४८० जणांच्या तिरड्या बांधणारा… काका (आण्णा)
गर्दीतला आवाज
४८० जणांच्या तिरड्या बांधणारा… काका (आण्णा)
विनायक कदम ९६६५६५६७२३
'तुजी तिरडी मी आवळली....!' गावाकडं आजबी ही शिवी दिली जात्या. पण तिरडी बांधायच काय सोप्प काम वाटतंय काय तुम्हाला? मेलेल्या माणसाच्या जवळ जायाला माणसं भेत्यात. मग तिरडी बांधायची कुणी? पण हाजार दीड हजार लोकसंख्या आसल्याल्या आमच्या लोढे गावात कुणी मेल.. की तिरडी बांधायला त्यासनी बोलवाय लागत न्हाय. त्यो स्वताहून त्या ठिकाणी हजर आस्तुय . कुणी न बोलवता..! सामाजिक बांधिलकी म्हणून सत्तेचाळीस वर्षात या माणसानं साऱ्या जातीधर्माच्या ४८० जणांच्या तिरड्या बांधल्यात. तिरड्याच्या माध्यमातन कित्येकांचा शेवटचा प्रवास सुखकर करण्यासाठी झटणाऱ्या या माणसाचं नाव हाय.... काकासो पांडुरंग ठोंबरे ऊर्फ साऱ्या गावाचा काका (आण्णा) (वय ७०).....!
जुन्यातली पाचवी शाळा शिकल्याल्या आण्णाचा ' बा ' तिरड्या बांधायचं काम करायचा. बा संगं आण्णाबी मेल्याल्याच्या घरी जायाचा. तिरडी कशी बांधायची, काय काय करायचं यावर बारीक नदार ठिऊन आसायचा. आण्णा सांगतू," मेल्यालं माणूस लय यिद्रुप दिसतं. त्यात कुणी रोगाट, भाजल्यालं, आजारी, घाण वास मारणारं, दातखीळ बसल्यानं विचित्र दिसणारं आसलं; तर कोण त्याच्या जवळ जात न्हाय. त्यात तिरडी बांधाय कुणाला इत्या?" २४:१२:१९७२ ला आण्णाचा बा वारला. वयाच्या २४ व्या वर्षी आण्णानं पयली तिरडी बांधली. त्याचं काय त्याला विशेष वाटलं न्हाय. आपण समाजाचं कायतर देणं लागतूय म्हणून आणि कायतरी आपणाला जमतंय म्हणून; आण्णाचा ह्यो सारा खटाटोप..!
४७ वर्षं गावात, वळकीच्या लोकांत आणि पावण्याच्यात कोण बी मरुदे, आण्णाला बोलवाय लागत न्हाय, मुराळी पाठवाय लागत न्हाय. हाय त्या परिस्थितीत, हातात आसंल ती काम टाकून आण्णा त्या जागी हाजर आस्तुय. घरातल्या पोक्त माणसाला सात फूटी २ काठ्या, आडव्या बारीक ३ काठ्या, पांढरं कापाड, गुलाल, सुतळी, बाय आसंल तर खण, नारळ आणि पुरुष आसंल तर पानसुपारी.... ह्या सगळ्याची जुळणी करायला सांगून आण्णाच काम सुरू हुतय. लोटक्याची शिकाळी तवर बांधली जात्या. आता माणूस मेला म्हणल्यावर परमूलखातनं पै पावणं याचं. कोण जवळ तर कोण लांब; पण मेल्याल्या माणसाचं शेवटचं दर्शन घ्याचा बरीच जण हाट्ट धरत्यात. मढं चार-चार तास पावण्यांची वाट बगत ताटकळत ठेवाय लागतं. तवर बायकांचा आरडून, वरडून दंगा सुरू आस्तुय. कवा कवा तर गडीबी धाय मोकलून रडत्यात. त्या साऱ्यासनी आवरणं, त्यासनी समजावणं मजी लै आवगड काम..! मग आण्णा तेज्या भाषेत साऱ्यासनी सांगतुय. माणसं आयकत्यात. मान देत्यात. आंघुळ घालून मढं उचलाय लागलं; की काय काय बाया मढ्याशी झोंबाझोंबी करत्यात. आण्णा दंडाला धरून त्यासनी वडून भायर काढतूय. लय माणसं तिथं असत्यात; पण कुणी हात लावायला फुढं येत न्हाय.
तवर मशानभूमीत सात मणाचा लाकडाचा ढीग माणसं आणत्यात. तित गेल्याव मड खाली उतरलं; की परत आण्णाची पळापळ सुरू हुत्या. बारीक मुटी लाकडं घेत सराण रचायला जुपी करायची. निम्मा थर झाला की त्याव मड ठेवायचं. परत त्याव लाकडं रचून घ्याची. राकील वतून शेवटाला मग पेटवायच. जाळावर जरा जरा येळानं मीट मारत ऱ्हायाचं. कधी कधी लाकडं पेटत नसत्याल तर टायरा ठिऊन पेटवावं लागतंय... ही सगळं आण्णा जबाबदारीनं करतुय. तिसऱ्या दिवशी माती, दहावा, तेरावा... ही सार करून घ्याय आण्णा आस्तुयच. पूर्वी सहा-सात दिवस माणसं घरात बसून असायची. सारी माणसं त्या दुःखात सामील व्हायची. मातीला गावभर बायका भाकरी बांधून आणायच्या. आण्णा म्हणला," आता काळ बदललाय, माणसांची येकमेकावरची माया कमी झाल्या. आता माणसांच्या डोळ्याला पाणी येत न्हाय. आता कुणालाच कुणासाठी थांबाय वेळ न्हाय. मग तिसऱ्या दिवशीच सार उरकलं जातंय." मयताच्या ठिकाणी सहनशीलता लय लागत्या. आण्णा मेल्याल्या माणसांच्या चार पिढीचा साक्षीदार हाय. तेंन त्या साऱ्यांच्याच तिरड्या बांधल्यात. "व्यसनानं आलीकडची गाबडी बाद झाली; आणि नातवाच्या वयाच्या पोरांच्या तिरड्या बांधायची येळ माझ्याव आल्याच आण्णा सांगत हुता.।
गावात हुणाऱ्या गोकुळ आष्टमीच्या यात्रेचा कारभारी गेली४० वरीस आण्णाच हाय. त्यातली २० वरीस तर घरच्या बैलगाडीतनं खीरीचं सामान आन् बाकीचा बाजार नामु तात्या, त्यो आणी बापू निकम तासगावातनं आणत हुतं. पारायणाच्या टायमाला ईना उभा रायल्यापासन धा दिस गावातल्या देवळात निस्वार्थीपणे घरातल काम समजून; पडंल त्या कामात आण्णा स्वताला गाडून घितुय. आण्णा म्हणला," पूर्वीच्या काळी लोढ्याची खीर चार गावात फेमस हुती. तीन वाजता काइल लावली; की सहा पर्यंत खिरीचा घमघमाट गावबर सुटायचा. चार-पाच हजार माणसं खीर खायाची. घरला बांधून न्ह्यायची. कायलीला यीकतचं जळाण कधी आणलं न्हाय. गावात वाळल्याली झाडं हुती. आता धूरात कोण काम करत न्हाय; ग्यासच्या शेगड्या आल्यात." आण्णा इतकी वर्षं कारभारी हाय; पण त्या बाजारातलं मूठभर तोंडात कधी घातलं न्हाय. सामान कधी घरला न्हेलं न्हाय. पैशाची कधी आफरातफर झाली न्हाय. कधी कसला वाद झाला न्हाय; का अंगावर कधी कुणी शितुड उडवल, आसं कधी झालं न्हाय. आपल्या घरातलं काम समजून कुठला रुबाब न दावता राबायचं, आसं साधं सरळ तत्त्व..! रातभर जागरण, भजनासाठी इतकं आरडायचं; की बोलायला तोंडातनं आवाज फुटत न्हाई. काळ बदलला, माणसाला माणसाची किंमत ऱ्हायली न्हाय. "ये पैसा बोलता है..." या गाण्याप्रमाणं 'जिथं पैसा मिळत आसंल, जिथं स्वताचा फायदा आसंल; तिथंच आम्ही येळ देणार.!' आशा ईचाराच्या माणसांची संख्या रोज वाढत चालल्या.
आपलं घरचं काम सुडून गावाच्या फुकट तिरड्या आवळायला कुणाला सवड हाय.? काळ बदलत चाललाय. पण गावगाड्यात आजबी आण्णासारखी माणसं जिवंत हायती; म्हणून गावगाडा सुरळीत चालू हाय. माणसं आजूनबी येकाद्याच्या शब्दाला मान देत्यात. आमाला कुणी का म्हणलं; तर चालत न्हाय. लगीच आमी उरपाटं बुलून जातुय; कारण संयम संपलाय आमचा.! आण्णासारख्या माणसांनी तो संयम वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत जपून ठेवलाय. या वयातबी आण्णा रोज दीड किलोमीटरवरनं सकाळ संध्याकाळ गावात दूध घालाय यितुय. दिवसभर जनावरांची उसाबर, त्यांची वैरण काडी, शेण घाण ही सारं करत करतच; गेली ४७ वरीस आण्णाचं ही सामाजिक काम सुरू हाय. निस्वार्थी भावनेनं, कुठल्याबी कौतुकाच्या सन्मानाच्या अपेक्षेविना ....