--------------------------------- ======================================

१५० वर्षाचा पिपळाचा पार:

१५० वर्षाचा पिपळाचा पार:

विनायक कदम:९६६५६५६७२३

पिपळाला राह्यला ना पार आता……….. फिरतो घिऊन जो तो कार आता!

अनिल उदावंत नावाच्या साहित्यिकांन गावाकडच्या पाराच भारी वर्णन केलंय.

भलं मोट वडाच, पिपळाच, चिचच दाट सावली देनार झाड..! लय वरसाच आसाव. येवड मोट की त्येज्या सावलीत किमान शे ,दोनशे मानस आरामात बसत्याल. पाच, सा मानसांच्या कवळ्यात बसल येवडा मोटा तेजा बुडका. तेला दगडान गोलठेल बांधकाम करुन दिल्याला आकार, त्याव कमीत कमी तिसभर मानस येवस्थित मांडी घालून बसत्याल येवढा तेजा आकार. मोबाईलन जग जवळ आल पन मानस मुकी झाली. बोलन ईसरली आनी आत्महत्या वाढल्या. पन ग्रामीन संस्कृतीचा म्हत्वाचा घटक आसनारी व झाडांच्या जपनूकीचा संदेश देनारी ही पार संस्कृती बसाय शिमेटची बाकडी आली तरी काय गावानी आजूनही जपल्या. आमच्या लोढे गावान १५० वर्षांचा देकना पिपळाचा पार जपलाय.

परतेक गावाच्या तोंडाला,मोक्याच्या जागी चौकात, देवाळाच्या फूड आसल्याल्या पाराव बसून दिसभर रानात राबल्याली मांनस येकमेकांची सुख:दुखः वाटायची. खॉं खॉं करून मानसांचं हास पिकायच. पॉट भरून नुसती हासायचीच नायत तर दुःख कमी कराय गळ्यात पडून मन मोकळं हुसतर रडायची. घरा घरातल वाद गावातली जेष्ठ मानस पारावर बसून मिटवायची. गावाफूड पंच करेक्ट न्याय दयाचं. गावातच तंटामुक्ती व्हायची. तवा पुलीस स्टेशनला जायाची काय भानगडच न्हवती. जाग्याव कंडका आसायचा. गावातल्या जानत्या मानसांचं मानस आयकायची. त्यासनी, तेंच्या शब्दासनी मान दयायची. येवडा पाराव त्या लोकांच्याव ईसवास हुता.

राज्यात गावा गावातल्या ह्याच पारावरनी साऱ्या पक्षाचं, जाती, धर्माच पुढारी सभा ठुकून मोट नेत झालं. त्यातन काय गड्यानी गावाचा राज्याचा चांगला ईकास केला. काय गावात पारावरल्या कुजकया राजकारनान कितीतरी गाव व कितीतरी घरं जळली. काय रगील आनी रंगेल पुडारी याच पारावर बसून गावच्या आया ,भयनींच्या खोड्या काडायचं. हेज्यावन लोकांची डुसकी फुटायची, मन कलुषित व्हायची,आग धुपायची,त्यातनं मुडद पडायचं आसा चांगल्याचा व वायटाचा धनी पार हुता.

उनाळ्यात, गावा गावातनी जत्रा भरायच्या. आता जत्रा म्हनल की तमाशा आलाच की. तवा माईक सिष्टीम कूट लय हुती. तमाशा पारावर व्हायचा. मानस खाली बसून बगायची. टावेल, टोप्या,पटक उडवायची. तमाशात चांगलं काम करनाऱ्या नाच्या,लावनीवाली बाय, ढूलकीवाला ह्या कलाकारासनी पाराव कौतुकाची थाप मिळत तेंच्या पकात बळ भरल्यान तेंची कला आजून फुलायची. गावात पारांवर सकाळी सा वाजल्या पसन राती आकरा वाजू पातूर बैटका बसून गप्पा व्हायच्या. त्याच लगींन ठरल्यापासुन, गयचा खोंड आवताला,गाडीला कसा चालतुय, किती दाती हाय,गयलवर सोडताय का? मस गाब जायना, गिली तर उलटत्या, येपारयांन येवड्याला मागीटल्या, गावातल्या त्या आळीतली भानगड , पिरनीला घात हाय का?राजकारण, शेताभातातली पिक, पानी, नादाय जानाऱ्या ,येणाऱ्या लिकी सुना हेज्यासारख्या ढीगभर गप्पा पाराव बसून व्हायच्या. चांगल्या कामाची सुरुवात लग्नाच्या सुपाऱ्या पाराव फुटायच्या.

