच्या हातांन संपवलाय….