--------------------------------- ======================================

साठीतला बहुरूपी: सिताराम शिंदे

साठीतला बहुरूपी…. ‘सिताराम शिंदे..!’
विनायक कदम. ९६६५६५६७२३

लग्नाला चला म्हणलेत… आवरून घ्या…लग्न हाय सासऱ्याचं, इवायाचा गोंधळ,इनीचं जागराण, चुलत सासूचं नाव ठेवायचाय,नटायचं आणि मोटारी मागं फिरायचं
“ऊस लावलाय पत्र्यावर, हिरी बुरजाला पाणी, चुलीला मोटरा व छपराला पाईपलाईन किल्या. रात्री बायकुची पोरं उपाशी हुती. लाईन हाफ झाली म्हणून आलो, न्हायतर येत न्हवतो.!               यरवाळी दारात कुणीतरी जोरात शिट्टी मारली आणि “भायर या सगळी….!” आसं वराडलं. घरात बारकी पोरं बावारली. भायर यिऊन बघितलं; तर पुलीस..! मलाबी कळंना…  पुलीस दारात यायजोगं आजूनतरी म्या काय भानगड किली न्हाय. मग ह्यो काय प्रकार ..? “तुमचं नाव सांगा, चौकशीला आलोय.” असा दमच त्यानं दिला. घरातनं भायर येत गड्याला पुरता न्ह्याळला, भारी वाटलं.! त्यची भाषा कानात साठवू लागलो. साठीतला ह्यो भारदस्त गडी हुबेहूब फौजदारच दिसत हुता; पण तो बहुरूपी हुता..!खाकी वर्दीत आलेला गडी. डोक्याला टूपी, पायात काळा बूट, एका हातात काठी, एका हातात वही आणि खांद्याला अडकवलेली पिशवी. भारदस्त मिशा असणारा साठीतला सिताराम शिंदे सकाळी सकाळी दारात आला आणि ‘भो-भो’ करून कुत्र्यांनी कालवा केला. बहिर्जीं नायकांच्या या वारसदाराला सन्मानानं घरात घेतलं. पाहुणचार केला आणि मला पायजी  आसल्याल्या म्हायतीसाठी गड्याला बोलतं केलं.                 ‘सिताराम सिदू शिंदे’ श्रीगोंद्याचा रहिवासी. पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट आणि हाताला रोजगार नसल्यानं ५ वा मैल हीत आट दिसांपासून  तळ मारलाय. संग तीन मुलं व एक मुलगी हाय. पोरं मात्र बहुरूपी न्हाईत; त्यांना ह्यातलं काय येत नाय. मी वयाच्या बाराव्या वर्षापासून ही काम करतोय.”  त्यांनी सांगितलं. बहिर्जी नायकांमुळं बहुरूपी कला लोकां- समोर आली. तिला मानसन्मान मिळाला. शाळा कायच नसल्यानं स्वताचं नाव बी काढता येत न्हाय. वयाच्या बाराव्या वर्षांपासून तो सोंगं काढतोय. त्यात शिवाजी महाराजांसह अनेकांची हुबेहूब सोंगं त्यानं वठवली हायत…! बहिर्जींनी या कलेचा वापर करूनच स्वराज्यासाठी बहुमोल कामगिरी बजावली. विविध सोंगं काढून सर्व खबरा ते महाराजांकडे पोचवत. पूर्वी पोलीसांच्या वेशात बहुरूपी आला; तर माणसं भ्यायची, पळून जायची.  “अय थांबा.! पुलीस न्हाय, बहुरूपी हाय.!” आसं सांगावं लागायचं. पैसं न्हायतर खळ्यावर टोपलीभर धान्य दिलं जायचं. घरात आसलं तर माणसं जेवल्याशिवाय सोडत न्हवती. येका येका गावात बहुरुप्याचा आठ-आठ दिवस मुक्काम पडायचा. रोज रात्री एक सोंग काढून करमणूक व्हायची. लोकांना कला आवडायची. लोकं हौसनं बक्षीस द्यायची. आता टीव्ही, मोबाईल आला. करमणुकीची बरीच साधनं आली आणि ‘बहुरूपी’ सारख्या आपल्या पूर्वजांनी जिवापाड जपलेल्या कला बंद पडायच्या मार्गावर आल्या.                   “आंगात भरपूर कला हायत; पण काय उपयोग ? जगायचं सुद्दा आवगड हाय; पण कलेसाठी, कला जगवायसाठी जगावं लागतंय. तीन पोरं चांगली शिकल्यात; पण नूकरी नसल्यानं पुस्तकं इकायचं काम करत्यात. उन्हाळभर चार महिनं कला दावत फिरायचं. परत कुठंतरी कामाला जाऊन जगायचं. पूर्वी तालुकं व त्यातली गावं वाटून दिलती. तिकडं दुसऱ्या कुणी फिरकायचं न्हाय; असा नियम होता. आता तसं कायच ऱ्हायलं न्हाय. शासन दखल घेत नसल्यानं कलेचा सन्मान होत न्हाय. हळूहळू ही कला लोप पावत चालल्या. जगताच येत नसल्यानं पुढच्या पिढीनं यात यायला नकार दिलाय. लिहून दिलं तरी पोरासनी, बोलाय येत न्हाय. ‘ऊस पत्र्यावर लावला.’ म्हणलं, की नातू हासत्यात.”  तेज्या मनाची घागर त्यो माज्याफुढं रिती करत हुता.                 बहुरूप्याचं आणखी एक कडवं म्हणा….. आसं म्हणल्यावर गड्यानं सुरवात केली….”लग्नाला चला नं… तुंबडीभर देना नं… बाजीराव नाना नं… घरी न्हाय दाणा नं… हवालदार म्हणा नं…  एक घव टोकरा नं… दीड तवा ठेवला, ५० पुळी किली, ६० गावची माणसं सयपाकाला गिली,  मूडदंग वाजविन,  पंढरपूर करणी नं… धड्याची चूळी,  वैराग करणी नं… मचावर बुचडा नं…  कुसळानं करणी…..                   मुळात ‘बहुरूपी’ हा बहिर्जी नाईक यांच्या काळापासून समाज हिताचाच हाय. कायदा सुव्यवस्था रहावी; यासाठी ‘हेर’ म्हणूनच छत्रपती शिवरायांनी त्यांची नेमणूक केली होती. मात्र महाराजांनंतर बहुरुप्यांच्या या कलेचा ‘हेर’ म्हणून आमाला चांगला वापर करता आला नाही. पोलीसांच्या गोपनीय विभागाला किती गोपनीय माहिती असते; हा संशोधनाचा विषय आहे. गावोगावी पोलीस यंत्रणेचा भाग म्हणून पगारी पोलीस पाटील नेमले. गावातल्या चुकीच्या गोष्टी, माहिती, पोलिसांना देत समाज विघातक प्रकार रोखले जावेत; ही पोलीस पाटलांची जबाबदारी आहे. मात्र या सर्वांची खडानखडा माहिती काढणारा, ज्याच्या रक्तातच ‘हेरगिरी’ हाय; असा बहुरूपी आज दारोदार फिरतोय पोटासाठी..!                            ज्या देशाचं हेरखातं ताकतीचं, तो देश अधिक सुरक्षित मानला जातो. खरंतर आमचा देश बाहेरच्यांपेक्षा आतल्या नालायकांनीच अधिक पोखरलाय. बहुरुप्याचा, त्याच्या कलेचा आम्ही समाजासाठी वापरच करुन घेतला नाही याचं मनाला शल्य वाटलं…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *