--------------------------------- ======================================

चांदोलीच्या धनगरवाड्याची ५० वर्षांची दारूमुक्ती

चांदोलीच्या धनगरवाड्याची ५० वर्षांची दारूमुक्ती

विनायक कदम: ९६६५६५६७२३

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याची वळख मजी डोंगरी भाग. उंचच उंच डोंगररांगा ,शंभर दोनशे लोकांची निसर्गाच्या कुशीत कोकणाप्रमाणे वसलेली गावं. शेती भाताचीच अधिक, मात्र पावसाचं प्रमाण लय , आणि मुबलक चारा आसल्यानं घरोघरी दुभत्या गाई म्हशी मजी दुधाचा महापुरच की. मानस म्हणला तर लय मनमिळावू. मनानं आणि भाषेतही गोडवा आसणारी. चांदोलीच्या घनदाट जंगलात कित्येक वर्षांपासून मोजक्याच लोकसंख्येन जंगलातल्या प्राण्यांशी ,निसर्गाशी एकरूप होऊन राहिलेलं गाव म्हणजे खुंदलापूर उर्फ धनगरवाडा.

नवं कायतर शोधणाऱयांसाठी, अभ्यासण्यासाठी हा धनगरवाडा बरच काय देणारा हाय. सांगली जिल्ह्याशी कमी संपर्क असलेल्या या वाड्यात ५० वर्षांपासन दारूबंदी हाय. तीत येकबी पुरुष , महिला नशा करत नायत. आणि अव्याहतपने सुरू आसलेल्या या यात्रेचा मेळा दरवर्षी हनुमान जयंतीला चांदोलीच्या जंगलात भरतो.

चांदोलीच्या जंगलातील धनगरवाड्याला भेट द्यायला एवढी माहिती पुरेशी होती. धनगरवाड्याचा रस्ता येड्यावाकड्या वळणाचा, दोन्ही बाजूला किर्रर्रर्र झाडी, कधी मोठी चढण तर कधी तीव्र उतार, बाजूला करवंदाच्या जाळ्यात डोंगराची मैना खुणावत होती.

जंगलातील वाघांच्या प्रकल्प कमानीच्या उजव्या हाताला धनगरवाडा जणू चांदोलीच्याच जंगलाला जागता पहारा देत हूता. सकाळी व संध्याकाळी येकच बस. आणि मोबाईलची रेंज नसल्यान जगाशी संपर्क तुटलेला धनगरवाडा नजरेस पडला. बैठ्या पद्धतीच्या घरांचा. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गेल्यान मंदिर सजवलेलं हुतं. साऱ्या गावासह पाहुण्यांनाही प्रसाद आसल्यामुळ मंदिराच्या फुडच मोठाली पातेली पडली हूती. कचरा ,पत्रावळ्या यिस्कटून पडल्या हूत्या. रातभर जागरण झाल्यानं बरीच मंडळी दुपारी १२ वाजेपर्यंत झोपली हूती. गंगाधर गायकवाड मंदिरासमोर खुर्चीवर वाऱ्याला बसल होते.

रामराम घालत आम्ही का आलूय सांगिटलं. आणि बसाय मंदिराची पायरी धरली. तवर गावात कोणतरी नवीन माणसं आल्यात ह्यो मेसेज गेला. तरण्या पोरांसह काय जण कायतर कारण देऊन मंदिरासमोर आमाला टकमक न्हयाळत हुती. आणि साठीच्या गंगाधर गायकवाड धनगर वाड्याचा इतिहासाची पाने उलगडाय लागलं. पूर्वीच्या काळी बरं हुत, मुंबईच्या जीवावर आमचं जगणं हाय बाबानू . हीत पाच पासन शंभर येकर जमीन हाय .पूर्वीच्या काळी जवस, नाचणी पिकायची. आमच्यासंग जंगलात १४ गाव हुती. आता त्यांचं पुनर्वसन झालंय. पाऊस, पाणी आसल्यानं चारा मुबलक. त्यामुळं जनावरांची दावण भरल्याली. गावची दारू बंदी सुंदर महाराज उर्फ भिकाजी बुवा यांनी १९७३ ला केल्याच तेंनी सांगिटल . आणि बुवा गावात आसल्याच सांगिटल. तेंच्याकडनच माहिती घ्या म्हणल. बुवाच्या घरी निगालो. जवळच रस्त्याच्या कडेला, घाणीने भरलेल्या गटाराच्या शेजारी, घराच्या ओसरीवर ८५ ते ८६ वर्षांचा, गळ्यात माळा, तोंडात दात नसलेला भिकाजी बुवा भर उनाचं सावली धरून आडवा झालावता.

नमस्कार, चमत्कार, रामराम झाल. ऊन मी म्हणत हुत. बुवांन सारी सावलीत बसवली. आणि धनगरवाड्याच्या दारुमुक्तीचा अध्याय सुरू झाला. १९७५ ला लोकांच्या घरी ब्यारेलन माणसं दारू काढत हुती.घरटी हीच काम आणि उद्योग आसल्यानं लोकांच्या बुध्या काम देत न्हवत्या. खायाला धान्य मिळायचं न्हाय पण गडी दारू पिऊन लोड हुन बायकसनी धोपटायचं. माराच्या भीतीन बायका करवंदाच्या जाळीत लपून बसायच्या. सारं गाव या दारूला कटाळल हुतं. भिकाजी बुवांच्या सांगण्यांन दोन पोरांनी आपल्या दारुड्या बापालाच फाशी द्यायचं ठरवलं आणि बापाचीच काय साऱ्या गावाची नशा झटक्यात उतरली. नशामुक्तीची गावानं शपथ घिटली ती आजपातूर ५० वर्षे गाव प्रामाणिकपणे पिढ्यान पिढ्या पाळतुय. आमच्या गावच्या दारूमुक्तीची राष्ट्रपतींनी दखल घेत गावाला बक्षीस दिलय.

प्रत्येक वर्षी हनुमान जयंतीला या नशामुक्तीची यात्रा भरते. रातभर भजन, कीर्तन व सोंगी भजनाच कार्यक्रम हुत्यात.शाहूवाडी ,पाटण तालुक्यातील माणसं हिथं येत्यात. भिकाजी बुवा व आमदार शिवाजीराव नाईक यांच्याव गावाची लय निष्ठा. ८ जणांची ग्रामपंचायतीची बॉडी कायम बिनविरोध. पाचवीत शिकणारा फुटबॉलपटू रोनॉलडो गत केसांची स्टाईल मारणारा चुणचुणीत शिवाजी काळे आमच्या चर्चेच्या साऱ्या घडामोडीवर लक्ष दिऊन हूता. जंगलात वाघ हायती.गाई ,गुर अन्य जनावर त्यो मारून खातुय. वन अधिकाऱयांच्याकड तक्रार केल्याव आमचा वाघ हिथंच राहील आसल उत्तर मिळतय.

दुनियेचा संपर्क तुटलेली ही लोक ठराविक सुविधा मिळूनही आनंदात हूती. नात्यात प्रेमाचा गोडवा हूता, गावात फिरून यिऊया म्हणून निगालू. साऱ्यांच्या घराफूड शासनानं दिल्याल पाणी तापवायचे बंब हुतं. कोंबड्याची खुराड, पावसाळ्यात चुलीला तूडून ठेवल्यालं जळान, परसबागेतला भाजीपाला, घराफूड फिरणाऱ्या कोंबड्या, घरात आसणाऱ्या गोठ्यात माणसांपेक्षा शांतपणे बसलेली जनावर, गाईच्या शेणाने सारवलेल्या भुई, दूध काढायला पांढऱ्या शुभ्र घासून ठेवलेल्या किटल्या,वाळत घाटल्याली कापड, बायकांच्या आंगाव पूर्वीच्या काळच्या सोन्याचा साज, माणुसकी व प्रेमळ आसणारी भारी माणसं. गावात उपचारासाठी आसल्याल प्राथमिक आरोग्य केंद्र चांगलंच भावलं.

भिकाजी बुवा येताना म्हणले बोकडाच मांस खाऊन त्याच्यागतच मस्तीची भाषा तुमच्या सांगलीकडच्या लोकांची हाय. का…? र्रर्रर्र.. व्हय र्रर्रर्रर्र. लगीच भांडाण काढून गडी हातयवर येणार. वाघांच्या प्रकल्पामुळ गाव उठवून तेज पुनर्वसन हूणार हाय. व्यावस्थित सोय करून दिली तर आमी जायाला तयार असल्याचं गावकरी सांगत्यात. पण पुनर्वसनाचा इतिहास काळाकुट्ट हाय. मात्र माजी आमदार शिवाजीराव नाईक साहेबांवर तेंचा मोठा ईश्वास हाय. आता गडी फ्याशन म्हणून दारू ढोसत्यात. पण धनगर वाड्यातली माणसं विश्वास व निश्चयान ५० वर्षांपूर्वी घेतलेली शपथ आजबी २१ व्या शतकात पाळत्यात. डोंगराच्या पलीकड पावसाचं काळकुट्ट ढग जमा व्हाय लागलवत. गार वार सुटलं. दिस मावळतीकड झुकला हुता. घाटात ईडीवाकडी वळण घेत आमची गाडी जंगलातील नशामुक्तीच गाव माग टाकून नशा करणाऱ्या सिमेंटच्या जंगलातल्या माणसांकडे धावत हूती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *