४२ वर्ष सुट्टी न घेणारा माळीमामा : बळवंत लांडगे
गर्दीतला आवाज…
४२ वर्ष सुट्टी न घेणारा माळीमामा : बळवंत लांडगे
विनायक कदम:९६६५६५६७२३
बारक आसताना गावात चिंचणी, भैरववाडीचा योक माळीमामा यायचा. २२३३ नंबर असलेली एम एटी गाडी. फुढल्या चाकावर भगवा झेंडा, पांढरा शर्ट, पांढरी ईजार, डोसक्यावर टोपी, झुपकेदार मिशा, तोंडात कायम पानं, पायात कातडी पायतान, एका हातात घड्याळ, एका हातात बांधलेला दोरा, गाडीला फुढ हारांची पिशवी, आणि माग क्यारेजला कधी पोत. सर्जाच्या गिरणीत सकाळच दळान आणायला गेलं की गडी साडेआठ वाजता हजर. काय न बोलता झेंडू, मखमल, नायतर गलांडयाच्या माळेत 10 फुल असणारा हार दरवाजाला आडकवायचा आणि निघून जायचा. अनेक दिवस काय अनेक वर्षे या माणसाला मी बघतोय कधी कामात खंड नाही, हार दयायला कधी आला नाय आणि कुणाला दिसला नाय आस चिचणी पासून सावळज पर्यंतच्या गावात कधी झालं न्हाय. आसा हा माळीमामा म्हणजे बळवंत शिवराम लांडगे वय ५९ गाव चिंचणी, भैरववाडी.
माळीमामाचा दिनक्रम व हार डोक्यात बसलावता. या माणसाला गाठून कधी धाड धाड प्रश्न ईचारीन आस झालंत. पण वळख न्हवती, म्हणलं कोणतर वकील घालून वळक करून घ्यावी. वाडीच्या अनिलरावानी भेटवायची यंत्रणा लावली पण कामातन माप लागलं न्हाय. मग गावातल्या महेशरावांची वळख निघली आणि रविवारी रात्रीच्या आठ वाजता माळी मामाच्या घरचा रस्ता धरला. मळ्यात गड्याच घर. आंधारात काय घावतयवी. त्यात कुत्र्यांच भ्या, गडी कुटून यिउन तानाय चालू करत्याली नेम न्हवता. घरात गिलू तर बायको, पोरगा व आई सह माळीमामाच हारांचं काम सुरू हुतं.
नमस्कार झाल्यावर वळक सांगिटली आणि माहिती घ्यायला सुरवात किली. घरची सव्वा २ एकर शिती. त्यात फुल करायचं. गडी १७ वर्षांचा असल्यापासून या फुलांच्या धंद्यात. १९७७ ला सांगलीत फुलांचा दर १२ आण्याला किलो असा हुता. आणि ती फुल तेंनी सायकलन जाऊन घाटलेली. फुल घरची, मग त्याच्या माळा करून सायकल वरन ईकायला सुरवात किली. बारक्या हाराला गिराईक म्हणला तर बारक दुकानदार, देवळं, ह
हाटील, सलून हेज्यासारकी दुकान. चिचणी, लोढ, कवलग, खूजगाव, वाघापूर, बस्तवडे व सावळज या गावच गिराईक. दिनक्रम म्हनला तर सकाळी सहा वाजता उठायचं. आवरून बरोबर आठ वाजता गाडीला किक मारायची. एका मार्गावर असल्याली ही गाव. गाव करत, करत शेवटच्या सावळज गावात जायाला ११ ती१२ वाजायचं. तिथन निघालं की १ वाजता घरात. जेवण करून तासभर ईसावा घ्याचा. आणि दुसऱ्या दिवशीच फुल तोडायचा काम सुरू.
हार रात्रीच करायचं. संध्याकाळी सहाला बसलं की नऊ वाजता हार तयार. परत त्योच दिनक्रम. एक दोन नाही तर तब्बल४२वर्ष.
उन्हाळ्यात पाणी नसल्यानं शेतात फुल नसत्यात. बाजारात फुलांच दर वाढत्यात. पण हाराचा दर त्योच. मग फायदा हुदी नाय तोटा हुदी. सात गावात माळीमामाच रोज १०० हार जात्यात. १०० घरांची, दुकानांची, देवळांची देवपूजा त्यांच्या हाराशिवाय कधी झाली न्हाय. आता हार तीन रुपयाला योक रोज तीनशे रुपयांचं हार धा ते बारा किलोमीटरवर जाऊन यिकायचं. त्याच पैस कधी मानस देत्याल तवा घ्याच. मी ईचारल यातन काय साधल. एवढ्या कष्टाच आर्थिक गणित कसं बसवताय. त्यांनी अभिमानानं घराच्या छताकड बोट दाखवत सांगितलं या हारांच्या जीवावर ही छानसं घर उभारल. त्यात मी समाधानी हाय. पण ज्या धंदयान मला आनाला लावलं त्या धंदयाला मी हातपाय हालत्यात तवर बंद करणार न्हाय. त्यांची ही वाक्य कुठल्याही तत्त्ववेत्याला फिकी पाडत्याल.
त्याग, कष्ट व कामावरची श्रद्धा फायदा तोटा न बघता किती असावी याला मर्यादा हायत. पण माळी मामा याला अपवाद हायत. ४२ वर्ष म्हणजे १५ हजार ३३० दिवस या माणसान कधी सुट्टी घेतली न्हाय. आपल्या कामाशी कायम प्रामाणिक राहिलाय. उन्हाळा,पावसाळा, हिवाळा कामात कधी खंड न्हाय. या माणसाला कटाळा आला सुट्टी घ्यावी आस कधी न्हाय वाटलं. आमाला जमलं का एवढा त्याग, कधी येगदा रविवार यील सुट्टीला फिराय जाईन मौज मजा करल आस वाटतंय. सातवा वेतन आयोग लागला तरी आमचं भागत न्हाय. पण घरची फुल, चार माणसांनी हार तयार करायच, गाडीला रोज पेट्रोल आणि एका माणसाचा दिवस वाया, आणि या सर्व कष्टाची दिवसाची कमाई म्हणला तर फक्त ३०० रुपये. कसला हा त्याग . कधी हिशोबच न्हाय केला. आमची पोर येवढ्याचा मावा दिवसभरात थुकुन टाकत्यात. आपल्या फुलांनी लोकांच्या देव्हारयातील देवपूजा करणाऱ्या माणसातल्या या चालता बोलत्या माणसाचा त्याग आमाला दुर्लक्षित करून चालणार न्हाय.