५५ वर्षात महाराष्ट्र धुंडाळनारा पिंगळा:
५५ वर्षात महाराष्ट्र धुंडाळनारा पिंगळा:
विनायक कदम:९६६५६५६७२३
'पिंगळा' म्हणलं की डोळ्यासमोर उभं राहतं... कंदील, डमरू व त्याचं भाकीत..! पहाटेच्या वेळी अंधारात दारात येणारी ही स्वारी काळाच्या ओघात लुप्त झाली आणि ग्रामीण संस्कृतीचा बाज हरवला. गेली ५५ वर्षे अखंड महाराष्ट्र पायी चालत धुंडाळून वयाच्या ७६ व्या वर्षीही 'पिंगळा संस्कृती' जपतोय. वेळापूर ता.आकलूज जि.सोलापूर येथील 'बाबा नामदेव जाधव' हा वृद्ध पिंगळा.
मानस साखरझोपेत आसताना, तांबडं फुटायलाच पिंगळ्याचा दिवस सुरू होतो. कोंबडंबी आजून वरडल नसतंय. आंधारात रातकिड्यांची किर्रर्र... किरकिर आजूनबी सुरूच आसत्या. सारा गाव झोपल्याला आसताना गावाभायर आसल्याल्या पिंगळ्यांच्या पालासनी जाग इत्या. ती पाल कसलं ओ..? कंबरयेवढ्या उंचीची खोपाट.! चंद्र परतीच्या मार्गाला लागला की पिंगळ्यांच्या वस्तीवरल गडी मनानं जागं हुत्यात. कित्येक वर्षांची तेंचि ही सवं.
त्या काळ्याकुट्ट आंधारातच पिंगळा आपली धोपटी हुंडाकतो. धोपटीतली शास्त्राची कागड,वह्या,पुस्तक तपासतो. थंडीत आंघुळ करून पिंजरीची डबी, भस्माची वडी, फेट्यावर बांधायला चांद… ही सगळं भायर काडतो. आधी धोतार नेसून मग त्याव बंडी घालतो. त्या बंडीवर काळं जाकीट..! डोसक्याला आठ मीटर लांबीचा फेटा खच्चून बांधला; की त्याव देवदेवतांचे चांदीचे-पितळेचे मुखवटे, नाणी आसल्याली साखळी नायतर पट्टी बांधत्यात. मग भस्माच्या वडीने कपाळावर आडव पट्ट वडून कपाळ पांढरंशिपत झालं;
की त्यावर कुकवाचं लाल उभं बोट लावायचं. मग गळ्यात कवड्याची माळ, ये का खांद्याला झुळी, येका खांद्याला धोपती आदकावतू. आंधारात दिसाय येका हातात खंदील तर दुसर्या हातात आपुन आलुय लोकासानी कळाय म्हणून बारक डमरू मजी ‘कुडमुडं’. खंदीलाच्या जिवावर आंधाराला चिरत कशाच भ्या न बाळगता पिंगळा मैलोनमैल रस्ता तुडवतो.
येक दिवस सकाळी सकाळीच भारदस्त पोशाखात बाबा जाधवांची स्वारी डमरू वाजवत दारात आली. डमरुच्या आवाजानं कुत्र्यांनी कोयाळ उटवलं. संस्कृतीच्या या रक्षणकर्त्याला घरात घेटलं. त्याला बोलतं केलं.... "पिंगळा जमातीतली काय मंडळी भगवान शंकराच्या सेवेत होती. हातात खादील उजेड दाखवण्यासाठी व डमरू आपण आल्याची चाहूल देण्यासाठी..! पहाटे ४ ते ९ या टायमालाच भिक्षा मागण्याचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला नियम..!"
पहाटे पहाटेच येण्याचं कारण विचारल्यावर बाबा सांगू लागले…”पूर्वीच्या काळी लोकं लवकर उठून आपापल्या कामाला निघायचे; त्यामुळे पिंगळाही लवकर जायचा. आता लोकं ऊनं वर आल्यावर उठतात. पाटच्या टायमाला सांगिटलेलं भविष्य तंतोतंत खरं ठरायचं. पूर्वीच्या काळी लोकं स्वखुशीनं धान्य देत होती. ते स्वर्गलोकी धर्मापर्यंत जातंय, आशी भावना आसायची.
येखाद्या घरात सासुरवाशीन धान्य घालताना चिंतेत दिसली की पिंगळ्याची सुरवात व्हायची…
“त्रासलेली दिसतेस गं माय
काल रातच्याला भांडण झालं गं माय
मनाला लावून घेऊ नकोस गं माय
सुखाचा संसार करशील गं माय…”
त्यानं अंदाजानं मारलेला तीर तिच्या काळजात बसून ती लगेच पाघळायची. आणि यांच्या झोळीत मुबलक धान्य यायचं..!
आता आई म्हणती मी सोसावं किती? चंद्र-सूर्य म्हणतो मी नेत्रानं पाहावं किती? मेघ म्हणतो मी धुवून काढावं किती? तत्वानं कुणी आज वागत नसल्याचं बाबानं सांगितलं. पूर्वीच्या काळी लांडी- लबाडी न्हवती. आता खोटं बोलणारा ३ येळा जेवतो; तर खरं बोलणाऱ्याचं येका टाइमाचं वांदं हायत. पूर्वीच्या काळी सुगी झाली; की पिंगळा मागायला बाहेर पडायचा. चार घरं मागितली तरी वज्जं जात न्हवतं.!
बारक्या गावात २ दिवस तर मोठ्या गावात ४ दिवस मागिटलं जायाचं. त्यांच्या गेल्या २० पिढ्या पिंगळ्याची परंपरा चालवत आहेत. ५५ वर्षांपासून बेळगांव, मुंबई, कोकण ते उभा महाराष्ट्र पायी चालत धूंडाळल्याचे बाबा म्हणाले..! मात्र आता नवी पिढी यात यायला तयार नाही. “आमाला शिकून मोठ्ठं व्हायचाय. आसलं काम आम्हाला करायचं नाय..!” असं पोरं बोलतात. पिंगळा जमातीतील अनेकजण शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील, इंजिनियर, पोलीस… अशा वेगवेगळ्या हुद्यावर गेले. त्यांची गरिबी, पिचलेपण संपलं..!
आपली संस्कृती, परंपरा लोप पावत आसल्याबद्दलची काळजी त्यांच्या बोलण्यातून जानवली. हे टिकलं पाहिजे, याविषयीची तळमळ त्यांच्या डोळ्यात दिसली. पूर्वीच्या काळी कला, संस्कृतीला लोकाश्रय, राजाश्रय होता..! "आताची पिढी स्वतःच्या आई बापालाच वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवाय लागल्या.. तू कसल्या संस्कृतीच्या बाता मारतोयस?" असं म्हणत बाबानं उठून रस्ता धरला. आपलं भविष्य आंधारात आसताना लोकांचं भविष्य सांगत पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही लोककला सांभाळण्यात धन्यता मानणाऱ्या या माणसाच्या पाठमोऱ्या आकृतीला मी नजरेआड होईपर्यंत बघतच राहिलो.....!
अतिशय अप्रतिम लेख
धन्यवाद गुरुवर्य