गावातल पार मजी गावची प्रतिष्ठा हुती. जुन्या मानसानी पारामुळ झाड नुसती लावायचीच न्हायत तर ती जगवायची ह्यो संदेश फूडच्या पिडीला देत हुती. आंबा, वड, पिपळ,चिंच आसल्या दिशी झाडासनी दगडाचा गोलठेल पार मानस करायची. पार करताना आताच्यागत झाडाच्या बुडक्यात शिमेट वतत पेव्हिंग ब्लॉक घालत न्हवती. तर झाड भविष्यात मोठं हुनार हाय म्हनून तेज्या बाजूला जागा ठेवायची. झाडासनी पारांच दगडी बांधकाम देखन करावं तर ती वडर समाजातल्या गडयानीच. नुसतं दुरी वळूंब्यात काम आसायच.

काळ बदलला. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पाराला घरघर लागली. मोबाईल आला आनी मानस मानसात राह्यली न्हायत. तेंच जग, विश्व बदलल. ती मानसाजवळ बसूनबी येकलकोंडी झाल्यात. बाजूला दोस्त, गर्दी, आसुदी नसुदी, कुट जंगलात,डोंगरात तेला सोडा मोबायल आसला की तेला काय लागत न्हाय. जवळ कोन हाय,नाय,भावना ,संवेदना कायच राह्यल्या न्हायत. मोबायल यिऊन,सारी दुनया हातात यिउन बी मानस समाधानी न्हायत. तानतनावात जगत्यात. खोट्या स्टेटसमुळ खॉं खॉं हासत न्हायत तर आपल दुक कमी व्हायला मित्राच्या गळ्यात पडून मन मोकळं हुस्तर रडत बी न्हायत. नुसतं आतल्या आत कोरड हुंडाद काडून पोटात ईश साठवून ठेवत्यात. मग कवातरी भावपूर्ण श्रद्धांजलीचा मेसेज व्हाट्स अँप वर इतुय. आता पाराव, चार चौगात बसाय, बोलाय आमाला लाज वाटत्या

आतातर शिमेटची बाकडी गावा गावातनी दिसाय लागल्यात. त्याव बसून पिचकाऱ्या मारत मोबाइलमदी डोसक घालून बसल्याली डुसकी गावागावातनी तुमाला दिसत्याल. पन पारावर बसल्यावल येनार सुख बाकड्यात न्हाय. गावातनी दगाड पडूंन झाड वाळत पारांच आस्तित्व संपाय लागल. काय गावानी आजूनही पार जपत तेज पुनर्जीवन करत ग्रामीण संस्कृती,झाड जपायचं भारी काम केलंय. शासन ,गाव कारभाऱ्यांसह तरुनाईन वृक्षसंरक्षनाची शिकवन देत, गावागावाची तंटामुक्ती करत, कलाकार जगवनारा त्यासनी पाठबळ देणारा, ग्रामीन संस्कृतीचा शिलेदार आसनारा,मुक्या मानसासनी बोलत करनारा पार जपायच प्रयत्न कराय पायजीत. तासगाव तालुक्यातल्या आमच्या लोढे गावच्या कारभारयांनी दीडशे वर्षांच्या जुन्या पिपळाच्या झाडाचा मोडकळीस आल्याला पार नव्यानं जपलाय, बांधलाय. नव्या पाराव आता बैठका बसत्यात. व्याख्यानमाला हुत्या. आनी तीन पिढ्यांच्या सुख दुःखांचा साक्षीदार आसनारा पिपळ आजूनबी दिमाखात हाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *